अमर चित्रकथेच्या माध्यमातून उलगडणार भारतीय नौदलाचा इतिहास
मुंबई, दि. ७ डिसेंबर – भारतीय नौदलाचा रोमहर्षक इतिहास आता ‘द नेव्हल जर्नी ऑफ इंडिया’ या पुस्तिकात्रयीच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. त्याचा पहिला भाग ई-पुस्तक स्वरुपात अमर चित्रकथेच्या अँड्रॉईड ऍप्लिकेशनवर उपलब्ध झाला आहे. भारतीय नौदल आणि अमर चित्रकथा यांच्या संयुक्त विद्यमाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय नौदल दिनाच्या औचित्याने ८ डिसेंबरपर्यंत ही पुस्तिका निःशुल्क स्वरुपात उपलब्ध राहणार आहे.
भारत नावाचा लहान मुलगा आणि त्याच्या आजोबांच्या संवादातून प्राचीन नौकानयन आणि भारतीय व्यापार यांचा इतिहास उलगडण्यात आला आहे. यात जहाजबांधणीचे भारतीयांचे प्राचीन कौशल्य, प्राचीन काळापासून पाश्चिमात्यांना असणारे भारतीय मसाल्यांचे आकर्षण याचा गोषवारा घेण्यात आला आहे. विविध काळात भारतात होऊन गेलेल्या मोठमोठ्या साम्राज्यांचीही माहिती नौकानयनांच्या संदर्भातून उलडगण्यात आला आहे. यात हडप्पा संस्कृती, चोल साम्राज्य, प्राचीन सागरी व्यापार मार्ग त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या स्थापना, राणी अब्बक्का-राजा मार्तंड वर्मा यांचा इतिहास, डच-पोर्तुगीज-फ्रेंच-ब्रिटिशांचा भारतात समुद्री मार्गाने प्रवेश, इस्ट इंडिया कंपनीची स्थापना अशा अनेक गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. प्राचीन भारतापासून सुरू झालेला हा इतिहास १९५० साली रॉयल इंडियन नेव्हीचे भारतीय नौदल असे नामांतर होण्याशी येऊन थांबतो. लहान मुलांना भारतीय इतिहास आणि नौदलाची माहिती त्यांच्याच भाषेत देण्याच्या दृष्टीने ही पुस्तिका अत्यंत उपयुक्त असून लवकरच ही पुस्तिकात्रयी येत्या काही महिन्यांत छापील स्वरुपातही उपलब्ध होणार आहे.