
भाग्यनगर, दि. 8 मार्च – तेलंगण राज्यातील निर्मल जिल्ह्यातील भैसा शहरात रविवार, ७ मार्च रोजी झालेल्या हिंसाचाराने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. झुल्फिकार वसाहतीत उद्भवलेल्या छोट्या वादाचे रुपांतर तीव्र संघर्षात झाले व हा संघर्ष शहराच्या विविध भागांत पसरला. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास काही युवकांचा समुह सायलेंसर काढलेल्या दुचाकींवरून शहरात फेऱ्या मारत होते असेही सूत्रांकडून समजते.
शेतकरी तसेच शेतमजूर दिवसभराच्या कामाने थकल्याने आराम करत असून मोठ्या आवाजात गाड्या चालवण्याचा त्यांना त्रास होत असल्याचे रहिवाशांनी युवकांना सांगितले. तसेच त्यांनी मोठ्या आवाजाच्या, सायलेन्सर काढलेल्या गाड्या चालवू नयेत असेही सांगण्यात आले. या संभाषणानंतर वाद निर्माण झाल्यावर दोन्ही समुहानी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. हा हिंसाचार वाढत जाऊन बट्टी गल्ली, पंजे शा चौक, कोरबा गल्ली, टाऊन बस स्टँड अशा अनेक भागांत पसरला.
गाड्या चालविणाऱ्या युवकांनी समोरच्या गटातील व्यक्तींच्या दोन ऑटोरिक्शा, एक चारचाकी आणि दोन दुचाकी जाळून टाकल्या. तसेच तलवारी नाचवत वसाहतीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही घरे आणि एक भाजीचे दुकानही जाळून टाकण्यात आले.
जे पत्रकार या हिंसाचाराचे वृत्तांकन करण्यास गेले होते त्यांच्यावरही तलवारीने हल्ला करण्यात आला. पत्रकारांवरील हल्ल्यात आंध्र ज्योती, इनाडू आणि राज न्यूजचे देवा, विजय आणि प्रभाकर यांना दुखापत झाली आहे. पैकी पहिल्या दोन पत्रकारांना खोल जखमा झाल्याने तातडीने निझामाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दगडफेकीमध्ये एक पोलीस अधिकारी आणि दोन हवालदार जबर जखमी झाले. अन्य चार युवकांनाही दुखापत झाली.
हिंसाचारात जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रात्री दहाच्या वाजेपर्यंत संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोकाट फिरणाऱ्या समुहांवर नियंत्रण मिळवण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलिस पथकांची व्यवस्था शहरात करण्यात आली होती.
भाजपाचे तेलंगणा राज्य प्रमुख बंदी संजय यांनी या हिंसाचाराचा निषेध नोंदविला. पत्रकार, पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांमुळे आपल्या मनाला वेदना झाल्याचेही ते म्हणाले. या हल्ल्यांबाबत जाब विचारताना आपण भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात राहतो आहोत की पाकिस्तानात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांनी सरकारमधील उच्चपदस्थांच्या दबावाला बळी पडून समाजातील एका गटाला वाचविण्याचा प्रयत्न करू नये अशी ताकिदही त्यांनी दिली. शहरात पुन्हा अशा हिंसाचाराच्या घटना घडू नयेत म्हणून भैसा येथील घटनेवर ताबडतोब कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली. सरकार समाजातील एका विशिष्ट समुदायाचे लाड करीत असून हेच भैसा हिंसाचारामागील कारण असल्याचे प्रतिपादन ही त्यांनी केले. शहरात वरचेवर होणाऱ्या हिंसाचाराची जबाबदारी शासनाने स्वीकारावी असेही ते म्हणाले. या हिंसाचारात जखमी झालेल्यांना पुढील उपचारांसाठी भाग्यनगर येथे हलवावे असेही बंदी संजय यांनी सुचवले.
**