दिवाळी नव्हे, देवळे बंद ठेवणाऱ्या नरकासुरांच्या नावाने शिमगा करा; बंडातात्या कराडकर यांचे हिंदूंना संतप्त आवाहन

मुंबई, नोव्हेंबर ९, २०२० (विसंके) : भारतातली सर्व देवळे(TEMPLE) खुली असताना महाराष्ट्रातली देवळे नरकासुराने बंद ठेवली आहेत. असं असताना हिंदू आनंद कसला साजरा करणार, असा भेदक सवाल करीत ज्येष्ठ वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारच्या देवळे बंद ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.
हिंदूंनी दिवाळीचा(DIWALI) आनंद व्यक्त न करता या सरकारच्या नावाने शिमगा करायला हवा, अशा तीव्र शब्दांत संतचरणरज बंडातात्या कराडकर यांनी एका खुल्या पत्राद्वारे आपल्या भावनाक्षोभास वाट करून दिली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. दिवाळी सारख्या आनंदाच्या सणाच्या तोंडावर आणि करोना साथ आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसत असताना ठाकरे राज्यातील मंदिरे खुली करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत कोणतेही ठोस आश्वासन न देता दिवाळीनंतर सरकार याबाबत विचार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या कराडकर यांनी एक खरमरीत पत्र लिहून ठाकरे सरकारचा समाचार घेतला.
पार्ट्या चालतात, हळदी-लग्न समारंभ चालतो, हॉटेल, बार सुरू आहेत. मग मंदिरे बंद का, असा संतप्त सवाल कराडकर यांनी आपल्या पत्रात विचारला आहे. लॉकडाऊननंतर पुनश्च हरि ओम म्हणत सरकारने नव्या जोमात सुरुवात केली. मात्र, ‘हरि’ बंदीवासातच राहीला, अशी टीका मनसेनेही केली होती. देवळे उघडण्याबाबतच्या सरकारच्या बोटचेप्या भूमिकेमुळे वारकरी संप्रदायामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
देवळे बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाची तुलना नरकासुराच्या अत्याचारांशी करीत, हिंदूंचा कैवारी ना,तिक, अधर्मी असुरांच्या ताब्यात असल्याने असे घडत असल्याचे सांगतानाच, महाराष्ट्रातील हिंदूंनी यंदा दिवाळी साजरी करू नये. करायचेच झाल्यास या असुरांच्या नावे ‘शिमगा’ करा तसेच आंघोळ करायची आणि गोड खायचे असेल तर या अधर्मी, नास्तिक असुरांचे चौदावे घालत खा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
(पूर्ण)