हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या शिरसाटचा जामीन अर्ज नामंजूर, एएचएलप्रकरणी गोपनीय माहिती पुरविल्याचे उघड
नाशिक, दि. ५ डिसेंबर – ओझरच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. येथे प्रतिबंधिक क्षेत्राची व तिथे उत्पादित होणाऱ्या सुखोई विमान व त्याचे पार्ट्स याची गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविणाऱ्या दीपक शिरसाटचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे, पाकिस्तानातील व्यक्तीस व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती पुरविल्याच्या आरोपातून शिरसाट याला अटक करण्यात आली होती. त्याने गोपनीय माहिती पुरविल्याचे तपासातही सिद्ध झाले आहे.
शिरसाटच्या जामीन अर्जावर शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी नाशिकच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला. त्यावेळी दहशतवादविरोधी पथकाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीने संबंधित गोपनीय माहिती अनाधिकाराने व अनधिकृतरित्या पाकिस्तानला पुरविल्याचे स्पष्ट केले. आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलमधील फोटो, माहिती, व न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेने दिलेले दाखले न्यायालयासमोर सादर करण्यात आले. दहशतवादविरोधी पथकाने न्यायालयात तपासातील गोपनीय भाग, पीडीएफ फाईल्स तसेच अतिसंवेदनशील माहिती पारीत केल्याचे तपासाच निष्पन्न झाल्याच्या बाबी व संबंधित कागदोपत्री पुरावेही दाखवले. ऍड. मिसर म्हणाले की, आरोपीने भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांतून वापरण्यात आलेले मिसाईल व लाँचर याबाबतची तांत्रिक माहितीदेखील पाकिस्तानस्थित व्यक्तिला पुरवली. सदर बाब देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी घातक आहे. या स्पष्टीकरणानंतर न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला.