गोसेवा हे व्रत म्हणून अंगीकारणारे कराळे दांपत्य

माय ग्रीन सोसायटी च्या वतीने पालघर जिल्ह्यातील धापड, धेनुग्राम येथे गो-रुग्णालयाचे(COW-HOSPITAL) नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. परिसरातील गायींचे आरोग्य आणि वैद्यकीय व्यवस्थांची अनुपलब्धता यांचा विचार करून या रुग्णालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. गेली बावीस वर्षे श्रीराम दृष्टी गोशाळा सेवा संस्थेच्या माध्यमातून गोसेवेचे व्रत अंगीकारणारे किशोर आणि ज्योती कराळे यांच्या कष्टाचे हे फळ आहे. त्यांच्या या २२ वर्षांच्या अथक परिश्रमांचा हा आढावा….

गायींचे महत्त्व हे वेदांमध्ये सांगितलेले आहे. तिला वेदोक्त प्रमाण आहे. आपण तिला माता मानत आलो आहोत. आपल्या सर्व सोळा संस्कारात गायीचा समावेश असतो. आपल्या जेवणातला एक घास म्हणजे गोग्रास नैवेद्य हा प्रत्येक शुभकार्याच्या वेळी, श्राद्धपक्षाच्या गायीसाठी वेगळा ठेवला जातो, आपल्याला गृहशुद्धीसाठी गोमुत्र(GOMUTRA) लागते, होमासाठी गोवरी लागते, पंचामृतासाठी दूध लागते. ग्रहशांत, वास्तुशांत, नक्षत्रशांत यातही गायीला महत्त्व आहे. भारतात गायीचे सांस्कृतिक स्थान अनन्यसाधारण असे आहे. माझ्या लहानपणी आमच्या घरी गायी होत्या. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल मुळातच ओढ, जिव्हाळा वाटत असे. त्यामुळे गायी धडधाकट असोत वा आजारी त्या कसायांच्या दारात जाताना पाहून आम्हाला विलक्षण दु:ख होत असे. म्हणून आम्ही ठरवले की आता या गोधनाच्या आणि पर्यायाने आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठीच आपले पुढील जीवन व्यतीत करायचे आणि ते पूर्ण करण्याचा आम्ही दोघांनी यथाशक्ती प्रयत्न केला, श्रीराम दृष्टी गोशाळेचे संचालक किशोर कराळे सांगत होते.

पालघर(PALGHAR) जिल्ह्यातील धापड गावात राहणारे किशोर आणि ज्योती कराळे हे दांपत्य गेली अनेक वर्षे न थकता, न थांबता श्रीराम दृष्टी गोशाळेच्या माध्यमातून गोसेवेचा आपला वसा पूर्ण करीत आहेत. उपचाराअभावी परिसरातील गायींना कसायाकडे पाठविले जाते हे पाहून या दोघांनी अखेर स्वतःच या गायींवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. गायी घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवून त्यांनी या गायींना मुक्त करण्यास सुरुवात केली. अत्यंत अमानुषपणे या गायी गाडीत अक्षरशः कोंबलेल्या असायच्या. आधीच जखमी वा म्हाताऱ्या असलेल्या गायी या प्रवासादरम्यान अगदीच केविलवाण्या होऊन जात. अनेकींना या कोंबण्याच्या पद्धतीमुळे चित्रविचित्र अपघात, दुखापत होत असे. अशा गायी ताब्यात घेऊन किशोर आणि ज्योती यांनी त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे दोघांचीही शैक्षणिक पार्श्वभूमी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नव्हती. पण गायींच्या उपचारासाठी ज्योती यांनी बेसिक वैद्यकीय ज्ञान, काही औषधांची(आयुर्वेदिक/होमिओपॅथिक) माहिती मिळवली, किशोर यांनी जखमा कशा बऱ्या करायच्या, हाड मोडल्यास बँडेज-प्लास्टर कसे करायचे ते शिकून घेतले. आजमितीस या दोघांनी तब्बल ३५००च्या आसपास गायींचे उपचार केले आहेत.
याबाबत किशोर सांगतात, आमचा विचार सुरु होता तेव्हा एक गाय(COW) आमच्याकडे उपचारासाठी आली. आम्हीही नवीनच होतो. पण तिचे उपचार करण्यात आम्ही यशस्वी झालो. स्थानिक शेतकऱ्यांकडील गायी असायच्या. पण मुख्यत्वे आजारी वा जखमी स्वरूपातील बेवारस गायी अनेक असायच्या. अजूनही असतात. पालघरमध्ये गायींच्या उपचारांसाठी दवाखान्याचा पर्याय नव्हता. गायी टेम्पोत घालून उपचारासाठी मुंबईला न्यायच्या तर शेतकऱ्यांना, वनवासींना ते खर्च परवडत नसत. अक्षरशः मग अशा गायी मरायला सोडून दिल्या जात अशा अनेक गायी आम्हाला रस्त्याच्या कडेला, खड्यात, शेतात आढळल्या. लोकांना जसजसे कळू लागले तसतसे आम्हाला लोक फोन करून, भेटून स्वतः या अशा गायींची माहिती देऊ लागले. तिथे जायचे आणि गायीला घेऊन यायचे एक दिव्यच असे. अनेकदा गायी खड्यात पडलेल्या असत. आम्ही त्यांना बाहेर काढून त्यांच्यावर उपचार करायचो.

