- प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली, दि. २९ एप्रिल : आपल्या समाजाची संवेदनशीलता आणि सक्रीयता अद्भुत आहे. लोक आपले प्राण संकटात घालून विपरीत स्थितीत कार्य करीत आहेत. परिस्थिती बिकट आहेच पण, भारतीय समाजाची शक्तीही विशाल आहे. समाजातील सर्व लोकांच्या सहकार्याची आवश्यकता असून, आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच आपण कोरोनाला मात देऊ शकतो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले.
डिजीटल माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा भारतीच्या माध्यमातून चालविण्यात येत असलेल्या सेवाकार्याची माहिती दिली. कोरोना संसर्गाच्या दुस-या लाटेमुळे देशभरातील अनेक भाग प्रभावित झाले आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टर्स आणि परिचारीका तसेच, ऑक्सीजन आणि औषधांची तरतूद करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या कर्मचाèयांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एवढेच नाही तर, स्वच्छता आणि सुरक्षा कर्मचारी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवाभारतीसहीत इतर संघटना आणि संस्था, कोविडमुळे प्रभावित क्षेत्रांमध्ये आणि कुटूंबियांना मदत पोहचविण्याचे काम करीत असल्याचे सांगून ते म्हणाले की, संघाने प्राथमिकतेच्या आधारावर बारा विविध क्षेत्रातील कामांना लगेच सुरुवात केली आहे.
संशयित कोव्हिडबाधितांसाठी विलगीकरण केंद्र आणि बाधितांसाठी कोव्हिड केअर सेवा केंद्र, शासकीय कोव्हिड केअर केंद्रांना आणि रुग्णालयांना मदत, मदत क्रमांकांची सुरुवात, रक्तदान, प्लाझ्मा दान, अंत्यसंस्काराचे कार्य, आयुर्वेदीक काढ्याचे वितरण, समुपदेशन, प्राणवायूचा पुरवठा, रुग्णवाहिकांची तरतूद, भोजनव्यवस्था, धान्यपुरवठा, मास्क-लसीकरण याविषयी जागरुकता यासारख्या महत्त्वपूर्ण कामांना तात्काळ प्रभावाने देशाच्या विविध राज्यांमध्ये सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाला सहकार्य करीत, उपक्रम राबविले जात आहेत. इंदूरमध्ये संघाच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेले १२०० खाटांचे रुग्णालय शासन आणि समाजाच्या समन्वित कार्याचे सर्वोत्तम उदाहरण ठरल्याचे ते म्हणाले.
सध्या देशातील ४३ प्रमुख शहरांमध्ये स्वयंसेवक कोव्हिड सेवा केंद्र चालवित असून, २१९ ठिकाणी कोव्हिड रुग्णालयांमध्ये प्रशासनाच्या सहकार्याने काम केले जात आहे. लसीकरणासाठी दहा हजारांपेक्षा जास्त ठिकाणी जागरुकता अभियानासोबतच, आतापर्यंत २,४४२ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.