
अहमदनगर : मंदिरात केल्या जाणाऱ्या आरतीसंबंधीत वादातून नगर शहराजवळ सूर्यनगर येथे राहणाऱ्या महिलांना नोव्हेंबर 2020 मध्ये विशिष्ट अल्पसंख्याक समुदायाकडून अमानुष मारहाण झाली होती. गुरुवारी (ता.4 मार्च) पद्मपुरस्काराने सन्मानित, भटके-विमुक्तांसाठी भरीव कामगिरी करणारे ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी त्या सर्व पीडितांची नगर येथे जाऊन भेट घेतली. त्यावेळी विवेक विचार मंचाचे चंद्रकांत जाधवदेखील उपस्थित होते

२६ नोव्हेंबर २०२० रोजी नगर शहरातील सूर्यनगर भागात राहणाऱ्या महिलांना जबर मारहाण झाली होती. विशिष्ट अल्पसंख्याक समुदायाकडून या महिलांना मारहाण झाली होती. वस्तीतील गणेश मंदिरात होणाऱ्या आरतीच्या आवाजावरून सुरू असलेल्या वादातून ही मारहाण झाल्याचे पीडित महिलांचे म्हणणे आहे. परंतु कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते. त्यांना मारहाण होत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पीडित महिलांची तक्रार घेत असताना पोलिसांनी सहकार्य केले नाही , असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पोलिस प्रशासनाने अश्लाघ्य भाषेत अत्यंत अवमानकारक शब्द वापरले असा आरोप महिलांकडून झाला होता. अर्वाच्च भाषेत पोलिसांनी दमदाटी केली, तडीपार करण्याच्या धमक्या दिल्या, असे महिलांनी सांगितले आहे. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी नगर येथे घटनास्थळी जाऊन संबंधित महिलांची भेट घेतली. त्यावेळी पीडित महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या.
गिरीश प्रभुणे यांनी अनेक वर्षे भटके-विमुक्त समाजासाठी काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन यंदा भारत सरकारने त्यांचा पद्मश्रीने गौरव केला आहे.