राष्ट्रपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासात राष्ट्रपुरूषांच्या गणात सुवर्ण अक्षराने कोरलेले नाव असून भारत मातेचे थोर सूपुत्र आहेत. भारताच्या एकात्मतेचा, अखंडत्वाचा, समानतेचा पुरस्कार करून भारतीय समाज व्यवस्था सदृढ करण्याचे महान देशकार्य या महामानवाने केले. परकियांपासून देशाला धोका निर्माण होवू शकतो अशी चिंता व्यक्त करणारे एकमेव महापुरूष त्याकाळात भारत सरकारला कळकळीने सांगत होते ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.
स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्या परराष्ट्र धोरणावर साम्यवादी विचारांचा पगडा होता. स्वतंत्र भारताच्या स्वदेशी नितीचे धोरण भारताच्या परराष्ट्र व्यवहार बाबत तत्कालीन नेत्यांना तयार करता आलेले नव्हते. स्वतंत्र भारतातील सत्ताधारी नेत्यांना साम्यवादी राष्ट्रांकडुन भारताला मोठी आर्थिक मदत होईल अशी त्यांची भाबडी आशा होती. साम्यवादी राष्ट्रांच्या फसव्या आशा घेवून स्वतंत्र भारताचे सत्ताधारी राजकर्ते भारताचे परराष्ट्र व्यवहार धोरण तयार करीत होते. भारताच्या सार्वत्रिक निवडणुका 1952 आणि 1954 साली झाल्या, त्यात डॉ. बाबासाहेबांनी नवीन लोकसभेची निवडणुक लढविली. या दोन्ही निवडणुकीत डॉ. बाबासाहेब पराभूत झाले होते. विरोधी पक्षाच्या मदतीने डॉ बाबासाहेब राज्यसभेवर निवडले गेले. राज्यसभेत सत्ताधारी पक्षाच्या देशविघातक धोरणावर कडाडून हल्ला करणारे डॉ बाबासाहेब एकमेव नेते होते. त्यावेळचे त्यांचे राज्यसभेतील भाषण उत्कृष्ट भाषणापैकी एक होते. देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू परराष्ट्र धोरणाचा ठराव मांडुन स्वत: त्याचे परराष्ट्र मंत्री म्हणून समर्थन करीत होते. या परराष्ट्र व्यवहाराचे धोरण पुर्णत: साम्यवादी विचाराने लदबलेले होते. डॉ. बाबासाहेबांनी या परराष्ट्र धोरणाच्या चर्चेवरील सखोल समीक्षा केली. सरकारचे परराष्ट्र व्यवहार धोरण तीन तत्वावर आधारलेले होते म्हणजे शांतता,साम्यवाद,सहअस्तिव या तीन तत्वावर परराष्ट्र धोरण निश्चीत करण्यात आलेले असतांना हे तीन तत्व परस्पर भिन्न असल्याने ते धोरण हिंदुस्थानासाठी घातक ठरू शकते असे डॉ बाबासाहेब चर्चेत भाग घेतांना म्हणाले. पुढे चर्चेत म्हणाले, ”शांतता आपल्याला हवी आहे असे हे धोरण सांगतो पण शांतता आपण विकत घेणार आहोत काय? असा प्रश्न् उपस्थित करुन साम्यवाद व स्वतंत्र लोकशाही एकत्र कार्य करू शकतील? ते एकत्र राहु शकतील? त्यांच्यामध्ये संघर्ष होणार नाही अशी आशा जरी केली तरी मला हे तत्व फसवे आहे. असेच वाटते. साम्यवाद हा जंगल जाळणाऱ्या अग्नीसारखा आहे. तो जळत जात आहे आणि त्याच्या मार्गास येणारे काहीही व सर्वकाही जळत आहे.” असे डॉ बाबासाहेब म्हणाले.
साम्यवादी राष्ट्रे हे विस्तारवादी धोरणाचे घोतक आहे आणि त्यांच्या आक्रमणकारी पुर्नरचना विषयी अभ्यास डॉ बाबासाहेबांना होता. देशाचे भौगोलिक स्थान लक्षात घेवून परस्पर धोरण निर्माण करण्याची गरज असल्याचे पंडित नेहरुनां सुचविले होते. स्वतंत्र भारताचे सरकार स्वदेशी राष्ट्रवादाचे धोरण प्रत्यक्ष राजनायिक व्यवहारामध्ये अंमलात आणतील अशी स्वाभाविक अपेक्षा भारतीय जनतेला होती. परंतु भारतीय राष्ट्रवादाचा विचार परराष्ट्र व्यवहारामध्ये उपकारक ठरणार नाही. अशी मनोवृत्ती पंतप्रधानांची होती. साम्यवादी राष्ट्रांचे साम्राज्यवादी धोरणामुळे जगात ‘बळी तो कान पिळी’ अशी अनेक राष्ट्रांची अवस्था होती. चीन आणि रशिया मधून भारतात साम्यवादाने शिरकाव केला. साम्यवादाने देशात माओवादा सारखी देशविघातक समस्या जन्माला घातली. त्याचे दुष्परीणाम देश भोगतोय. साम्यवादी विचाराचे धोरण साम्राज्यवादी असल्यामुळे साम्यवादाला डॉ बाबासाहेबांनी सदैव विरोधच केला.
साम्यवादी राष्ट्रे विस्तारवादी आणि आक्रमणकारी प्रवृत्तीची आहे. हे सरकारला समजवून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. सन 29 एप्रिल 1954 मध्ये बिजींग मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार झाला. त्या करारात होत काय? दोन्ही देश आक्रमण करणार नाही. दोन्ही देशांनी स्वत:च्या सीमावर एकात्मता व सार्वभौमत्व कायम ठेवावे दोघांनी ऐकमेकांच्या अंतर्गत लुडबुड करू नये. दोघांनी स्वत:च्या हिताकरीता परस्पर समानता आणि सहकार्य करणे व शांततापुर्ण सहअस्तिव किंवा सहजीवन या पाच तत्वाचे पालन करणारा पंचशिल करार होता. चीन हा साम्राज्यवादी देश असल्यामुळे पंचशील कराराचे पालन करेल! यावर डॉ बाबासाहेबांनी मुळीच विश्वास ठेवला नाही. राज्यसभेत पंचशिल करारावर प्रखर टिका केली. डॉ. बाबासाहेब म्हणतात,” परराष्ट्र धोरणात शांततेला अनन्य साधारण महत्व आहे. भारत हा लोकशाही मुल्य जपणारा देश आहे. चीन आणि रशिया ही लोकशाहीची पत राखणारे देश नाही. भारताने जो पंचशील करार केला त्याचा चीन मध्ये सन्मान केला जात नाही. पंचशिल करारात शांततापुर्ण सहअस्तित्व आणि सहजीवन हे प्रमुख सुत्र आहे. पण चीन आणि रशियात या मुल्यांना कोणतेही स्थान नाही. कम्युनिस्ट रशियाने महायुध्दानंतर दहा देश गिळंकृत केले. चीनने तिबेट आणि कोरीयावर कब्जा केला. मग नेहरूंनी कोणत्या आधारावर करार केला? कम्युनिस्ट ड्रॅगन आहेत. या ड्रॅगनला जोपर्यत खायला द्याल, तो पर्यत ते काहीच करणार नाही पण सर्वकाही संपले की मग तो तुमच्या कडे वळेल आणि म्हणेल आता तुच एवढा बाकी आहेस. तुम्ही म्हणता काश्मिरचा प्रश्न आम्ही सोडवला. आता ही समस्या संपली आहे. पण तुमचा समज चुकीचा आहे आणि त्यासाठी आनंदी होण्याची गरज नाही. पण येणा-या काळात तुमचे डोळे उघडतील तेव्हा तुम्हाला दिसेल की, काश्मीर समस्यांचे भूत तुमच्या मानगुटीवर बसलेले आहे. साउथ ईस्ट एशिया ट्रीट आर्गनायझेशनचा (सीटो) भारत सदस्य् का झाला नाही, हे एक कोडेच आहे. सीटोचा प्रमुख उददेश हा स्वतंत्र राष्ट्रांवर आक्रमण करणे अथवा त्यांच्या भूभागावर कब्जा करण्यापासून रोखणे असे असतांना नेहरूंचा सीटोचा विरोध कशासाठी? या संघटनेत अमेरीका, ब्रिटन, तुर्कस्थान व इराण हे देश आहेत पण अमेरीकेबददल नेहरुंच्या मनात अशी कोणती अढी आहे की त्यांना अमेरीका नको आहे? भारत सीटोचा सदस्य आधीच झाला असता तर चीनला ल्हासा बळकावता आले नसते. अजुनही वेळ गेली नाही. भारताने सीटोचे सदस्य व्हायला हवे आणि संतुलन साधायला हवे.”
