हैदराबाद, दि. १ मार्च – अखंड भारत ही आज काळाची गरज आहे. भारतापासून वेगळे झाल्यानंतर पाकिस्तानसारखे देश आज प्रचंड संकटात सापडले आहेत. तिथे शांतता, स्थैर्य नाही. भारतापासून वेगळे झालेल्या या देशांनी आपल्या मूळ भूमीत परत यायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी येथे केले.
बळाचा वापर करून अखंड भारताची संकल्पना साकारली जाऊ शकत नाही. केवळ हिंदुत्वाच्या माध्यमातूनच हे शक्य होऊ शकणार आहे, असे सरसंघचालकांनी सांगितले.
सर्व धार्मिक ग्रंथांच्या वाचनातून मनात भारतभक्तीचा उदय होत असतो. अनेक महापुरुषांना असा प्रत्यय आला आहे की, हिमालयाचे दोन्ही हात जिथपर्यंत जातात, तितकी भूमी भारताची आहे. भारतमातेसाठी तन-मन-धनाने काम करणार्या सर्वांना याची अनुभूती आली आहे की, या भूमीत साक्षात जगतजननीचा वास आहे. जग अनेक समस्यांचा दोन हजार वर्षांपासून सामना करीत आहे. यावर अनेक प्रकारचे प्रयत्न झाले, पण समाधानकारक परिणाम समोर आले नाहीत. अनेक चर्चा झाल्या, पण त्या समुद्रमंथनासारख्याच राहिल्या. यातून विषही निघाले आणि रत्नही निघाले. या मंथनातून जी प्राप्ती झाली, त्याला काहीच अर्थ नाही. आपल्या सृष्टीचा नाश होईल, असे विषही निघाले. हे विष पिण्याची क्षमता असलेले महादेव कुठे आहेत, ते भारतात आहेत. दोन हजार वर्षांपासून आपला देश अनेक तुकड्यांमध्ये वाटला गेला. या स्थितीतही संपूर्ण जगाचा ज्यावर विश्वास आहे, तो भारत देशच आहे, असे विचारही सरसंघचालकांनी मांडले.
डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी भारतावर जगाचा किती विश्वास आहे, याचे एक उदाहरण दिले. आपले एक केंद्रीय मंत्री जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी विदेशात गेले होते. या परिषदेच्या एक दिवस आधी मध्यपूर्वेतील सर्व देशांमधील मंत्र्यांचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. अन्य देशांसोबत व्यापारी करार करणे, ही आमची अपरिहार्यता आहे. ते फसवतात, हे माहिती असतानाही आम्हाला ते करार करावे लागतात. मात्र, भारत असा एकमेव देश आहे, ज्यावर आम्ही संपूर्ण विश्वास ठेवू शकतो, असे या शिष्टमंडळाने सांगितल्याचे मोहनजी म्हणाले.
संपूर्ण जगाच्या कल्याणाकरिता वैभवशाली अखंड भारताची निर्मिती होणे आवश्यक आहे. संपूर्ण पृथ्वी आपले कुटुंब आहे, ही भावना मनात जागृत व्हायलाच हवी. यासाठी प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांतिले.
‘ते’ देश ‘भारत’ ही ओळख गमावून बसले
आजच्या भारतापेक्षाही पूर्वीच्या अखंड भारतापासून दूर गेलेल्या भागांना, त्यांनी गमावलेली ‘भारत’ ही ओळख परत मिळवण्यासाठी एकत्र आणण्याची गरज आहे. त्यांना भारताशी जोडायचे आहे, त्यांच्यावर सत्ता करायची नाही. ही भावना म्हणजेच िंहदुत्व आहे. हाच आमचा धर्म आहे आणि तोच आमचा प्राण आहे, असे विचारही त्यांनी व्यक्त केले.
अखंड भारत देखील शक्य आहे
1947 च्या फाळणीच्या काही महिन्यांपूर्वी काही लोकांना शंका होती. खरोखरच पाकिस्तान स्वतंत्र देश होईल का? देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांना याबाबत विचारले असता, हे मूर्खांचे स्वप्न आहे, असे ते म्हणाले होते, पण ते घडले. ब्रिटिशांच्या राज्यकाळातही लॉर्ड वेव्हल म्हणाले होते की, परमेश्वराने अखंड भारत बनविला होता, त्याचे तुकडे कोण करू शकेल? मात्र, दुर्दैवाने भारताची फाळणी झाली. जे अशक्य वाटत होते, ते शक्य झाले. आता अखंड भारताची गरज आहे आणि ही बाब देखील शक्य आहे.
गांधारचे उदाहरण
गांधार राज्य नंतर अफगाणिस्तान झाले. तेव्हापासून आतापर्यंत या देशात शांतता आहे का, पाकिस्तान अस्तित्वात आले, तेव्हापासून आतापर्यंत हा देश स्थिर आहे का? हे दोन्ही देश भारताचाच भाग होते. मुळापासून दूर गेल्यानंतर तिथे सुखशांती कशी राहील. भारताशी जुडल्यानंतर सर्व काही प्राप्त होईल. कोण कोणत्या धर्माची पूजा करतो, काय खातो, हा मुद्दाच त्यानंतर राहणार नाही. या भारत मातेच्या स्वयंपाक घरातून कुणीही उपाशी जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सौजन्य – दैनिक तरुण भारत, नागपूर