भारतातील कोरोनाग्रस्तांना अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन
कोरोनाच्या उद्रेकामुळे भारतात चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज हजारो नवीन रुग्णांची भर पडत आहे. गेल्या वर्षभरापासून दिवस-रात्र भारतातील डॉक्टर, नर्स कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. या रुग्णांची शुश्रूषा करण्याचे मोठे आव्हान ते सातत्याने पेलत आहेत. मात्र रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडत असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. देशातील ही परिस्थिती पाहून अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी समाजाप्रति असलेली बांधिलकी ओळखत भारतातील कोरोना रुग्णांना मदत करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेत स्थायिक असलेले भारतीय वंशाचे डॉ. अभिजित नाकवे, डॉ. हेमराज गायधनी, डॉ. निशांत सांगोळे, डॉ. गुप्ता, डॉ. नितीन ठाकरे या डॉक्टरांनी mdtok नावाचे स्टार्टअप सुरु केले आहे. या स्टार्टअपमध्ये जवळपास २५० डॉक्टर्स जोडले गेलेले आहेत. या स्टार्टअपद्वारे रुग्णांना किँवा त्यांच्या नातेवाईकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेता येणार आहे. सल्ला घेण्यासाठी त्यांना वणवण भटकण्याची गरज नसून हा सल्ला त्यांना मोबाईलवरून किँवा कॉम्प्युटरवरून मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीये.
कोरोना हे जागतिक संकट आहे. याचा फटका भारतालाही बसत आहे. आपली लोकसंख्या मोठी असल्याने कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. त्यासाठी भारतातील कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय सल्ला देण्यासाठी भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी सदर स्टार्टअप तयार केले असून त्या अंतर्गत देशातील रुग्णांना त्यांच्या भाषेत कोरोनाबाबत नेमके उपचार सांगितले जात आहेत.
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोनाबाधितांना अमेरिकेतील डॉक्टरांशी थेट संवाद साधता येईल. त्यासाठी www.mdtok.com/org/covid19 हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. mdtok द्वारे रुग्णांना घरी अथवा रुग्णालयातून त्यांचे मेडिकल रिपोर्ट थेट अमेरिकेतील डॉक्टरांना दाखवता येतील व सल्ला घेता येईल. आतापर्यंत जवळपास एक लाख रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सल्ला देण्यात आला आहे. मार्गदर्शन करणारे सगळे डॉक्टर्स हे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स असून त्यांची अपॉईंटमेंट मिळण्यास ३-४ महिने थांबावे लागते. शिवाय त्यांची फी देखील हजारो डॉलर्स असते. मात्र भारतातील अडचणीत सापडलेल्या रुग्णांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेतून या डॉक्टरांनी विनाविलंब, विनाशुल्क मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे.
सदर वेबसाईटद्वारे सल्ला किंवा मार्गदर्शनासाठी येणारे सर्वाधिक रुग्ण हे तमिळनाडू, उत्तरप्रदेश, पंजाब मधील आहेत. रुग्ण दुसऱ्या सल्ल्यासाठीही (सेकंड ओपिनियन)या संकेतस्थळावरील डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात. डॉक्टर्स रुग्णांचे फॉलोअपसाठीचे कॉल्सही घेतात. तसेच रुग्णांचे समाधान होईपर्यंत त्यांना मार्गदर्शन करीत असतात.
देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून अमेरिकेत वैद्यकीय सेवा करणारे सुमारे ५० हजार डॉक्टर आहेत. त्यांच्यापैकी काही डॉक्टर पहिल्या टप्प्यात या कोरोनाच्या व्यासपीठात सहभागी झाले आहेत. मराठी, पंजाबी, गुजराती, हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतून हे डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत.
देशातील नागरिकांना संकटाच्या काळात तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. रुग्णांचा प्रतिसाद मिळाल्यास या सेवेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून रुग्णांच्या वाढत्या प्रमाणात अमेरिकेतील भारतीय वंशाच्या आणखी डॉक्टरांना सहभागी करून घेण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.