एकत्रित प्रयत्नांतून करू कोरोनावर मात – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे
कोरोना संक्रमणाच्या राष्ट्रीय परिस्थितीबाबत रा.स्व. संघाचे सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसबळे यांचे वक्तव्य
दिल्ली – २४ एप्रिल २०२१
कोविड महामारीच्या संसर्गाचे भयंकर आव्हान पुन्हा एकदा देशासमोर उभा ठाकले आहे. महामारीची सांसर्गिकता आणि भीषणता यावेळी अधिक गंभीर झाली आहे. तिचा क्रूर मारा आज देशाच्या अधिकांश भागाला सोसावा लागत आहे. संसर्गामुळे बहुसंख्य व्यक्ती रुग्णालयात दाखल होत आहेत. शेकडो कुटुंबांनी आपल्या प्रियजनांनाही यामुळे गमावले आहे. या संकटाने त्रस्त असणाऱ्या देशवासियांप्रती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या संवेदना व्यक्त करीत आहे.
परिस्थिती बिकट असली तरी समाजाची शक्ती कमी नसते. संकटांशी झगडण्याची आपली क्षमता जगाला माहिती आहे. धैर्य आणि मनोबल कायम ठेवून संयम, शिस्त आणि परस्पर सहयोगाने आपण या भीषण परिस्थिती वर नक्की मात करू, यावर आमचा विश्वास आहे.
महामारीने अचानक विक्राळ रूप धारण केल्याने रुग्णालयांत बेड, ऑक्सिजन तसेच औषधे अशा आवश्यक संसाधनांची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारतासारख्या विशाल देशात समस्याही व्यापक रूप धारण करते. केंद्र व राज्य शासन तसेच प्रशासन, स्थानिक संस्थांच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहेत. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व बंधू-भगिनी, संरक्षण तसेच स्वच्छता कर्मचारी मागच्या वेळेप्रमाणेच आपला जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पूर्ण करीत आहेत. समाजाची गरज ओळखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे देशभरात विभिन्न प्रकारच्या सेवाकार्यात सक्रिय झाले आहेत. अनेक धार्मिक-सामाजिक संस्थांसोबत सामान्य समाजही स्वयंप्रेरणेने आव्हानाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रयत्नांत सहभागी झाला आहे.
समाजविघातक तसेच भारतविरोधी शक्तींच्या माध्यमातून या गंभीर परिस्थितीचा लाभ उठवत देशात नकारात्मकता आणि अविश्वासाचे वातावरण तयार केली जाण्याची ही शक्यता आहे. देशवासियांना सकारात्मक प्रयत्न करत असतानाच या शक्तींच्या षडयंत्राच्या विरोधात सजग राहावे लागेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांसह समाजाच्या सर्व सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या तसेच सेवाभावी संस्था, उद्योग तसेच व्यावसायिक संस्था आदी क्षेत्रांतील बांधवांना नम्र विनंती करत आहे की समस्येचे निराकरण करण्यासाठी तत्परता आणि सेवाभावाने कोणत्याही स्वरुपाच्या आवश्यकतेची पूर्तता करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत.
वर्तमान परिस्थिती लक्षात घेत काही महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे –
~ आरोग्य तसेच शिस्तीसंबंधी सर्व नियमांचे सर्वांनी पालन करावे. सेवा करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःसही सुरक्षित ठेवावे.
~ मास्क वापरणे, स्वच्छता, शारिरीक अंतर, खासगी तसेच सार्वजनिक कार्यक्रमात संख्येच्या मर्यादेचे पालन अशा नियम व शिस्तीसंबंधात तसेच आयुर्वेदिक काढा सेवन, वाफ घेणे, लसीकरण अशा आरोग्य विषयक विषयांबाबत जनजागृती करावी
~ अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. स्थानिक पातळीवर स्वतः सामूहिक निर्णयाद्वारे दैनंदिन कार्य नियंत्रित करावे
~ सर्व स्तरांवर शासन-प्रशासन, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, संरक्षण तसेच स्वच्छता कर्मचारी यांना संपूर्ण सहकार्य करावे.
~ प्रसारमाध्यमांसह समाजाच्या सर्व वर्गांनी समाजात सकारात्मकता, आशा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात योगदान द्यावे, ही विनंती
~ सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या व्यक्तींनी विशेष संयम आणि सजगतेने सकारात्मक भूमिका बजावावी.