काल भोगी आणि आज मकरसंक्रांत. सूर्याचा मकरराशीत प्रवेश होतो , हा उत्तरायणाचा सोहळा म्हणजे
मकरसंक्रांत, भारतात सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
भारतीय संस्कृतीत उत्सव म्हणजे नुसताच जल्लोष, धागडधिंगा करणे अपेक्षित नाही. सणाच्या निमित्ताने निसर्गाशी नाते जोडण्याचा, अधिक दृढ करण्याचा व आरोग्यासाठी उपकारक अशा गोष्टी , समाजात उत्सवपूर्वक रुजवण्याचा प्रयत्न हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य!
हेमंत ऋतूत हवेमध्ये गारठा असतो .शीत गुणामुळे शरीरातही थंडपणा आणि कोरडेपणा वाढलेला असतो . यांना संतुलित करण्यासाठी , आहारामध्ये स्निग्ध व उष्ण गुणांचे पदार्थ समाविष्ट करणे आवश्यक असते .यासाठी अतिशय उपयुक्त अशा दोन गोष्टी म्हणजे, तीळ आणि गूळ.
गंमत अशी आहे की निसर्गसुद्धा ज्या काळात जे वापरणे ,आवश्यक असते त्याची आधीच निर्मिती आपल्यासाठी करून ठेवतो. शरद ऋतूमध्ये फुलावर असणारा तीळ , हा हेमंत ऋतुपर्यंत खाण्यासाठी चांगला तयार झालेला असतो.
तीळ हे गुणांनी स्निग्ध असतात. खरं म्हणजे तेल या शब्दाची व्युत्पत्ति तिळापासून जे बनते ते तेल अशी आहे.
तिळातील तेलामुळे शरीरामध्ये स्निग्धपणा येतो , त्वचा मुलायम होते, शरीराचं पोषण होतं . बऱ्याचजणांना कमी पडणारे कॅल्शिअम तिळामधून भरपूर प्रमाणात मिळते .
मग म्हणून मग तीळ बाराही महिने खायचे का ?
तर नाही, फक्त याचं ऋतूमध्ये खायचे आहेत. तेही नुसतेच खाल्ले जातं नाहीत, तर त्याच्याबरोबर शेंगदाणे, खोबरे असे इतर स्निग्ध जिन्नस व गूळ घालून – तिळाचे लाडू ,तिळाच्या वड्या ,गुळाची पोळी , चिकी ,गजक,रेवडी अशी वेगवेगळ्या प्रदेशानुसार, वेगवेगळ्या प्रकारची स्वादिष्ट पक्वान्ने बनवली जातात .
असा हा तिळगुळ सगळ्यांना वाटून आनंदोत्सव करायचा. त्यामुळे केवळ शरीरातला नाही, तर नात्यामधला स्नेह सुद्धा वाढतो. या तिळाबरोबर थंडीत अतिशय उपयोगी ,शरीराला ताकद देणाऱ्या , लोहतत्व वाढवणाऱ्या गुळाचा जेव्हा संगम होतो, तेव्हा अधिकस्य अधिकम् फलम्, या न्यायाने त्याचा स्वाद व उपयोगिता अधिक वाढते.
तुळशीच्या लग्नानंतर उसाची गुऱ्हाळे चालू होतात. गूळ तयार होत असताना , जी काकवी निघते ,ती उत्तम गावठी लिव्हर टॉनिक आहे. त्यामुळे या दिवसात काकवी मिळाल्यास पोळीबरोबर तुपासह अवश्य खावी .
आहारात इतर तेलांच्याऐवजी, याकाळात तिळाचे तेल वापरायला हरकत नाही .
भरपूर ताजा चारा उपलब्ध असल्यामुळे , हेमंतात गाईच्या दुधात स्निग्धांश भरपूर असतो . त्यामुळे गायीचे दूध, गाईचे तूप हे पदार्थ आहारामध्ये भरपूर प्रमाणात वापरण्यास हरकत नाही . पण हो, या सर्व पौष्टिक आहारा बरोबर , भरपूर व्यायाम मात्र करायचा आहे, नाहीतर हे सर्व खाऊन अजीर्ण होण्याची शक्यता जास्त !
