सध्या लव्ह जिहादचा मुद्दा देशभर, जगभर गाजतो आहे. दृष्टी स्त्री अध्ययन केंद्राच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता, ज्येष्ठ लेखिका-विचारवंत ऍड. मोनिका अरोरा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सीएए, अर्बन माओवाद, जेएनयूमधील आंदोलने या विषयावर तथ्याधारित परखड विचार मांडल्याबद्दल मोनिका अरोरा या विशेष प्रसिद्ध आहेत. दृष्टीच्या व्हर्चुअल पद्धतीने झालेल्या या व्याख्यानात ‘लव्ह जिहाद’ या विषयावर त्यांनी आपले प्रखर विचार मांडले. लव्ह जिहाद म्हणजे काय, लव्ह जिहाद कशाला म्हटले जाते. लव्ह जिहादमधील कार्यपद्धती अर्थात मोडस ऑपरेंडी कशी असते, भारतासह युरोपात लव्ह जिहादचे वास्तव काय आहे अशा अनेक मुद्द्यांचा परामर्श त्यांनी आपल्या व्याख्यानात घेतला. ‘विश्व संवाद केंद्र, कोकण’च्या फेसबुक पेजवरही या व्याख्यानाचे थेट प्रसारण झाले होते. त्यांच्या या व्याख्यानाचा आढावा घेणारा हा लेख.
झारखंडच्या सुखवस्तू घरात जन्मलेल्या तारा सहदेवसाठी जोडीदार शोधत असताना रणजीतसिंह कोहली या सुस्वरूप मुलाचे स्थळ सांगून आले. राष्ट्रीय नेमबाज म्हणून क्रीडाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ताराला पहिल्या भेटीतच रणजीत आवडला. आईवडिलांनी धामधुमीत लग्न लावून दिले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लक्षात आले, रात्री पाहिलेले घरातील हिंदू देवीदेवतांचे सर्व देवांचे फोटो गायब झाले आहेत आणि जिच्याशी तिचं लग्न झालं तो ‘रणजितसिंह कोहली’ नसून ‘रकिबुल खान आहे’. फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ताराने आपले नाव बदलण्यास आणि मुस्लीम पद्धतीने निकाह करण्यास ठाम नकार दिला. संपूर्ण परिवाराच्या विरोधात केस दाखल झाली, तारा जिंकली आणि सर्वांना शिक्षा झाली.
२०० जण असणाऱ्या बीनीच्या वर्गात १५० मुस्लीम मुलगे होते. तिचा वर्गमित्र ‘मोहम्मद कासिम’वरून बाकीचे मित्र चिडवू लागले. मोहम्मदने प्रेमाचा दावा केला असला, तरी तिने निव्वळ मैत्री असण्याचे आपले मत शेवटपर्यंत कायम ठेवले. तर मोहम्मद कासिमने आत्महत्येची धमकी दिली. बीनी मात्र घाबरली नाही. त्याने गोड बोलून तिला आपल्या घरी बोलावले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले, त्याचे फोटो काढण्यात आले. ते फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिच्या वावरावर, कपड्यांवर, चर्चमध्ये जाण्यावर बंधने घालण्यास सुरुवात केली. अखेर बीनीने आपल्या कुटुंबियांना, शेजाऱ्यांना, आपल्या धर्मातील अनुभवींना बोलावले व या प्रकरणाची माहिती दिली आणि पोलिसात तक्रार केली. अखेर मोहम्मद कासिमला अटक करण्यात आली.
एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेली श्रुती इंग्रजी वाङमयात बी.ए. करत होती. मुक्त विचारसरणीत वाढलेल्या हुशार श्रुतीला आपल्या धर्माबद्दल, देवदेवतांबद्दल, शास्त्र-मंत्र याबद्दल, परंपरांबद्दल अनेक प्रश्न पडत होते, अनेक गोष्टींचे कुतुहल होते पण तिच्या या शंकांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. नेमका याचाच वापर करून, हिंदू धर्मात पुस्तके नाहीत तर मुस्लीम धर्मात अनेक गोष्टींचे ग्रंथांमध्ये दस्तावेजीकरण करण्यात आले असल्याचे गोडवे गात या धर्माबद्दलचे आकर्षण निर्माण केले गेले. हळुहळु धर्म, आईवडील याबद्दल तिच्या मनात विखारी मते तयार करण्यात आली. तिनेही या भूलथापांना बळी पडून इस्लाम स्वीकारला, एका हिंदू कुटुंबातली मुलगी मित्रांच्या संगतीत राहून हिजाब घालू लागली. जिहादी विचार तिच्या मनात डोकावू लागले. मी जिहादी झाले होते, प्रसंगी मी घरच्यांची हत्याही केली असती हे तिने स्वतः न्यायालयात कबूल केले. पण योग्य वेळी तिचे समुपदेशन करण्यात आले आणि ती प्रयत्नपूर्वक या जाळ्यातून बाहेर पडली.
