तवांगला अरुणाचलमध्ये समाविष्ट करणाऱ्या मेजर खातिंग यांच्या स्मारकाचे अनावरण
तवांग या भूभागाला अरुणाचल प्रदेशमध्ये सहभागी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या मेजर रालेंगनाओ बॉब खातिंग यांचा ७० वर्षांत पहिल्यांचाच सन्मान करण्यात आला. रविवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडिअर(नि.) बी.डी. मिश्रा यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
मणिपूरच्या तंगखुल नगा समुदायात जन्मलेले मेजर खातिंग यांनी तत्कालीन नॉर्थ इस्ट फ्रंटिअर अर्थात नेफाचे साहायक राजनैतिक अधिकारी म्हणून १७ जानेवारी १९५१मध्ये रक्ताचा एकही थेंब वाहू न देता तवांग भूभाग भारताच्या नकाशात जोडला. आसामच्या तत्कालीन राज्यपाल जयरामदास दौलतराम यांच्या आदेशानरून आसाम रायफल्सच्या २०० जवानांना सोबत घेऊन ही महत्त्वपूर्ण मोहीम पार पाडली. यापूर्वी तवांग तिबेटच्या अधिपत्याखाली होता.
त्यानंतर इंडियन फ्रंटिअर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसचे पहिले अधिकारी, नागालँडचे मुख्य सचिव आणि विदेशातील वनवासी समुदायाचे पहिले राजदूत झालेले खातिंग यांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल केव्हाही सन्मानित करण्यात आले नाही. त्यांच्या प्रशासनिक आणि सार्वजनिक जीवनातील कार्यासाठी त्यांना पद्मश्री आणि ब्रिटिश सरकारच्या वतीने मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र तवांगच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांचा कोणताही सन्मान करण्यात आला नाही. शनिवारी खातिंग यांचे पुत्र जॉन(सेवानित्त आयआरएस अधिकारी) आणि अन्य कुटुंबियांच्या उपस्थितीत कालावांगपू ऑडिटोरिअममध्ये स्मारकाचे अनावरण संपन्न झाले.
**