प्रलंबित विकासकामांना मिळणार वेग
कळवण, दि. १५ मार्च : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जात समावेश करण्यात आला आहे. गडास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने सुमारे २५ कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे गडावरील विविध प्रलंबित विकासकामांना आता वेग मिळणार आहे.
सप्तशृंगी गड २००१ पासून ‘क’ वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र होते. गडावर येणाऱ्या भाविकांच्या तुलनेत उपलब्ध सुविधांची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. अंतर्गत रस्तेदुरुस्ती आणि पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. भाविकांच्या संख्येच्या मानाने येथे मूलभूत सुविधांची कमतरता होती.
सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी ग्रामपंचायत व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रयत्नशील असून, सप्तशृंगी गडावरील पाणीटंचाई, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, जलवाहिनी, सुलभ स्वच्छतागृह, निवाराशेड, भक्तनिवास, बसस्थानक, गावांतर्गत सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मुख्य रस्त्यावर डोम, व्यावसायिक गाळे, भाविकांसाठी चिंतन हॉल व प्रतीक्षागृह, सुसज्ज रुग्णालय आदी कामांचा विकास आराखडा मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे.