मुंबई, दि. २४ : पवई येथील आयआयटी मुंबईच्या विद्यमान आणि माजी अशा तीन विद्यार्थ्यांनी ‘हेल्पनाऊ’ ही खासगी अँब्युलन्स सेवा सुरु केली आहे. ही सेवा मे २०१९ पासून सुरु करण्यात आली असून हेल्पलाईनवर फोन करताच १५ ते २० मिनिटांत अँब्युलन्स सेवेसाठी हजर होते. गरीब नागरिक, पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा मोफत पुरवली जात आहे. तर अन्य नागरिकांना माफक दरात उपलब्ध आहे.
आयआयटी मुंबईत शेवटच्या वर्षाला शिकणारे शिखर अगरवाल आणि आदित्य मक्कर तसेच माजी विद्यार्थी व्यंकटेश अमृतवार या तीन विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या या सेवेचा लाभ आतापर्यंत सुमारे ३० हजारहून अधिक गरजवंतांना घेता आला आहे. मे २०१९ मध्ये तिघांनी सुरु केलेल्या या अँब्युलन्स सेवेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांच्या सोबत आणखी ५० जण कार्यरत आहेत. त्यांची ही सेवा मुंबई, पुणे, दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमध्ये उपलब्ध आहे. मुंबईत सध्या ‘हेल्पनाऊ’ च्या ३५० अँब्युलन्स कार्यरत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने हेल्पनाऊच्या ८८२२२८८२२२, ८८९९८८९९५२ या हेल्पलाइनला चांगला प्रतिसाद लाभत आहे. प्रत्येक ट्रिपनंतर अँब्युलन्सचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रशिक्षण अँब्युलन्सच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून सीपीआर, प्रथमोपचार ते देऊ शकतात.
ऑक्सिजन असलेली अँब्युलन्स, व्हेंटिलेटर असलेली कार्डिएक अँब्युलन्स तसेच शववाहिनी अशा तीन प्रकारच्या अँब्युलन्स उपलब्ध आहेत. मृतदेह वाहून नेण्यासाठी आईसबॉक्सचीही सुविधा शववाहिनीत उपलब्ध आहे. रुग्णासाठी लागणारा बेड कोणत्या रुग्णालयात उपलब्ध होईल याची माहिती देणारी यंत्रणाही ‘हेल्पनाऊ’ च्या टीमकडे आहे. अँब्युलन्स सेवेसंबंधी अधिक माहिती www.gethelpnow.in या वेबसाईटवर उपलब्ध असल्याची माहिती शिखर अग्रवाल याने विश्व संवाद केंद्र, मुंबईशी बोलताना दिली.
**