डॉ बाबासाहेब नेहरूंना सतर्क करीत होते. साम्यवादी चीन भारताचा कधीही मित्रं होवू शकत नाही. चीनच्या कारनाम्याबाबात नेहरूंना सावध राहण्याचा सल्ला कळकळीने देत होते. पण नेहरुंनी त्याकडे साफ दुर्लश केले. सन 1962 मध्ये साम्यवादी चीनने भारतावर आक्रमण करून आमचा सुमारे 36 हजार चौरस मैल भुभाग गिळंकृत केला. साम्यवादी चीन ने ल्हासा व तिबेट वर जबरदस्तीने कब्जा करून आपल्या सीमा भारतापर्यत विस्तारीत केल्या. चीन भारतावर केव्हाही आक्रमण करू शकतो असा इशारा डॉ बाबासाहेबांनी सरकारला दिला होता पण पंडित नेहरूंनां वामपंथी विचाराची भुरळ पडली होती. डॉ बाबासाहेबांच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले नाही. नेहरू केवळ हिंदी-चीनी भाई भाई घोषणा देत राहिले. पुढच्या काळात चीनने भारताचा विश्वासघात केला. भारतावर आक्रमण करुन अपमानजनक अटी लादल्या गेल्या. डॉ बाबासाहेबांचा नेहरू सरकारला दिलेला इशारा-सल्ला तंतोतंत खरा ठरला.
डॉ बाबासाहेबांनी हिंदुस्थानाला साम्यवादी विचार अधोगतीला नेणार असल्याचे स्पष्टं सांगितले होते. कारण इंग्रजांच्या पाऊलावर पाऊल टाकणारे साम्यवादी धोरण हे हिंदुस्थानाला एक राष्ट्र असल्याचे मान्यता देत नाही. देशातील संस्कृतिला साम्यवादी विचार मान्यता देत नाही. भारताला सदैव तुकडयात पाहणारा साम्यवादी विचार असून ते सतत विद्रोह बिंबवण्यास प्रयत्न करीत असतात. देशाला विविध गटात विभाजण्यास आणि त्यास स्वतंत्र अधिकार देण्याचा विचार करीत असतात. हा साम्यवादी विचार भारताच्या अखंडत्वाला धोका निर्माण करू शकतो असे डॉ बाबासाहेबांनी सांगितले तरीही काही पुरोगामी समजणाऱ्या मंडळीना डॉ बाबासाहेबांनी साम्यवादी विचारांना विरोध केलेल्या अभ्यासावर चर्चा करण्याचा विचार होत नाही. तेव्हा त्यांना राजकीय दृष्टया तेच सोयीचे असते.
डॉ बाबासाहेब कम्युनिस्टांपासून सदैव सावध राहण्याचा सल्ला देत आहे. डॉ बाबासाहेबांची लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 2 पान क्रं. 585 आणि 86 वर ”भारतीय कामगारांसाठी कम्युनिस्टांना ते सांगतात त्याप्रमाणे खरोखरच जिव्हाळा वाटतो काय? तसे असते तर त्यांनी कामगारांसाठी एक स्वतंत्र राजकीय पक्ष संघटित केला असता. आतापर्यत करीत आले तसे कॉग्रेसला मिळा असा कामगारांना उपदेश करीत बसले नसते. त्यांना कॉग्रेसने हाकलेले असल्यामुळे ते आता आपल्यात शिरून आपले उपदव्याप सुरू करू लागले आहेत. म्हणून माझे तुम्हाला सांगणे आहे की, कम्युनिस्टांपासुन अलिप्त रहा आणि त्यांना आपल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचा उपयोग त्यांच्या प्रचारासाठी करू देवू नका.”
