ChristianityOpinion

हाथकातरो खांबो

टोकियोमधल्या लहान मुलांना हॉलोकॉस्टची माहिती देणारं एक सेंटर. लहान मुलांनाही इतिहासातील एक भयानक फेज लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यापासून धडे शिकण्यासाठी. सेंटर चालविणारी फ्युमिको इशिओका हॉलोकॉस्ट संदर्भातील काही चीजवस्तू मिळण्यासाठी आउश्वित्झ म्युझियमला विनंती करते. आणि एक दिवस तिला हॅना ब्रॅडी नावाच्या एका छोट्या मुलीची सुटकेस कुरियरने येते. ती त्या लहानगीचा मागोवा घेत घेत मागे जात त्या भयानक घटनामालिकेच्या इतिहासाची पानं उलगडून दाखवते. त्यावर लिहिते, ते पुस्तक जगभरात बेस्ट सेलर म्हणून विकलं जातं. 40 देशांमध्ये विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद होतो.

आणि दुसरीकडे हा हाथकातरो खांबो! गोवा इंक्वीजिशनचे प्रतीक. गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी धर्मांतरासाठी केलेल्या क्रूर कृत्यांचे साक्षीदार. अगदी इसीसइतकेच क्रूर. तिकडे काफिर – इकडे heresy! तर ह्या खांबाला त्यांना बांधलं जायचं जे ख्रिश्चन व्हायला नकार देत आहेत. आणि मग त्यांचा हात पिरगाळला जायचा तुटेपर्यंत! आणि नंतर त्या वेदनांनी तो माणूसही जायचा. म्हणून स्थानिक भाषेत हा हाथकातरो खांबो! अशा किती हजार जणांनी आपले बलिदान दिले असेल ह्याची गिणती नाही. १५ व्या शतकानंतर पोर्तुगीज इथे आले आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्मांतर सुरु केले. इथली जवळपास ३५० मंदिरे उध्वस्त केली. कोणी? तर ज्याचं थडगं बघायला आवर्जून जातो त्या सेंट? फ्रान्सिस झेवियरने. हा खांबही एका मंदिराचाच. कारण त्यावर कानडीमध्ये काही लिहिलेले आहे. ह्या इंक्विजीशन बाबत रिचर्ड झिम्लर ह्यांचे documentation आहे. त्यांनी त्याला मशिनरी ऑफ डेथ म्हटलंय. (मी वाचलेलं वा अभ्यास नाही.) स्थानिक लोकांनी एकतर धर्मांतर स्वीकारलं किंवा मृत्यू. ज्यांनी अभिमानाने मृत्यू स्वीकारला त्यांचा हा खांब साक्षीदार आहे. मात्र तो असा बेवारस अवस्थेत उभा आहे. आता त्याच्यावरूनच नुकताच एक फ्लायओव्हर झालेला दिसतोय. बहुधा त्याची जागाही काही वेळा बदलली असावी. कदाचित आधी तो चर्चच्या समोर होता. Bom Jesus Basilica ही युनेस्कोने घोषित केलेले जागतिक वारसास्थळ आहे. ह्या चर्चमध्ये येणाऱ्या ख्रिश्चन भाविकांना आपल्या पूर्वजांवर झालेल्या ह्या अत्याचाराबद्दल काय वाटत असेल असंही वाटून गेलं.

हा इतिहास आहे. मात्र अनेकांना तो मान्य नाही. आज काय त्याचं? बऱ्याच जणांची अशीच भावना असते. हॉलोकॉस्टकडे जगभरची बघण्याची नजर एक आहे. त्याची अनेक स्मारकं आहे, नोंदी आहेत, त्यावर अनेक पिक्चर्स आहेत. एखादी सुटकेस एका सध्या शिक्षिकेला मिळून ती तिला स्मृतीत राहील असं काही करते आणि पूर्ण जग त्याची नोंद घेतं. मात्र बांगलादेशी वंशसंहार आणि मिशनऱ्यांनी केलेला वंशसंहार ह्याच्याकडे आपण जगाचं लक्ष वेधून घेण्यात अपयशी ठरलो. आपल्यावरील अत्याचार articulate करू शकलो नाही. उलट बाहेरचेच रिचर्ड ब्लड सारखे काही लिहून गेले. स्मारक म्हणून हा खांब उपेक्षितच आहे. साधा त्याला काही दर्जा देता आला नाही. तिथे ना काही नावाचा फलक, ना काही माहितीफलक. नाही म्हणायला दोन हार त्यावर होते, कोणी घातले होते माहित नाही.

Back to top button