आज फाल्गुन वद्य षष्ठी अर्थात नाथ षष्ठीचा दिवस.संपूर्ण विश्वाला मौलिक तत्त्वज्ञान सांगणारे,जनसामान्यांना शुद्ध भक्तिमार्गाला लावणारे आणि आपल्या मराठवाड्याला विशेष ज्ञात असणारे शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा वैकुंठगमन दिवस.
‘आपण करीत असलेले काम शेवटपर्यंत प्रेमाने करणे म्हणजे भक्ती’, ‘ज्ञान आणि कृती यांच्या योग्य समन्वयातून सुसंस्कृत माणूस निर्माण करणे म्हणजे भक्ती’ एवढी साधी आणि अगदी सोपी व्याख्या करून नाथांनी समाजाला भक्तीच्या माध्यमातून खरा कर्मयोग समजावला. वैराग्य हे दुसरे-तिसरे काही नसून स्वाभाविकपणे ‘मी तू’ पणाचा लोप होणे म्हणजेच वैराग्य असे सांगून नाथांनी प्रचंड अस्थिर आणि धार्मिक असमतोलाच्या काळात गृहस्थी सांभाळणाऱ्या माणसाला ही वैराग्य वृत्ती समजावली आणि सामाजिक समतोलाचा धडा दिला.नाथांनी रचलेल्या दत्ताच्या आरतीत याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला सापडतो. “मी तू पणाची केली बोळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान।”
नाथांच्या चरित्राचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यास केला जाईल तेवढे दृष्टिकोन कमी पडतील. कारण नाथांचे चरित्र हे सर्वांग सुंदर आणि प्रफुल्लित पुष्पाप्रमाणे आहे आणि या प्रफुल्लित पुष्पाच्या पाकळ्या म्हणजे नाथांचे विविधांगी वांग्मय! जसे की आनंदलहरी, एकनाथी अभंग गाथा, एकनाथी भागवत, चतुःश्लोकी भागवत, भावार्थ रामायण , रुक्मिणी स्वयंवर, शुकाष्टक टीका, स्वात्मबोध! या शास्त्रोक्त लेखनाबरोबरच नाथांनी लोकजागृतीसाठी रचलेल्या गौळणी, भारुडे, छोट्या छोट्या आरत्या यांचा समावेश त्यात होतो,ज्या वाङ्मयातून आपल्याला नाथांच्या एकूण चरित्राचा अभ्यास करता येतो.
कुठल्याही महान चरित्राचा जन्म होण्यासाठी पूर्व पिढ्यांचे संचित पुण्यकर्म असावे लागते,अशाच संत भानुदास यांच्या तिसऱ्या पिढीत जन्माला आलेल्या संत एकनाथांनी संत भानुदास यांच्या स्वप्नाला मोठे केले आणि जनसामान्यांमध्ये शुद्ध भक्ती पेरली.
संत बहिणाबाई एका अभंगात म्हणतात,
“संत कृपा झाली इमारत फळा आली,
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया,
नामा तयाचा किंकर तेणे विस्तारीले आवार,
जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत,
तुका झालासे कळस भजन करा सावकाश,
बहीणा फडकती ध्वजा तेने रूप केले ओ जा।।”
अशा प्रकारे वारकरी संप्रदायाच्या या इमारतीला स्तंभ देण्याचे काम संत एकनाथांचे आहे.
‘संस्कृत की प्राकृत?’ अशी प्रचंड भाषिक दरी निर्माण झालेल्या समाजात नाथांनी अत्यंत साध्यासुध्या प्राकृत भाषेत स्वतःच्या अमोघ वाणीतून संस्कृतात अडकलेल्या क्लिष्ट तत्वज्ञानाला सोपे करून लोकांपर्यंत पोहोचवले.
संत तुकाराम एके ठिकाणी म्हणतात,
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा।।”
समकालीन अत्यंत कर्मठ समाजातही एकनाथांनी भर दुपारी वाळूवर तडफडणाऱ्या अस्पृश्य बालकाला उचलून त्याच्या आईकडे सोपवताना स्वतःचे सोवळे त्यांना देणे,अस्पृश्य वस्ती असो वा वेश्येचे घर असो तेथील जेवणाच्या आमंत्रणाला न टाळता प्रेमाने जेवणे या आणि अशा कित्येक प्रसंगातून या उक्तीचा प्रत्यय नाथांच्या चरित्रात येतो.
