OpinionSeva

तेथे कर माझे जुळती

मला परवा एक जण भेटला, म्हणाला, तुमच्या ओळखीतून माझ्या भावासाठी वॅक्सीन ची सोय होईल का? मी म्हटले, आधार कार्ड पाठव. आधार पाहिल्यावर समजले की तो ४३ चा होता. मी म्हटलं की सात दिवसांनी १८ ते ४५च्या वयोगटासाठी लसीकरण सुरु होईल तेव्हा घ्यायला सांग. तुझा भाऊ फ्रंटलाईन वर्कर नाही. त्याला नियमाप्रमाणे थांबावेच लागेल. माझ्या ठाम नकारानंतर त्याने काढता पाय घेतला. सांगायचे तात्पर्य हे की आपल्या आजूबाजूला असे अनेक जण आहेत की ज्यांना केवळ स्वार्थ महत्वाचा आहे. त्यांना नैतिकता, नियम सगळे सगळे धाब्यावर बसवायचे असतात. मुख्य म्हणजे त्याचे त्यांना काहीही वाटत नाही आणि हे पाहून डोक्यात सणक जाते. 

आणि याचे दुसरे, विरूद्ध टोक ठरले ते एक ८५ वर्षाचे सद्गृहस्थ. कै. नारायण भाऊराव दाभाडकर नावाचे हे आजोबा नागपुरात वर्धा रोड येथे राहात. यांनी आमच्या लहानपणी प्रत्येक रॅली किंवा सभांना आम्हा सगळ्या लहान मुलांना चॉकलेट देऊ केले आहे. त्यांना कधीही भेटले तरी त्यांच्या खिशात चॉकलेट, पाण्याचे पाऊच किंवा बाटली असायचीच. आमच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या एका मैत्रिणीचे वडील होते ते. आम्हाला त्यांचं अप्रूप वाटायचं ते चॉकलेट वाले काका म्हणून. उन्हात केवळ लहान मुलेच काय तर अगदी मोठे मोठे सुद्धा त्यांची आठवण काढायचे आणि कधी कधी तर थेट मंचावरून सुद्धा त्यांची आठवण केली. उन्हातान्हात झालेल्या सभांमध्ये तर त्यांच्या चॉकलेटचाच सहारा असायचा. चॉकलेट ही एक खूप छोटी गोष्ट, जी मी स्वतः अनुभवली आहे. पण त्यांच्या परोपकाराच्या अनेक गोष्टी सावित्रीविहारमधले आणि शहरातले लोक सांगू शकतील.

कोरोनाच्या ह्या महामारीत, ते काका सुद्धा दुर्दैवाने अडकलेच. आभाळच फाटले होते, त्यामुळे ओळखीचा कुठलाही नेता, समाजसेवी कार्यकर्ता याची मदत होणे शक्य होत नव्हते. तिला इंदिरा गांधी रुग्णालयात कसाबसा एक बेड मिळाला. काकांचे ऑक्सिजन एव्हाना ६० च्या खाली गेला होता. ऑक्सिजन बेड शिवाय पर्याय नव्हता. एम्ब्युलन्समधून त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. ताई स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होती. तिचे सासरे पॉझिटिव्ह होते. त्यामुळे त्यांच्याकडे बघणे सुद्धा महत्वाचे होते आणि म्हणून ती काही दवाखान्यात ऍडमिट करायला जाऊ शकली नाही. ताईच्या लहान जावयाने ऍडमिट केले. काकांना श्वास लागला होता पण ते पूर्ण शुद्धीवर होते. स्वतः एम्ब्युलन्समधून उतरून ते दवाखान्यात चालत गेले. एडमिशनची प्रोसेस लहान जावयानी केली आणि काकांना बेड मिळाला. उपचार सुरु झाले. एव्हाना काकांच्या नजरेस एक दाम्पत्य पडले, ज्यात चाळीशीत असलेल्या नव-याच्या बेड साठी बायको जीवाचे रान करत होती, ओक्सबोक्सी रडत होती. पण बेड काही उपलब्ध होईना. अशात एक स्वयंसेवक काय करू शकतो?

काका डॉक्टरांना म्हणाले, “मी आता ८५ वर्षांचा आहे, माझे जे काही आयुष्य होते ते आता जवळपास पूर्ण झाले आहे.मी समाधानी आहे. ह्या तरुणाचे वाचणे मात्र खूप खूप महत्वाचे आहे.त्याचे अजून खूप आयुष्य बाकी आहे. त्यांची मुले लहान आहेत. मला बेड नको. तुम्ही माझा बेड त्यांना द्या, त्यांना तातडीने वाचवा.” जावयाने समजवण्याचा प्रयत्न केला, डॉक्टरांनीही परिस्थिती सांगितली की, तुम्हाला आता उपचार खूप महत्त्वाचे आहे आणि पुन्हा बेड मिळेल का सांगता येत नाही. काकांनी शांतपणे आणि निग्रहाने ताईला फोन केला आणि सांगितले मी घरी येतो, तेच उचित आहे. ताई पण शेवटी ह्याच काकांची मुलगी… ज्या वडलांसाठी आकाश पाताळ एक करून बेड मिळवला ते म्हणतात की बेड नको!  पण तिनेसुद्धा ते समजून घेतले. डॉक्टरांना तसा कन्सेंट लिहून दिला की, आम्ही आमच्या मर्जीने बेड सोडीत आहोत आणि घरी जात आहोत. जावई त्यांना घरी घेऊन आले.

काकांनी दोन दिवस तग धरला आणि तिसऱ्या दिवशी घरीच अनंतात विलीन झाले. 

आयुष्यभर परोपकार केलेला स्वयंसेवक आयुष्याच्या अखेरीससुद्धा एक महत्वाचे कार्य करून जातो, परोपकाराने अक्षरश: जीवदान देऊन जातो ! कोणत्या शब्दात त्यांची महती सांगायची.

कोरोना खूप भयंकर गोष्टी  दाखवतो आहे. जगण्याचा क्रूर चेहरा समोर येतो आहे. श्रीमंत, तथाकथित सुसंस्कृत म्हणवून घेणारे कसे वागतात हे बघायला मिळते आहे. लस नियमाबाहेर जाऊन घेतील, गरज नसताना ऑक्सिजनचा साठा करतील, रेमडेसीवीर साठवून ठेवतील आणि दुसरीकडे हे असे दाभाडकर काका जे शेवटच्या क्षणाला सुद्धा परोपकार करून जातात. 

काका, भावपूर्ण श्रद्धांजली !

-शिवानी दाणी, नागपूर

Back to top button