तीरा कामतच्या औषधाचा सहा कोटी कर केंद्र सरकारने केला माफ

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी – मुंबईतील पाच महिन्यांच्या तीरा कामत हिच्यावर उपचार करण्यासाठी लागणारे अत्यंत महागडे औषध अमेरिकेतून आयात करण्याची गरज आहे. या औषधावरील आयात कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला या विषयी पत्र लिहिले होते. या निर्णयानंतर फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधानांचे आभार मानले.
अवघ्या पाच महिन्यांच्या तीरा कामत हिला ‘जीन रिप्लेसमेंट’ उपचारांची नितांत गरज आहे. तिच्या आजारावर उपचार करण्यासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार आहे. या औषधाची किंमत तब्बल १६ कोटी रुपये इतकी आहे. या खर्चासाठी क्राऊड फंडिंगचा आधार घेतला गेला व त्याला लोकांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. औषधाची पूर्ण रक्कम या माध्यमातून गोळा झाली. मात्र, हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे ६.५ कोटी रुपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
तीरावर वेळेत उपचार व्हावेत यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी १ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून औषधावरील या सर्व करांतून सूट देण्याची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तत्काळ कर माफीचे निर्देश देताच, तातडीने त्यावर कार्यवाही झाली आणि त्यानुसार, ९ फेब्रुवारीला या औषधापुरता सर्व कर माफ करणाच्या आदेश वित्त विभागाने जारी केला.