गडचिरोली, दि. १९ : सिरोंचा तालुक्यातील रस्त्यावर रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला नसून काम बंद करा, असा धमकीवजा संदेश बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी दिला आहे. लावलेल्या बॅनरवर ‘बोगस काम बंद करो, इसका अंजाम मिलेगा’ असा उल्लेख असून त्याखाली ‘भाकप माओवादी’ असे लिहिण्यात आले आहे.
सिरोंचा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर सिरोंचा पासून केवळ १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटीपाका चेक गावापासून जवळपास ८०० मीटर अंतरावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. या ठिकाणी सुरू असलेले काम बोगस असल्याचे सांगून काम बंद करा, अशी धमकी माओवाद्यांनी दिली आहे. सिरोंचा तालुका मुख्यालयाच्या लगतच माओवाद्यांचा बॅनर आढळल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
अलीकडेच अबुझमाड जंगलातील माओवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात सी-६० जवानांना मोठे यश मिळाले होते. त्यानंतर १० ते १२ दिवसांतच सिरोंचा तालुक्यात धमकीचे बॅनर लावण्यात आले आहेत. या धमकीचा संबंध ‘सी-६०’ जवानांनी केलेल्या कारवाईशी जोडला जात आहे.