NewsSeva

धक्कादायक! डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

नागपूर, दि. ३० नोव्हेंबर – आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कन्या डॉ. शीतल आमटे – करजगी यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.

डॉ. शीतल आमटे या आमटे कुटुंबाचा सात दशकांचा समाजसेवेचा वारसा सशक्तपणे पुढे चालवित होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजमाध्यमांवर एका व्हिडिओच्या माध्यमातून आनंदवनातील कार्यकर्ते आणि काही आमटे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. हा व्हिडिओ काही वेळातच हटविण्यात आला. आमटे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन डॉ. शीतल या मानसिक तणावाखाली असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे शीतल यांनी केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते.

फोटो सौजन्य – इंटरनेट

दरम्यान गेल्या काही महिन्यांत आनंदवन ही संस्था आमटे कुटुंबियांचे अंतर्गत वाद, कार्यकर्त्यांचा छळ, आरोप-प्रत्यारोप अशा अनेक कारणांमुळे चर्चेत आली होती. आनंदवनावर वृत्तमालिका प्रसिद्ध वृत्तपत्राने प्रकाशित केल्यानंतर हे वाद पुन्हा प्रकाशात आले. हे वाद लवकरात लवकर मिटवण्याची विनंती अनेक जुन्या स्नेह्यांनी आमटे कुटुंबियांना दिली होती.

काही दिवसांपूर्वी आनंदवनातील एका कर्मचाऱ्याने शीतल आमटे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेव्हापासून त्यांची मनस्थिती बिघडली होती. अनेकदा त्या आनंदवन व कौंटुंबिक कलहाच्या केंद्रस्थानी होत्या. त्यांच्या सासऱ्यांनी मध्यस्थी करून कौटुंबिक कलह मिटवण्याचे प्रयत्न केले होते. परंतु आज त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने आनंदवन व त्यांचे कुटुंबीय यांना धक्का बसला आहे. शीतल यांना २०१६ साली ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ने ‘यंग ग्लोबल लीडर 2016’ पुरस्काराने गौैरवले होते.

Back to top button