संघाने ठरविलेल्या सहा उत्सवात हिंदू वर्षानुसार शेवटचा आणि इंग्रजी दिनांकानुसार म्हणजे सौरमास गणनेनुसार साजरा होणारा उत्सव !
आपल्या सामाजिक परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पूर्वजांनी मनुष्य जीवन हे ईश्वरी वरदान मानले आणि ते सार्थक असावे म्हणून कर्तव्य पालन करून कृतार्थ,निरामय आणि संपन्न असावे असा विचार केला.त्यानुसार चिंतन केले आणि जीवनपध्दतीची रचना केली. हिंदू समाजाचे उत्सव, सण,समारंभ सृष्टिशी सुसंगत आहेत. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. संक्रमण म्हणजे बदल ! सृष्टीत होणाऱ्या बदलांशी मनुष्य जीवनाचा संबंध आहे.
मकर संक्रमण या उत्सवाच्या नावात संक्रमण हा शब्द त्या अर्थाने महत्त्वाचा आहे. सूर्याचा वर्षभरात १२ राशीतून प्रवास होतो आणि मकर राशीत होणारे संक्रमण आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आपण जगाच्या उत्तर गोलार्धात राहतो. मकर संक्रांतीपासून सुरू उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. दिवस अधिक मोठा होत जातो. प्रकाश अधिक देणारे हे संक्रमण सुखदायी आणि आनंद निर्माण करणारे असते.
मकर संक्रमण आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेते ही या उत्सवामागची कल्पना आहे. भारतात हा उत्सव वेगवेगळ्या नावाने,पद्धतीने साजरा होतो. वेगवगळे पदार्थ तयार करतात. बंगालमध्ये तिळुवा संक्रांती नावाने ओळखला जातो तर दक्षिणेत पोंगल नावाने साजरा होतो. पद्धती वेगवगळ्या असल्या तरी भावना एकच आहे. संक्रांती म्हणजे सम्यक अर्थात परिपूर्ण क्रांती ! योग्य दिशेने केलेले परिवर्तन.
संघाचे कार्य सुरू झाले तेव्हा देशाची आणि हिंदू समाजाची स्थिती होती? तर देश पारतंत्र्यात होता त्यामुळे एकीकडे आक्रमणे आणि अत्याचाराने भयग्रस्त झालेला होता. याला प्रतिकार करायचा तर समाजातील बुद्धिमान वर्गाचा बुद्धिभ्रंश केलेला होता. तर दुसरीकडे हिंदू समाज हा विविध भेदांनी युक्त, आत्मविस्मृत आणि स्वत्व गमावलेला होता. आत्मविस्मृतीच्या अंधारातून हिंदू समाजाला चैतन्याच्या व जागृतीच्या प्रकाशाकडे नेणारे कार्य म्हणजे संघकार्य.
आपली संस्कृती व विचारधारा समन्वयाची आहे संघर्षाची नाही त्यामुळे क्रांतीला संघाने नवीन अर्थ दिला. समाजात जे बदल घडवायचे ते स्नेहपूर्ण आणि घट्ट संबंध निर्माण करूनच ! समाजाला दोष देऊन काहीही साध्य होणार नाही,त्याऐवजी गुणांची वाढ केली तर समाजात योग्य आणि सकारात्मक बदल होतात असा संघाचा विश्वास आहे. एकात्मता, समरसता,देशभक्ती आणि राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होईल असे संस्कार करणारी अनोखी कार्यपद्धती संघशाखेच्या माध्यमातून विकसित केली व त्यातून व्यक्ती निर्माण होईल असा प्रयत्न सुरू केला. व्यक्ती घडविण्याचे काम संघ करतो आणि व्यक्ती घडली की एकसंघ राष्ट्र आपोआप निर्माण होईल असा संघाचा विश्वास आहे.