पण तारा, बीनी, श्रुतीप्रमाणे सगळ्याच मुलींना प्रेमपाशातून बाहेर येथे शक्य होते असे नाही. अनेक मुली लव्ह जिहादला बळी पडतात आणि धर्मांतरित होतात. प्रसंगी आपले प्राणही गमावतात. निकिता तोमरची केस आपण जाणतोच. २६ ऑक्टोबर रोजी परीक्षा देऊन परतताना तौसिफने तिला गोळ्या घालून ठार मारले. तौसिफकडून तिला धर्मांतरासाठी सक्ती केली जात होती. सीसीटीव्हीवर कैद झालेली ही घटना सगळ्यांनी पाहिली. ‘जिया’ या आपल्या संस्थेच्या मार्फत ऍड. मोनिका अरोरा यांनी निकिताच्या कुटुंबियांची भेट घेतली. निकिताच्या वडलांना आपल्या मुलीला सैन्यात पाठवायचे होते. ती एक हुशार विद्यार्थिनी होती. पण तौसिफकडून तिच्यावर वारंवार इस्लाम धर्मांतरासाठी आणि लग्नासाठी दबाव येत होता. विविध मार्गांनी त्याने तिचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण निकिताने धर्म बदलण्यास ठाम नकार दिला म्हणून तिला मारून टाकण्यात आले. ऐश्वर्याने लव्ह जिहादची शिकार झाल्याचा धक्का सहन न होऊन आत्महत्या केली. सोनिका मिश्राशी मुस्लिम मुलाने हिंदू असल्याचे सांगून विवाह केला व तिला इथिओपियाला घेऊन गेला, तिथे तिला चाळीस लाख रुपयांना विकण्यात आले. शेजाऱ्यांची मदत घेऊन कशीबशी जीव वाचवत ती भारतात परतली. आज कोर्टात तारखांवर तारखा पडत आहेत. अशा असंख्य मुलींचे जीवन लव्ह जिहादपायी मातीमोल झाले.
ऍड. मोनिका अरोरा यांनी सत्यशोधन समितीच्या माध्यमातून अशा धर्मांतरित झालेल्या २० मुलींचे इंटरव्ह्यू घेतले. वर दिलेल्या उदाहरणांचा त्यात समावेश आहे. या समितीने त्यांच्याकडील पुरावे गोळा केले, त्यांचे म्हणणे व्हिडिओ रेकॉर्ड केले. जवळपास प्रत्येक मुलीची प्रतिक्रिया ही विवाहानंतर आपण नरकयातना भोगले आहेत अशीच होती. सत्यशोधन समिती अहवाल तयार करत असल्याचे स्पष्ट करत ट्वीटरच्या माध्यमातून लव्ह जिहादसंबंधी उपलब्ध मटेरियलची मागणी करण्यात आली. तिथेही पुराव्यांचा अक्षरशः पाऊस पडला. केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या.
या पुराव्यांचे अवलोकन केल्यावर लक्षात आले की, ‘लव्ह जिहाद’ ही केवळ भारतापुढील समस्या नाही. जगभरात लव्ह जिहादच्या केसेस वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. विशेषतः युरोपात, त्यातही इंग्लंडमध्ये लव्ह जिहादच्या केसेसचे स्वरूप लक्षणीय आहे. डॉ. एला हिल म्हणाल्या की, मागील ४० वर्षांत युरोपातील पाच लाख मुलींवर या ग्रूमिंग गँगने अत्याचार केले आहेत. त्यांच्यावर हिजाब घालण्याची, धर्मांतराची सक्ती केली आहे. यातील अल्पवयीन मुली १२, १४, १६ अशा विविध वयोगटातील आहेत. श्वेतवर्णी, हिजाब न घालणाऱ्या व अंगभर वस्त्रे परिधान न करणाऱ्या, नाचगाण्यात रस असणाऱ्या, इस्लामच्या शिकवणुकीच्या विरोधीतील अशा प्रत्येक बिगरमुस्लिम मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे मत असणाऱ्या कडव्यांनी हे अत्याचार केले आहेत. ‘रॉटरहॅम’मधील रिपोर्ट्सनुसार (जो टाईम मॅगझिनमध्ये प्रकाशित झाला आहे) १९९७-२०१३ या काळात १४०० ब्रिटिश मुलींचे मुस्लिम व्यक्तींकडून लैंगिक शोषण करण्यात आले आहे. पाकिस्तानी-ब्रिटिश मुस्लिम टॅक्सी ड्रायव्हरर्सनी ड्रग्स, अल्कोहोल, चॉकलेटमधून अमली पदार्थ देऊन हे शोषण केले आहे. या घटनांमध्ये