वांगी ,फ्लॉवर, मटार,कोबी,पावटा, गाजर ,नवलकोल, हिरवे घाटे अशा भाज्या , बटाटा, रताळे, सुरण यासारखे कंद हे अतिशय स्वादिष्ट ,पण पचायला जड असतात . या दिवसात मात्र, या सर्व भाज्या चवीला उत्तम असतात आणि सहज पचतातही .
या भाज्या वापरून, त्याला भरपूर तेल, मसाले यांची जोड देऊन , भोगीची मसालेदार भाजी,गुजराथी पद्धतीचा उंधियो ,शेतावरील पोपटी ,हुरडा पार्ट्या असे विविध कार्यक्रम या काळात मोठया उत्साहाने केले जातात. त्यामुळे तन-मन, दोघांनाही नवी ऊर्जा मिळते हे नक्कीचं !
हेमंत ऋतूत दिवस लहान व रात्र मोठी असते, त्यामुळे सकाळी लवकर कडकडीत भूक लागते. त्यावेळी जर काही खाल्ले नाही, तर पाचकअग्नी , शरीरधातूनाच पचवून टाकतो आणि शरीर क्षीण होऊ लागते . म्हणून सकाळी उठल्यावर लगेच क्षुधाशांती करावी असे आयुर्वेदाने सांगितले आहे.
म्हणून हेमंत ऋतूत सकाळी लवकर उठून व्यायाम ,अभ्यंग, स्नान इत्यादी आटपून लवकर पौष्टिक नाश्ता करावा. आजही धुंधुरमास ही अतिशय सुंदर ,आरोग्यदायी प्रथा खेड्यातून पाळली जाते .
थंडीचा कडाका असल्याने गुणाने उष्ण असलेल्या बाजरीची भाकरी, भरपूर तूप किंवा लोणी लावून, त्याबरोबर तीळ घातलेली मुगाची खिचडी तसेच वांगी,गाजर,पावटा,हरभरे यांची चमचमीत भाजी असा भोगीचा खास बेत असतो ,आज बहुतेकांनी या बेताचा आस्वाद घेतला असेलच!
एरवी पचायला जड असणारा सुका मेवा सध्या जरुर खावा .सध्याच्या घाई गडबडीच्या जीवनात, साग्रसंगीत नाश्ता करण्यास वेळ नसल्यास खारीक, खोबरं, बदाम, पिस्ते, काजू, खसखस हे सगळे पदार्थ घालून केलेले साजूक तुपातले आणि गुळाच्या पाकात मुरवलेले डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू सवडीच्या वेळेस बनवून ठेवावे.
रोज सकाळी एक डिंकाचा वा मेथीचा लाडू एक ग्लास दूध असा इन्स्टंट नाश्ताही शरीराला उत्तम बल देणारा ठरतो. एकंदरीत या दिवसांमध्ये खाण्यापिण्याची रेलचेल असते आणि पचवण्याची ताकद असते. तरीसुद्धा अपचनाच्या बारीक-सारीक तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी सर्वात उत्तम औषध म्हणजे आले.
आल्याच्या वड्या, आलेपाक किंवा भाज्यांमध्ये मसाला म्हणून आल्याचा भरपूर वापर करावा. आल्याचा वाटून रस काढून ,त्यात लिंबू आणि सैंधव मीठ मिसळून, काचेच्या बाटलीत भरून ठेवले की ,रुचकर पाचक तयार ! पोटाच्या बारीक-सारीक तक्रारीसाठी केव्हाही चमचाभर पाचक घेतले, की काम फत्ते !
आल्यापासून बनवलेली सुंठ मात्र गुणांनी रुक्ष आणि तीक्ष्ण असल्यामुळे या दिवसात फारशी वापरू नये. खाण्यापिण्याच्या पदार्थांची यादी अजूनही बरीच मोठी आहे. त्यामुळे एका भागात लिहून होईल असे वाटत नाही.
वैद्य उर्मिला पिटकर ,मुंबई
एम् डी. पीएच् डी. (आयुर्वेद)
आयुर्वेद व्यासपीठ कोकण विभाग अध्यक्ष