”कम्युनिस्ट पक्षापासून सावध रहा असे माझे तुम्हाला सांगणे आहे. कारण गेल्या काही वर्षात त्यांच्या कृत्यावर ते कामगारांचे अहित करीत आहे. किंबहुना ते त्यांचे शत्रु आहेत. अशी माझी खात्री झाली आहे. काँग्रेस भांडवल वाल्यांची संस्था आहे,असे कम्युनिस्ट सांगतात आणि त्याचवेळी कामगारांना त्यात प्रविष्ठ होण्याचा उपदेश करतात. हिंदुस्थानातील कम्युनिस्टांना हिंदुस्थानातील विश्वात्मक संस्कृतीचा मुळीच आदर नाही. भारताच्या विश्वात्मक संस्कृतिची संकल्पना भ्रामक स्वरूपाची वाटते. भारतीय विश्वात्मक संस्कृतीची परंपरा असून कम्युनिस्टांनी हिंसक रक्तरंजित लाल पाश्चात्य संस्कृतिचे गाजर भारतीय कामगारांच्या मनात बिंबविण्याचे सतत प्रयत्न् केले. कम्युनिस्टांनी भारतीय आदर्श, संस्कृतिची परंपरा नकारात्मकतेने मांडली असून कम्युनिस्ट हे लेनिन च्या पुतळयाला किंवा तसबिरीला मान देतात, त्याच कम्युनिस्टांच्या पक्ष कार्यालयात लावण्यात त्यांचे धोरण आडमार्गी येते.
भारतीय समाजाला छत्रपती शिवरायाने स्वाभिमानाने जगावयास शिकवले हा इतिहास देखील कम्युनिस्टांनी थोतांड म्हणून बोळवण केली. साम्यवादी विचाराने भारतीय संस्कृतिचा विचार कुठेही आपल्या धोरणात ठेवला नाही. भारतीय संस्कृतिवर घाव घालण्याचे कारस्थान साम्यवादी विचाराने केले आहे. भारतीय समाज अनादी प्राचिन काळापासून उभा तो संस्कृतिच्या आधारावरआहे. भारतीय समाज जीवनमुल्ये नष्ट करण्याचे साम्यवादी विचारवंत करीत आहे.
साम्यवादी विचारधारेने जगात हुकूमशाही प्रस्थापित करण्याचे ध्येय बाळगले असून साम्यवादींनी दहा युरोपीयन राज्ये हस्तगत केली होती. फिनलंड, इस्टोनिया, लात्विया, पोलंड, लु्थुआनिया, चकोस्लोव्हॉकीया, हंगेरी, रूमानिया, बल्गेरिया, बल्गेरिया,अल्बानिया तसेच ऑस्टीया,नार्वे हया देशांवर कब्जा करून गिळंकृत केली तसेच अनेक देश साम्यवादी हुकूमशाही दडपणाखाली आणली गेली.असा जीवंत इतिहास साम्यवादी विचाराने बरबटलेला आहे. त्यामुळे भारतातील शेवटच्या माणसाचे कल्याण करण्यासाठी साम्यवादी विचारापासून अलिप्त राहीले पाहिजे असे डॉ बाबासाहेब आपल्या भाषणात निक्षून सांगत आहे.
साम्यवादी विचार धर्माला विश्वात्मक ‘अफुची गोळी’ असे सांगतात. डॉ बाबासाहेबांनी समाज जीवनामध्ये धर्माला महत्वाचे स्थान दिले आहे. ‘कार्ल मार्क्स आणि बुध्दं’ या आपल्या पुस्तकात डॉ बाबासाहेब नमूद करतात की, ”मार्क्स तत्वज्ञानाचा पाया चुकीचा असल्याने तो फार काळ टिकणार नाही. मार्क्सचा विचार म्हणजे लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडविणारा विचार आहे.” डॉ बाबासाहेबांनी मार्क्स साम्यवाद स्पष्टपणे नाकारला आहे. डॉ बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब न सांडविता सामाजिक आणि आर्थिक क्रांती केली कम्युनिस्टांसारख्या बंदुका हाती घेवून निरपराध लोकांना मारण्याचे पाप डॉ बाबासाहेबांनी केले नाही.
मनुष्य केवळ भाकरीवर जगत नसून मनुष्याच्या जीवनात धर्माला मोठे स्थान असून धर्म जीवनात जगण्याची आशा निर्माण करतो हे बाबासाहेबांचे विचार साम्यवादाच्या विरोधात आहे. सन 1937 साली दलित परिषदेत डॉ. बाबासाहेब म्हणाले, ”स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी मजुरांचे शोषण करणा-या कम्युनिस्टांच्या मी पक्का शत्रु आहे.”