अनेकींनी आपले मानसिक स्वास्थ्य कायमचे गमावले आहे. पोलीस, प्रशासन यांनीही आपल्यावर मुस्लीमविरोधी, अल्पसंख्याकविरोधी डाग उमटू नये त्यामुळे या प्रकरणांत नीट कारवाई केली नाही. ‘बर्मिंगहॅम’मध्ये शीख समाजाच्या ‘शीख मेडिटेशन अँड रिहॅबिलिटेशन’ अर्थात ‘स्मार्ट’ या संस्थेच्या अहवालानुसार अनेक शीख मुलींना पाकिस्तानी ब्रिटिश ड्रायव्हरनी आपली शिकार केले आहे. प्रेमपाशात ओढून, स्वप्ने दाखवून, त्यांच्या घरापासून-घरातल्यांपासून तोडून आणि नंतर ब्लॅकमेल करून सामूहिक बलात्कार केला गेला. युकेमध्ये हिंदू, शीख, युरोपीय ख्रिश्चन अशा बिगरमुस्लिम अल्पवयीन मुलींना कधी प्रेमाच्या जाळ्यात ओढून, ब्रेनवॉशिंग करून तर कधी ब्लॅकमेलिंग सारख्या अन्य मार्गांनी लैंगिक शोषण केले जाते, धर्मांतरित केले जाते, असे हिल यांनी स्पष्ट केले आहे. हा जिहाद नाही तर काय आहे? असा प्रश्न अरोरा विचारतात.
भारतातील लव्ह जिहाद हा युरोपातील ग्रूमिंग गँगपेक्षा वेगळा नाही. त्यांची मोडस ऑपरेंडी वेगळी नाही. हुशार अशा हिंदू, ब्राह्मण, विविध जातींमधील मुली, शिख-ख्रिश्चन-जैन धर्मांतील मुलींना लक्ष्य करायचे. पैसे, मोबाईल, चैनीच्या वस्तू आणणे, प्रेमाचे नाटक करणे, अटेन्शन देणे, प्रगत आणि मुक्त विचारांचे असल्याचे दाखवणे, आयुधष्याची गोडगुलाबी स्वप्ने दाखवणे अशी शस्त्रे वापरत मुलींना आपल्याकडे आकर्षित केले जाते. त्यांच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून, त्याचे फोटो-व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केले जाते. त्यावेळी त्यांच्याकडे लग्न करण्यावाचून आणि त्यासाठी धर्म बदलण्यावाचून पर्याय उरत नाही. या सगळ्या षडयंत्राला आर्थिक पाठबळ दिले जाते. तसे नसेल तर एका दिवसात लग्नासाठी काझी, वकील, स्टँप पेपर ही सगळी व्यवस्था एका दिवसात कशी उपलब्ध होईल. कोर्टात केस झाली तर कोर्ट म्हणते की ते दोघे सज्ञान आहेत लग्न करू शकतात. पण या लव्ह जिहाद अंतर्गत त्या मुलीच्या मानसिक, शारिरीक नुकसानाचे काय? दीर्घकाळ सुरू असणाऱ्या तिच्या ब्रेनवॉशिंगचे काय? त्याकडे दुर्लक्ष कसे करता येईल.
केरळमध्ये ख्रिश्चन मुलींना लक्ष्य करून लव्ह जिहाद केला जात असल्याची वाच्यता सर्वप्रथम ‘ख्रिश्चन असोसिएशन फॉर सोशल ऍक्शन’ने केली. हा रेप जिहाद आहे असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले. ‘कॅथलिक बिशप काउन्सिल’ म्हणाली, आमच्या मुलींना वाचवा. व्ही. एस. अच्युतानंदन हे केरळचे बिगरमुस्लिम मुख्यमंत्री म्हणाले होते की, केरळमधील ख्रिश्चन मुलींना लक्ष्य करून लव्ह जिहादच्या षडयंत्राच्या माध्यमातून त्यांना धर्मांतरित केले जात आहे. केरळातील मुस्लीम टक्का वाढवण्याचा, त्याला मुस्लिमबहुल राज्य करण्याचा त्यांचा हेतू आहे. २०२० साली सायलो मलबार चर्चने परिपत्रक काढले व राज्यभरात वाटले. आपल्या ख्रिश्चन परिवारातील मुलींना या षडयंत्रापासून वाचवा. हा प्रश्न पंजाब, दिल्ली, हरयाणा, बिहार या भारतातील अनेक राज्यांमध्ये प्रखर होत चालला आहे.
या विषयावरील चर्चा अधिक झडू लागल्या च्या उत्तर प्रदेशने अध्यादेश काढल्यानंतर. हा लेख लिहित असताना उत्तर प्रदेशात या चार दिवसांपूर्वी आलेल्या या अध्यादेशाअंतर्गत पहिली केस दाखलही झाली.