किशोर आणि ज्योती यांनी उपचार सुरु केले असले तरी त्यांना संस्था नसल्याने गायींचा ताबा घेता येत नव्हता. पण मग बेवारस गायी जाणार तरी कुठे? त्या गायींचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी २००६ मध्ये श्रीराम दृष्टी गोशाळा ही संस्था रजिस्टर केली. आज या संस्थेत १४०च्या वर गायी आहेत. भारतीय परंपरेत असलेल्या पशुपालनाच्या पद्धतीनुसार या गायींचे पालन केले जाते. मोकळ्या हवेत चारा खायला सोडले जाते, मोकळ्या जागी पिण्याच्या पाण्याचे स्रोत उपलब्ध करून दिले गेले आहेत. विशेष म्हणजे या गोशाळेत गायी बांधून ठेवल्या जात नाहीत. संस्थेच्या माध्यमातून सुमारे १२५० बेवारस गायी करारपत्र करून स्थानिक शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. संस्थेच्या परवानगीशिवाय हे शेतकरी या गायी बेवारस सोडून देऊ शकत नाहीत वा विकूही शकत नाहीत. तसेच स्थानिक शेतकरी असल्यामुळे कराळे यांचे ही गोपालनाकडे लक्ष राहते.
या गावात गो-रुग्णालयाची नितांत आवश्यकता असल्याचे किशोर कराळे म्हणाले. साधा एक्स-रे काढायचा तर आम्हाला मुंबईपर्यंत जावे लागते. पुन्हा तिकडे ऍडमिट करायचे झाले तर वेळ, पैसा अशा अनेक बाबतीत ते शेतकऱ्यांना कठीण जाते. अशा वेळी तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टर्स, अद्ययावत उपचार याची व्यवस्था झाली तर गोधन पालनात त्याचा उपयोग होईल. विशेष म्हणजे शेतकरी, वनवासी आपल्या गायींना बेवारस सोडणार नाही. गोधनाच्या रक्षणाचे, त्यांच्यावरील उपचारांचे महत्त्व त्यांनाही कळेल. अशा विचार करून आम्ही माय ग्रीन सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने येथे लवकरच गो-रुग्णालय उभे राहील. भविष्यात संस्थेच्या वतीने गो पर्यटन प्रकल्प, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प (निर्माणाधीन), भारतीय गोधनाची उपयोगिता समजावून गो-वंशवृद्धीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, आयुर्वेदिक औषधी वनस्पती लागवड असे विविध प्रकल्प धेनुग्राम येथे सुरु करण्यात येणार आहेत.