कम्युनिस्ट हा डॉ बाबासाहेबांचा अनुयाची असु शकत नाही. डॉ बाबासाहेबांच्या विचारावर निष्ठा कम्युनिस्टांच्या पचनी पडत नाही. पण कम्युनिस्टं हे डॉ बाबासाहेबांचे नाव राजकीय लाभाच्या सोयीनुसार घेवून व आपली राजकीय स्वार्थाची पोळी भाजुन घेतात अशा कम्युनिस्टांनापासुन नेहमी सावध असण्याची गरज झाली आहे.
डॉ बाबासाहेबांनी आपल्या काही पत्राचा प्रारंभ जय शिवराय अशी केली आहे. छत्रपती शिवरायां प्रति अत्यंत श्रध्दा डॉ बाबासाहेबांच्या अंतकरणात होती तसेच स्वामी विवेकानंदांना बाबासाहेब महापुरूष म्हणतात. साम्यवादी हे विचार शिवाजी महाराज, विवेकानंदां प्रति सातत्याने व्देषाची गरळ ओकत राहिले. डॉ बाबासाहेब म्हणतात,”जगातील कम्युनिस्ट वगळले तर एकही मनुष्य आढळणार नाही की, ज्याला धर्म नको आहे. त्याप्रमाणे हि धर्म आम्हालाही पाहिजे आहे. पण तो सदधर्म म्हणजे जेथे समसमान राहतील. सर्वाना सारखीच संधी मिळेल, तो खरा धर्म. बाकीचे अधर्मच होय.” भौतिकवाद म्हणजे धर्म होत नाही. नागपूरला दिक्षा समारंभाच्या वेळी बोलतांना बाबासाहेब म्हणाले,”मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तु आहे. मला माहित आहे की, कार्ल मार्क्सच्या म्हणन्यानुसार धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना सकाळीची न्याहारी, त्यात पाव मलई लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले पोटभर मिळाले, निवांत झोप मिळाली की सगळे संपले हे त्यांचे तत्वज्ञान ! मी त्या मताचा नाही.”
मार्क्सचा विचार काळाच्या कसोटीवर पराभूत झालेला आहे. त्यामुळे साम्यवादी पिल्लावळ भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रीय विचारावर आक्रमण करुन भारताची राष्ट्र संकल्पना, भारताच्या सुरक्षतेची, अखंडत्वाचा विचार प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ बाबासाहेबांनी विरोधकांना प्रेमाने आणि आपुलकीने जिंकायचे हा भगवान बुध्दांचा मार्ग आपल्या आचरणातुन जगापुढे ठेवला. साम्यवादी विचारांचा संघर्षाचा मार्ग रक्तरंजीत, हिंसात्मक प्रवृत्तीचा असून हा संघर्षाचा मार्ग अमानवीय स्वरूपाचा असल्याने साम्यवादी विचाराला सदैव दूर ठेवले.
बहिष्कृत भारताच्या 27 सप्टेंबर 1929 च्या अंकात डॉ. बाबासाहेब म्हणतात, ” देव, धर्म व राष्ट्र या संकल्पना कम्युनिस्टांना मान्य नाही. देव आणि धर्म याबाबत कम्युनिस्टांच्या विचारांशी एकमत असलेला बहुजन अनुयायी एकही सापडणार नाही. ज्या ठिकाणी कम्युनिझम तत्वे निर्माण करण्यात आली. त्या देशातील कम्युनिझम तत्वाने बहुजन समाज सुखी झाला आहे? केवळ नरसंहार तसेच रक्तपात झाला तर हिंदुस्थानात बहुजन समाजाला कम्युनिझम तत्व सुखकारक कशी ठरणार?”
भगवान बुध्द आणि त्यांचा धम्मं पृष्ठ क्र. 224, 245 वर बाबासाहेब म्हणतात,”धर्म हा भारताचा प्राण आहे. आपण जर धर्म सोडला तर विनाश अटळ आहे.”
स्वामी विवेकानंदानां अपेक्षीत अशी धर्माची संकल्पना म्हणजे, ”धर्म अशी वस्तू आहे की, जिच्यामुळे पशुचे मनुष्यात आणि मनुष्याचे ईश्वराचे रूपांतर होते.” ही धर्म संकल्पना डॉ बाबासाहेबांना अपेक्षित होती.
