विविध सेवाभावी संस्थामार्फत रविवारी पार पडलेल्या रक्तदान शिबिरांत ४०० हून अधिक जणांचे रक्तदान
कल्याण, दि. १७ मे : रविवार, दि. १६ मे रोजी कल्याण, डोंबिवली भागात विविध सेवाभावी संस्थामार्फत संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरांत ४०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
डोंबिवलीतील भारत विकास परिषद,विवेकानंद सेवा मंडळ,भारतीय जनता युवा मोर्चा, व्योम संस्था, डोंबिवली आणि कल्याण डोंबिवली ब्रांच ऑफ आयसीएआय, यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे २१७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. चिदानंद रक्तपेढी डोंबिवली यांच्या साह्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी नोंदणीही केली.
कल्याण पूर्व रक्तदाता मंचाच्या वतीने कल्याण पूर्वेतील मॉडेल इंग्लिश शाळेत संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान-कल्याण, राजे प्रतिष्ठान, भीम शक्ती मित्र मंडळ, हिंदू एक्यवेदी, श्री. ज्ञानेश्वर माऊली सार्वजनिक वाचनालय, जनकल्याण प्रतिष्ठान, समन्वय चॅरिटेबल ट्रस्ट, अंजुरा संस्था, रोटरी क्लब-कल्याण, वरद फाऊंडेशन, KEMPSWA ( Kalyan East Medical Practitioners Social Welfare Association, जय हनुमान मित्र मंडळ, भारतीय जनता पक्ष इ. संस्थांनी सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिरात कल्याण पूर्वेतील १४७ पुरुष व ५ महिला अशाप्रकारे १५२ दात्यांनी रक्तदान केले. त्याचप्रमाणे २७ जणांची प्लाझ्मा डोनर म्हणून नोंदणी करण्यात आली आहे.
‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कल्याण शहर, स्व. अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती आणि हेल्पिंग हॅण्ड्स’ यांच्या वतीने, ओक हायस्कूल,कल्याण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ.संदीप निंबाळकर (आरोग्य अधिकारी, कडोंमपा) देवदत्त जोशी (अभाविप पश्चिम क्षेत्रिय संघटन मंत्री), कविता वालावलकर (अभाविप पूर्व कार्यकर्ता आणि कै. वामनराव ओक रक्तपेढी, सचिव) आणि अमोल शिंदे (कल्याण शहर मंत्री, अभाविप) यांच्या हस्ते झाले. कै. वामनराव ओक रक्तपेढी, ठाणे यांच्या देखरेखीखाली झालेल्या या रक्तदान शिबिरात ४१ जणांची नोंदणी झाली त्यापैकी ३५ जणांनी रक्तदान केले.
विविध सेवाभावी संस्थांच्या पुढाकारातून मुंबई,ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात गेल्या महिनाभर पार पडलेल्या रक्तदान शिबिरांत १० ते १२ हजारांहून अधिक युनिट्स रक्तसंचय झाला आहे.
**