२६ जानेवारी २००३… ६२ वर्षांच्या विमला कुमावत हाच आपला जन्मदिन असल्याचे सांगतात. खरे तर हा त्यांचा जन्मदिन नव्हे तर पुनर्जन्म आहे. वास्तविक अनेक वयोवृद्ध व्यक्तींप्रमाणे त्यांनाही आपला जन्मदिवस लक्षात नाही. पण संघाचे ज्येष्ठ प्रचारक धनप्रकाश त्यागी यांच्या प्रेरणेने जयपूरमधील आपल्या घराशेजारील वाल्मिकी वस्तीतील कचरा वेचणाऱ्या पाच मुलांना त्या आपल्या घरी शिकविण्यासाठी घेऊन आल्या होत्या हे मात्र त्यांना लख्ख आठवतं. तीन मुले, सुना, नातवंडांनी भरलेल्या घरातील आठवी पास विमया यांनी ४८व्या वर्षी कचरा वेचून पैसे मिळवणाऱ्या आणि गुजराण करणाऱ्या, व्यसनी मुलांच्या आयुष्याला दिशा देण्याचा निर्णय घेतला.
मेहतरांच्या या वस्तीची अवस्था फारच बिकट होता. गचाळ वस्तीत, आजूबाजूला वावरणारी डुकरे, व्यसनी आईवडील अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा विचार कोण करणार होतं?
एखाद्या देवदुतासारख्या विमला त्यांच्या जीवनात आल्या. त्यांची नखे काढणे, नाक पुसणे इथपासून त्यांना शिक्षित आणि सुसंस्कारित करण्याचे कार्य विमला यांनी सुरू केले. एका साधारण गृहिणीचा हा अद्भूत संकल्प, निःस्वार्थ सेवाभाव, निरंतर परिश्रम यामुळे या मुलांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलून गेली. सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तीन वर्षांपूर्वी विमला यांच्या घरात सुरू असणाऱ्या शाळेचे रुपांतर सेवाभारती बाल विद्यालयात झाले. या शाळेत आज ४००हून अधिक मुले शिकत आहेत.
बारावीत शिकणारी शिवानी विमला यांच्या वसतीगृहात आपल्या धाकट्या बहिणीसह आली तो दिवस आजही विसरलेली नाही. मातापित्याच्या निधनानंतर या दोघी चार चुलत भावांसह एका झोपडीत राहात होत्या. शिवानीला तेव्हा विमला यांच्या शाळेत यायचे नव्हते मात्र दहावीत पण त्यांच्यात शाळेत शिकून जेव्हा ६२ टक्के मिळाले तेव्हा आपल्या (विमला)आजीच्या गळ्यात पडून मनसोक्त रडली होती.
अशीच गोष्ट आहे लोकेश कोळीची. बी.कॉम. तृतीय वर्षाचा विद्यार्थी लोकेश आज शिकता शिकता बाल विद्यालयात शिकवण्याचेही काम करतो. लोकेश एक प्रतिभासंपन्न बासरी वादकही आहे. विधवा मातेसह तीन भावंडांसोबत राहणाऱ्या लोकेशला विमला या हट्टाने शिकायला घेऊन आल्या होत्या तेव्हा तो अवघ्या आठ वर्षांचा होता.
सध्या बीएच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या लक्ष्मीला आठवीची परीक्षा देण्यास उद्युक्त करण्यासाठी विमला यांनी स्वतः आठवीची परीक्षा पुन्हा एकदा दिली.
विमला यांचे कार्य दिसते त्यापेक्षा कठीण होते. विशेष म्हणजे या मुलांचे पालक त्यांना शिक्षणासाठी पाठविण्यास अजिबात तयार नव्हते. कचऱ्यातून प्लास्टिक निवडून दररोज पंधरा वीस रुपये कमावणे हे त्यांच्या दृष्टीने मुलांच्या शिक्षणापेक्षा अधिक मोलाचे होते. तीन वर्षे मुलं विमला यांच्या घरात शिकली पण जेव्हा विद्यार्थ्यांची संख्या १००च्या वर गेली तेव्हा सेवाभारतीच्या सदतीने विद्यालय तंबूमध्ये भरविण्यास सुरुवात झाली. शिक्षणासह भगवदगीतेचे श्लोक, बाल रामायण याचीही शिकवण दिली जाते. हार्मोनिअम, ढोलकी शिकवण्यात येते. उन्हाळी सुट्टीत शिवणकाम, वीणकाम शिकवले जाते. जयपूरच्या हिंदू आध्यात्मिक समारंभात मंचावर जेव्हा या मुलांनी मधूर आवाजात बाल रामायण गायले तेव्हा धनप्रकाश यांचेही डोळे भरून आले.
आज शारदा एनक्लेव्ह या दोन मजली इमारतीत सुरू असणाऱ्या या विद्यालयात शिकणाऱ्या ३२५ मुलांचा खर्च जनसहभागातून केला जातो. ३६ मुले ही संस्थेच्या वसतीगृहात राहतात. आपले घर सोडून विमला या वसतीगृहातील मुलांसोबतच राहतात. मोठ्या मुलांना वेगवेगळ्या परीक्षा देण्यासाठी त्या स्वतःच घेऊन जातात. या विद्यालयाची एक शाखा सांगानेरमध्ये बक्सावाल येथे एका तंबूतही भरते, जिथे १२५ मुले शिकतात.