
नवी दिल्ली, दि. १ मार्च – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी येथे उभ्या राहणाऱ्या भव्य मंदिराच्या निर्मितीसाठी मकर संक्रांतीपासून प्राप्त झालेली निधी समर्पण मोहीम शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. अभूतपूर्व अशा या मोहिमेने आपल्या चिरस्मरणीय आठवणी मागे ठेवल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष आणि मोहिमेचे राष्ट्रीय संयोजक ऍड. आलोक कुमार म्हणाले की, सुमारे दहा लाख टोळ्यांमधील ४० लाख समर्पित कार्यकर्त्यांनी जगातील सर्वात मोठ्या मोहिमेअंतर्गत आम्ही प्रांत जिल्हा, तालुका आणि गावांमधील घराघरात जाऊन समर्पण निधी प्राप्त केला. त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामाप्रती असणारी श्रद्धा, विश्वास आणि समर्पण भावनेने आम्ही भारावून गेलो. विश्व हिंदू परिषद हिंदू समाजाचे औदार्य, समरसता आणि एकात्मतापूर्ण समर्पणाप्रती कृतज्ञता व्यक्त करते.
आलोक कुमार म्हणाले की, लाखो गाव आणि शहरांतील कोट्यवधी हिंदू कुटुंबांनी भावभक्तीपूर्वक यात सहभाग घेतला. या मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी अनेक भावूक क्षणांचा अनुभव घेतला. तसेच अनेक व्यक्तींना त्यांच्या क्षमतेहून अधिक समर्पण करतानाही पाहिले. प्रभू श्रीरामांसाठी साश्रूनयनांनी अनेक भक्तांनी यथाशक्ती समर्पण केले. अनेक ठिकाणी निधी समर्पण टोळीस रामदूत मानून त्यांचे अगत्याने स्वागत करण्यात आले. भारताचे प्रथम नागरिक असणारे राष्ट्रपती ते फूटपाथवर राहणारी एखागी व्यक्ती यांनी पवित्र कार्यासाठी निधी समर्पण करून स्वतःला प्रभू श्रीरामांशी जोडले. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी होणारे हे भव्य राममंदिर हे राष्ट्रमंदिराचेही प्रतीक असेल. जगातील सर्वात मोठ्या अशा या महाअभियानाचे आकडे, अनुभव आणि प्रेरक प्रसंगांचे संकलन करण्याचे कार्य सुरू झाले आहे. लवकरच ही माहिती देशासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.