गुवाहाटी, दि. २५ मार्च – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरीष्ठ प्रचारक गौरी शंकर चक्रवर्ती यांचे बुधवार, २४ मार्च रोजी पहाटे साडे सहा वाजता निधन झाले. बरेच दिवस ते कर्करोगाशी झुंज देत होते. असाध्य आजार असूनही अखेरच्या श्वासापर्यंत संघातील आपली जबाबदारी ते सांभाळत होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात करत ते पुन्हा एकदा समाजासाठी सक्रिय झाले होते.
गौरीदा या नावाने परिचित असणाऱ्या चक्रवर्ती यांच्या आकस्मिक निधनाने संघ आणि संबंधित संघटनांच्या स्वयंसेवकांत शोकाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. जलालपूर या मूळ गावी गौरीशंकर चक्रवर्ती यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जलालपूर येथे ३० नोव्हेंबर १९५० रोजी जन्मलेले गौरीशंकर डॉ. खगेंद्र चंद्र चक्रवर्ती यांची चौथी संतती. संघ प्रचारक गौरी शंकर चक्रवर्ती हे अत्यंत प्रतिभासंपन्न आणि बुद्धिमान होते. बालपणापासूनच त्यांचे संघाशी घनिष्ट संबंध होते. शालेय जीवनापासून ते शाखेत येऊ लागले. माध्यमिक परिक्षेत आसाममध्ये ते तिसरे आले होते. भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ते गुवाहाटी येथे आले. पुढे कुरुक्षेत्र विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले.
भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या चक्रवर्ती यांनी ५०हून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. त्याचप्रमाणे आसामी आणि इंग्रजी भाषेच २५हून अधिक पुस्तकांचे लेखन केले. २०१३मध्ये केमो घेत असताना बेडवर बसल्या बसल्या त्यांनी दत्तोपंत ठेंगडी यांच्या चरित्राचा आसामी अनुवाद केला होता. नुकताच त्यांनी आधुनिक भारतर खनिकर डॉ. हेडगेवार अर्थात आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. हेडगेवार या पुस्तकाचा अनुवाद केला. हे अद्याप अप्रकाशित आहे.
चक्रवर्ती हे १९७३मध्ये प्रचारक निघाले. निष्ठापूर्वक त्यांनी पाच वर्षे प्रचारक म्हणून कार्य केले. आणिबाणीनंतर त्यांना १९७८मध्ये महानगर प्रचारकाच्या रुपात गुवाहाटी येथे पाठविण्यात आले. १९८३मध्ये त्यांनी दिब्रुगड येथे प्रचारक म्हणून पाठविण्यात आले. १९९१पर्यंत ते दिब्रुगड येथे राहिले. त्यानंतर १९९४मध्ये त्यांना दक्षिण आसाम प्रांतप्रचारकाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर २००३ ते २०१२ ते क्षेत्र शारिरीक प्रमुख राहिले. २०१२मध्ये सह-क्षेत्र(उत्तर-पूर्व)प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली. गंभीर आजार असूनही त्यांनी कर्तव्यात कोणतीही कसूर केली नाही. आजारपणामुळे त्यांना क्षेत्रप्रचारक म्हणून काम थांबवले व संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणीमध्ये आमंत्रित सदस्य करण्यात आले.