तमिळनाडूतील विद्यापीठाने अभाविपच्या तक्रारीवरून अरुंधती रॉय यांचे वादग्रस्त पुस्तक अभ्यासक्रमातून हटविले
चेन्नई, दि. १२ नोव्हेंबर – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या(ABVP) तक्रारीची दखल घेत राज्यातील तिरुनेवेली येथील मनोमणियम सुंदरनर विद्यापीठाने(TMSV TAMILNADU) अरुंधती रॉय यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हटविले आहे. डाव्या विचारांच्या प्रखर समर्थक अरुंधती रॉय(ARANDHATI ROY) यांनी राष्ट्रीय विचारसरणीवर विविध माध्यमांतून वेळोवेळी टिका केली असून आपल्या विखारी मांडणीसाठी प्रसिद्ध आहेत.
अरुंधती रॉय यांचे ‘वॉकिंग विथ कॉमरेड्स’ हे पुस्तक विद्यापीठाने २०१७साली बीए इंग्लिश (BA ENGLISH)साहित्याच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात लावले होते. दहशतवादी व लोकशाहीविरोधी संघटनेचे उदात्तीकरण करणाऱ्या आणि माओवादी मार्गाला एकप्रकारे तात्विक मुलामा देवून लोकांचा बुद्धीभेद करणाऱ्या ह्या पुस्तकाचा समावेश अभ्यासक्रमात केला जाऊ नये याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तक्रार केली होती.
या बाबत विद्यापीठाचे उपकुलगुरू के.पिचुमणी म्हणाले, मागील आठवड्यात अभाविपच्या तक्रारीनंतर आम्ही एक समिती तयार केली. माओवादी क्षेत्रांबाबत लेखिकेचे असणारे वादग्रस्त विचार या पुस्तकात असल्याचे तक्रारीत म्हटले होते. आमच्या समितीत काही शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि संचालक मंडळांचे सदस्य होते. त्यांनी या तक्रारीची दखल घेतली व पुस्तक अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. एखादे वादग्रस्त पुस्तक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लावणे अयोग्य आहे असे आम्हाला वाटले. आम्ही या पुस्तकाच्या जागी लेखक एम कृष्णन यांच्या माय नेटिव्ह लँड(NATIVE LAND) या पुस्तकाचा समावेश केला आहे.