विनोबा भावे यांनी ‘एकनाथांची भजने’ या आपल्या ग्रंथात नाथांची भारुडे म्हणजे धर्मठांनी रूढ केलेल्या मिथ्याचारावर कोरडे उडणारे साधन आहेत असे म्हटले आहे,यातून काळाच्या पुढे जाऊन लिखाण करणारे नाथ आपल्याला दिसतात.
श्रीमद्भागवताच्या आधारे चारही वर्णाची कर्तव्ये सांगून शम दम शांती आर्जव हे ब्राह्मणांना आवश्यक गुण असल्याचे ते सांगतात आणि या गुणांनी पूर्ण असलेला कोणत्याही वर्णाचा जातीचा मनुष्य ब्राह्मणापेक्षा कमी नसून तोच खरा ब्राम्हण आहे असे नाथ सांगतात.
उन्हात तळमळणारे महाराचे शेंबडे पोर कडेवर घेणारा, आपल्या अंथरुणावर वडाऱ्यास निजवणारा, राणू महाराकडे जेवावयास जाणारा, पाण्यावाचून उन्हात तडफडत असलेल्या गाढवास गंगेची कावड पाजणारा अनाथांचा नाथ संत एकनाथ गावच्या महारा पासून, मांग गारुड्या पावेतो व स्त्रिया मुलांपासून भिकाऱ्या पावेतो सर्वांची आठवण ठेवून पदे रचतो व त्याद्वारा समाज भक्तिरसात भिजवून समरस करण्याचा प्रयत्न करतो, हे कार्य आजही समाज सुदृढ करण्यासाठी मार्गदर्शक ठरते.
संत एकनाथ महाराजांनी विषमतेने ग्रासलेला व परकीय धर्मांध आक्रमणापासून अनभिज्ञ असलेला हिंदू समाज संघटित व्हावा या उद्देशाने समाज जागृती केली आहे. नाथांच्या आयुष्यातील काही प्रसंग याचे साक्षीदार आहेत.
नाथांनी हिंदू प्रजेमध्ये स्वधर्म, स्वदेश या विषयी वीर वृत्ती व स्वाभिमान जागृत करण्याच्या उद्देशाने भावार्थ रामायण रचले. त्यामधील रावण म्हणजे धर्मांध मुसलमान बादशहा, सीता म्हणजे धर्म, रावणाने बंदी केलेले सकल देव म्हणजे हिंदू प्रजा अश्या रुपकाद्वारे सत्तांध, धर्मांध मुसलमान सुल्तानांविरुद्ध असंघटित, दुर्बल असहाय हिंदू प्रजेला वानरसेनेप्रमाणे एक येऊन स्वधर्मासाठी , स्वदेशासाठी प्राणांर्पणाने संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.
देशावर एकानंतर एक इस्लामी आक्रमणे होत असताना निरपेक्ष धर्मनिष्ठा म्हणजे कुठलाही धर्म श्रेष्ठ कनिष्ठ नाही हे ओळखून प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य देण्याचा विचार, त्याचबरोबर स्वधर्मनिष्ठेआड जर कोणी येत असेल तर खंबीरपणे त्याचा प्रतिकार करण्याची निर्भय वृत्ति नाथांनी समाजात रुजवली.
सर्व मानवाला खुदानेच निर्माण केले आहे, सारे मानव एक आहेत असे सांगून भोळ्या भाबड्या हिंदूंना धर्मांतराच्या जाळ्यात ओढणाऱ्या ढोंगी फकिरांना नाथ फटकारतात.
ते तुर्कांना सडेतोडपणे सांगतात,
“हिंदू मुसलमान दोयी खुदा ने पैदा किये भाई,
तुर्कांची नष्टाई पाही हिंदू धरून मुसलमान केला,
हिंदू करिता खुदा चुकला त्याहुनी थोर तुमच्या अकला,
हिंदूस मुसलमान केला गुन्हा लाविला देवासी।।”
सर्व मानव जर खुदाचीच लेकरे आहेत, तर हिंदूला मुसलमान कशाला करता? असा सवाल नाथ विचारतात. तुमच्या अश्या वागणुकीमुळे तुम्ही खुदालाच गुन्हेगार ठरवीत आहात असेही सुनवायला नाथ विसरत नाहीत.
काळाशी स्पर्धा करणारे नाथ ‘बोले तैसा चाले’ या वृत्तीने खरे उदारमतवादी विचारवंत ठरतात. त्यांच्या या आकाशाहून विस्तृत अशा चरित्राला प्रणाम!
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी