
जालना। कोरोना महामारीमुळे सर्वत्र समस्या निर्माण झालेल्या असताना सामान्य व्यक्तीला ऍम्ब्युलन्स किंवा अन्य वाहनांसाठी वाजवीपेक्षा जास्त दर आकारले जात आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या माणसाने दवाखान्यात जावे कसे असा मोठाच पेच निर्माण झाला आहे. त्यावर उपाय म्हणून जालना शहरात रा. स्व. संघ कोरोना आपत्ती निवारण समिती तर्फे अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. आणि चक्क ऑटो ऍम्ब्युलन्स ही नवीन कल्पना समाजसेवेत उतरवली आहे.
जालना शहरात आपत्कालीन सेवा म्हणून आपत्ती निवारण समितीने ऑटोरिक्षालाच ऍम्ब्युलन्स बनवले आहे. ज्यामध्ये रुग्णाला व्यवस्था मिळावी काही रिक्षा चालकांसोबत टायप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या रिक्षामध्ये ऑक्सिजनचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय याचे दर सामान्य माणसाला परवडणारे असून शहरात कितीही दूर जायचे असले तरीही 400 रुपयेच आकारले जातात, या सोबत जर ऑक्सिजनची गरज भासली तर केवळ 50 रुपये इतरक्त द्यावे लागतात. असा हा अभिनव कल्पना जालना येथील नागरीकांना नक्कीच उपयोगी पडेल यात शंकाच नाही.
कोरोना आपत्ती निवारण समितीने मागील दीड महिन्यापासून जालना जिल्ह्यात विविध सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये जनकल्याण समिती, जनकल्याण रक्तपेढी व अन्य संस्था सहभागी आहेत. या संस्थांच्या माध्यमातून 45 घरगुती ऑक्सीजन सप्लाई मशीन, फाऊलर बेड, व्हील चेअर, कमोड चेअर, वॉटर बेड, एअर बेड, फोल्डिंग वॉकर, वॉकिंग स्टिक आदी सेवा – सुविधा देण्यात येत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना समितीच्या प्रयत्नातून मात्र थेट दवाखान्यात जाऊन रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यात समितीला मोठे यश आले आहे.
– विश्व संवाद केंद्र, देवगिरी