येत्या विजया दशमीला (दसरा) संघाला ९५ वर्षे पूर्ण होतील. संघाबद्दलचा समाजाचा विश्वास वाढतो आहे तसा समाजाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. हिंदू समाजाला आपली ओळख करून देण्याचे काम संघाचे आहे आणि त्याची चुणूक समाजात हळू हळू दिसते आहे.
३७०- ३५ अ कलम असो की राम मंदिर पुनर्निर्माण कार्य असो हिंदू समाज उत्साही झाला आहे. याचा अर्थ सगळ्या समस्या संपल्या आहेत असं नाही, आपले शेजारी देश आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत, देश विघातक शक्ती मधून मधून डोके वर काढताना दिसतात. समाजातले विविध भेद कायम रहावेत म्हणून देशांतर्गत काही शक्ती सतत प्रयत्नशील असतात.
संघाचा प्रभाव ठरविण्याचे दोन निकष आहेत एक समाजात जे सकारात्मक घडावे असे वाटते ते घडविता येईल अशी शाखेची स्थिती आहे का ? आणि दुसरा निकष समाजात जे घडू नये असे वाटते ते थांबवण्याची ताकद समाजात निर्माण केली आहे का ? यावरून संघ शाखा कशासाठी याचा बोध होईल. हे काम तडीस नेण्यासाठी संघ समाजातील सज्जन शक्ती जागृत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करत आहे.
अजूनही ज्याच्या प्रभावातून आपण पूर्णपणे मुक्त झालेलो नाही अशा कोरोना काळात संघ , समाजातील अनेक संस्था आणि सज्जन शक्ती एकत्रित येऊन या संकटाचा सामना प्रभावीपणे केला आणि जी भीती अनेकांनी व्यक्त केली होती की देश या संकटातून बाहेर पडणार नाही, प्रचंड मनुष्यहानी होईल तसं काही झालेले नाही आणि हे समाजाचे यश आहे.
संघाचे काम साज जागृतीचे आहे सेक्युलॅरिझम, ग्लोबायझेशन, पाश्चत्यांचे अंधानुकरण , भ्रष्टाचार,लाचखोरी अशा मोहांपासून समाजाला जागे करायचे आहे. जागृतीतून समाजात परिवर्तन घडेल यावर संघाचा विश्वास आहे. अनेक बाबतीत असे परिवर्तन घडवले आहे त्याचा समाज अनुभव घेताना दिसतो आहे.
संघ आपल्या शाखांच्या माध्यमातून, आपल्या संघटन श्रेणी,जागरण श्रेणी, गतिविधि त्यामध्ये समरसता, गोसेवा, ग्रामविकास, धर्मजागरण, कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण याद्वारे वर्षानुवर्षे शांतपणे, सातत्याने आणि अथकपणे काम करतोय.अन्य सामाजिक संस्था आणि सज्जन शक्तीचा योग्य तो प्रतिसाद मिळतो आहे. देशावर,हिंदू समाजावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक, मानव निर्मित, देश विघातक शक्तिंकडून आपत्ती आल्या तेव्हा संघ समाजाला घेऊन समर्थपणे उभा राहिला. संघाची शक्ती जसजशी वाढली तसे संघ कार्यकर्ते अन्य क्षेत्रात उतरले. आज कोणतेही क्षेत्र उरले नाही की जिथे संघाच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी संघटना उभ्या राहिलेल्या संघटना नाहीत. संघालाहिंदू समाजाची सर्व क्षेत्रे प्रभावित करायची आहेत.
तिळाची स्निग्धता आणि गुळाचा घट्टपणा (चिकटपणामुळे) याचा समन्वय असलेला तिळगुळ शाखा आणि त्याच्या गट पट माध्यमातून शाखा परिसरातील सर्व समाजापर्यंत नेऊन योग्य ते परिवर्तन घडवेल आणि “परम वैभवम नेतुमेतत स्वराष्ट्रम”हे ध्येय साकार करेल यात शंका नाही.