काय आहे हा अध्यादेश?
या अध्यादेशात लव्ह जिहादचे नाव नाही. हा अध्यादेश बेकायदेशीर धर्मांतराविरोधात आहे.
फसवणुकीने लग्न झाले असेल, लग्नाच्या वेळी खोटी माहिती पुरवल्यास, दबाव आणला असेल, धमकावले असेल तर तो गुन्हा मानण्यात आला आहे.
लग्नासाठी धर्मांतर केले असेल तर तो गुन्हा आहे. या गुन्हांसाठी एक ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि/वा पंधरा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
वधू अनुसूचित जाती वा जमातीतील असेल अथवा अल्पवयीन असेल, फसवणुकीने धर्मांतर केले असेल, तिचे लग्नासाठी धर्मांतर केले असेल तर तीन ते दहा वर्षे तुरुंगवास वा/आणि २५ हजार रुपयांचा दंड
ज्या संस्था या कामात आर्थिक मदत करतील, त्यासाठी माणसे पुरवतील, ज्या संस्था मोठ्या संख्येने धर्मांतरण करतील त्यांची मान्यता रद्द होईल. तीन ते दहा वर्षांचा तुरुंगवास आणि ५० हजारांचा दंड
जर केवळ लग्नासाठी धर्मांतर झाले असेल तर ते लग्न रद्दबातल मानण्यात येईल.
जर एखाद्या मुलीला स्वतःच्या मर्जीने लग्नासाठी धर्मांतरीत व्हायचे असेल तिला तत्पूर्वी दोन महिने जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तशी लेखी कबुली द्यावी लागेल. त्याच्या परवानगीनंतरच हे धर्मांतर होऊ शकेल. तसे न केल्यास तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
मध्यप्रदेश सरकारने अध्यादेशाचा मसुदा तयार केला आहे त्यात अशाच स्वरुपाचा मजकूर आहे. हिमाचल प्रदेशनेही असा कायदा अस्तित्वात आणला आहे. हरयाणाही लवकरच हा कायदा आणणार आहे. गुजरात, ओडिश, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्येही हा कायदा आहे.
वेगळ्या धर्माच्या दोन व्यक्तींनी विवाह करूच नये का? त्यांच्या भावनांना प्रेमाला महत्त्व नाही का? असा डाव्या विचारवंतांनी या विरोधात एक वेगळा प्रचार चालवला आहे. पण त्यासाठी आंतरधर्मिय विवाहाची व्याख्या समजून घेणे योग्य ठरेल. वास्तविक, कोणत्याही विचारसरणीच्या दोन सज्ञान व्यक्तींना आपल्याला पसंत असणाऱ्या जोडीदाराशी विवाहबद्ध होण्याचा अधिकार आहे. तो योग्यही आहे. भारतीय राज्यघटनेत लिंगसमानतेचा अधिकार, जगण्याचा, धर्माचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र जे धर्माच्या अधिकारांचे स्मरण करून देत आहेत त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की तिहेरी तलाक, हलाला, एका पुरुषाचे चार विवाह धर्माच्या अधिकारात येत नाही. जर एखाद्या व्यक्तिमुळे दुसरी व्यक्ती, समाज, समुदाय यांना कोणतेही नुकसान पोहचत नसेल, तरच त्यांना आपला धर्माचा अधिकार सांगण्याचा हक्क आहे. ज्यावेळी आंतरधर्मिय विवाहात सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येतो, तेव्हा धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता भासते. जर हिंदू मुलगा व मुस्लिम मुलगी यांच्या विवाहात त्याला मारून टाकले जात असेल, एखाद्या विवाहासाठी धर्मांतराची सक्ती असेल, एखाद्या विवाहानंतर मुलीचा छळ होत असेल, अल्पवयीन मुलींना लैंगिक शोषण करून विवाहासाठी भरीस पाडले जात असेल, ज्या विवाहासाठी ठराविक संस्था धर्मांतराची सक्ती करत असतील, जे विवाह नोंदणीकृत पद्धतीने न करता आग्रहपूर्वक निकाहनाम्याने होत असतील अशा सर्व आंतरधर्मिय विवाहासाठी या कायद्याची आवश्यकता असते.
दुर्दैवाने आजही एखादी हिंदू, ख्रिश्चन, शीख मुलगी मुस्लिम घरात विवाह करून जाऊ शकते, परत येऊ शकत नाही, आजही एखाद्या हिंदू मुलाला मुस्लीम मुलीच्या प्रेमात असल्याबद्दल जीवे मारले जाते, अल्पवयीन मुलींचे धर्मांतरासाठी लैंगिक शोषण केले जाते. हे चित्र भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्याच्या विरोधात आवाज उठवायलाच हवा, ती काळाची गरज आहे.
**