
नवी दिल्ली, दि. ६ मार्च – श्रीरामजन्मभूमी जनसंपर्क आणि निधी समर्पण अभियान पूर्ण झाले असून विश्वातील या सर्वात मोठ्या अभियानामुळे भारताच्या एकात्मतेचे दर्शन घडले आहे. मंदिराच्या पायाभरणीसाठी जमिनीच्या दृढीकरणाचे कार्य येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होत आहे. ठरल्याप्रमाणे २०२३मध्ये मंदिराच्या निर्माणाचे काम नक्की पूर्ण होईल असा विश्वास श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव, तसेच विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष श्री चंपतराय यांनी व्यक्त केला. श्रीराममंदिराच्या जनसंपर्क अभियानाच्या समाप्तीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले की, आम्ही चार लाख गावांपर्यंत संपर्क करण्यात यशस्वी झालो आहोत. १० कोटी कुटुंबाशी संपर्क झाला आहे. या अभियानादरम्यान १ लाख ७५ हजार टोळ्यांच्या माध्यमातून नऊ लाख कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क केला. ३८ हजार १२५ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समर्पित निधी बँकांमध्ये जमा करण्यात आला. अभियानाची पारदर्शिता कायम रहावी यासाठी ४९ नियंत्रण केंद्रे स्थापन करण्यात आली. दोन चार्टर्ड अकाऊंटंटच्या निगराणीखाली तसेच २३ कार्यकर्त्यांनी संपूर्ण भारतात सतत संपर्क ठेवला. हैदराबादच्या धनुषा इन्फोटेक कंपनीने तयार केलेल्या ऍपच्या माध्यमातून कार्यकर्ते, बँका आणि न्यासात सेतू म्हणून भूमिका बजावली.
अद्याप अंतिम आकडे हाती येणे बाकी असले तरी ४ फेब्रुवारी पर्यंत हाती आलेल्या तपशीलानुसार समर्पण राशी २५०० कोटींचा आकडा ओलांडेल असे ते म्हणाले. पूर्वांचलातील अरुणाचल प्रदेशातून ४.५ कोटी, मणिपूरमधून २ कोटी, मिझोरममधऊन २१ लाख, नागालँडमधून २८ लाख आणि मेघालयात ८५ लाख तर दक्षिण भारतातील तामिळनाडूमधून ८५ कोटी आणि केरळमधून १३ कोटी इतका निधी समर्पित करण्यात आला आहे.
निधी संकलनाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राजस्थानात सर्वाधिक निधी समर्पण झाले. पश्चिम बंगालमध्ये निधी समर्पण अभियानात कोणत्याही स्वरुपाचा अडथळा आला नाही. पण तामिळनाडूमध्ये मात्र कार्यकर्त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.
मंदिरासाठी अतिरिक्त जागा घेतल्याच्या मुद्द्यावर विचारले असता चंपतराय म्हणाले की, प्रत्यक्ष मंदिरासाठी जागा विकत घेण्यात आलेली नाही. तर मंदिरासमोरील प्रांगण तसेच अन्य व्यवस्था डोळ्यासमोर ठेवून तो निर्णय घेण्यात आला.