धर्म हा माणसाला आशा आणि विश्वास देतो. माणसाकरीता धर्म असतो. तो धारण करतो, तो धर्म. परमार्थ चिंतन म्हणजे धर्म होय. म्हणजे आपले पोट भरीत असतांना दुस-यांच्या पोटाची चिंता करणे. ही समाज कल्याणाची भावना धर्माने निर्माण केली आहे. कम्युनिस्टांना तर धर्माची संकल्पनाच मान्य नाही. आपल्या हिंदुस्थानात धर्म विरहत समाजाचे कल्याण होवू शकत नाही. जगातील प्रत्येक राष्ट्राची धर्म संकल्पना असते. ती धर्म संकल्पना त्या राष्ट्रास उपकारक ठरतात. त्या धर्म संस्कृतिवर राष्ट्र निर्मिती होते. भारताला त्याचे अखंडत्वाचे रक्षण करण्यासाठी समरस समाज धर्माची आवश्यकता आहे. भारताची राष्ट्र संस्कृति सहिष्णुतेच्या धर्माने परीपुर्ण असून ती निरपेक्ष भावाने चालत आलेली होती. त्या संस्कृतिमध्ये हिंदुस्थानात ईश्वराची लेकरे असल्याने त्यात उच्च-निच्च असा भेद नव्हता,असा उदात्त विचार विश्वधर्म संस्कृतिच्या अंतरंगात भिनलेला आहे. त्यामुळे राष्ट्र आजवरही चिरंतन आहे. डॉ बाबासाहेबांनी आपल्या समाज जीवनात धर्माला अतिशय महत्वाचे स्थान दिले. डॉ बाबासाहेबांनी धर्म संस्कृति रक्षणाकरीता भारतीय राज्यघटना ही स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वावर केली ही तत्वे भगवान बुध्दाच्या शिकवणूकीतून घेतली आहे. त्यामुळे भारतात स्वातंत्र, समता, बंधुता हे तत्वे भारताच्या लोकशाहीचा पाया आहे त्यावरच भारतीय घटनेची इमारत उभी आहे.
वर्तमान काळात धर्मनिरपेक्ष वादाचा उदो उदो करीत देशात ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा मोठा गोंधळ माजला आहे. धर्मनिरपेक्षता हे स्वातंत्र, समता, बंधुता या तत्वाचा परस्पर अवरोध निर्माण करणारे असून धर्माशिवाय राष्ट्र निर्मिती शक्य नाही. राष्ट्र बलशाली करण्यासाठी स्वातंत्र, समता, बंधुत्वा शिवाय शक्य होत नाही. गेले कित्येक वर्ष हे राष्ट्र गुलामीत कां गेले? याचा शोध घेतला असता देशात धर्म होता परंतु स्वातंत्र, समता, बंधुत्वाची संकल्पना जनमानसात रूजलेली नसल्याने हे राष्ट्र गुलामीत होते. धर्म होता म्हणुन राष्ट्र होते अन्यथा ते ही लयास गेले असते. त्यामुळे आपले प्राचिन राष्ट्र धर्म विरहीत राहु शकणार नाही. देशाची प्राचिन धर्म संस्कृति राष्ट्राचा प्राण आहे.
डॉ बाबासाहेबांना धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या दोन्ही वादाचे तत्व अमान्य त्याला प्रस्ताविकेत स्थानही नव्हते. नंतर च्या काळात कम्युनिस्ट विचारांचा प्रभावाने हे दोन्ही वाद घटनेत घुसविण्यात आले. याच विचारांचा बुरखा पांघरून कम्युनिस्ट देशात अलगाववादी विचाराला खतपाणी घालीत आहे. कम्युनिस्टांनी सतत नक्षलवादाला चालना दिली. हयाच कम्युनिस्टांना संसदेवर हल्ला करणारे आतंकवादी जवळचे वाटतात.भारतीय सैनिकांच्या अतुनिय कामगीरीवर शंका उपस्थित करणारे महाभाग हे बाबासाहेबांचे पाईक कधीच होवू शकत नाही. ‘भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्ला’ चे नारे देणारे हेच देशद्रोही कम्युनिस्टांचे हस्तक होते अशा कम्युनिस्टांपासून सदैव दूर राहिले पाहिजे तरच डॉ बाबासाहेबांची सर्वप्रथम भारताचे कल्याण या संकल्पनेला चालना मिळेल.
- अमोल तपासे,
सीताबर्डी, नागपूर.
विश्व संवाद केन्द्र विदर्भ