तुमच्या जिद्दीला प्रणाम!
ध्येय साध्य करायचे असेल, आव्हानांना पार करून जायचं असेल तर मनात जिद्द हवी, असं म्हटलं जातं. तुमचं वय किती आहे, क्षमता किती आहे, यश मिळण्याची शक्यता आहे की नाही या सगळ्या बाबी अनेकदा दुय्यम ठरतात हे गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा दिसून आले आहे. कोरोनावर वयोवृद्ध नागरिक यशस्वीपणे मात करत असल्याचं विविध वृत्तांतून आपल्या दृष्टीस पडलं आहे.
कोरोना बरा होण्याचे प्रमाण अधिक असले तरी या आजाराची एक अनामिक भीती पहिल्या टप्प्यापासूनच सर्वत्र भरून राहिली आहे. आता लहान मुलांनाही कोरोना झालेला दिसून येत आहे. अनेकांनी आपले आप्त, कुटुंबीय गमावले आहेत. पण त्याचवेळी दुसरीकडे ८०हून अधिक वय असणारे अनेक जण यशस्वीरित्या या आजाराला तोंड देत आहेत व यातून बाहेरही येत ठणठणीत बरे होत आहेत.
हरिश्चंद्र साळुंखे या बेलकुंडच्या ९९ वर्षीय आजोबांनी या वयात कोरोनावर यशस्वीपणे मात केली. आपण गृहविलगीकरणाच्या काटेकोर पालनामुळेच यातून यशस्वीपणे बाहेर आलो. समुपदेशन, सकस आहार आणि वेळच्यावेळी घेतलेली औषधं हे तर आहेच. पण आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असेल तर कोरोनाच काय, कोणी तुम्हाला हरवू शकत नाहीत, असं साळुंखे सांगतात. त्यांच्याप्रमाणेच कोरोनाला हरवणारे डोंबिवलीतील डॉ. भीमराव कुलकर्णी. वयाच्या अठ्ठ्याणव्याव्या वर्षी कोविडवर यशस्वी मात करून डोंबिवलीचे डॉ. भीमराव कुलकर्णी आजोबा पुन्हा आपल्या भाषांतराच्या कामामध्ये व्यस्त झाले आहेत. या आजोबांनी चारही वेदांचे मराठीत भाषांतर केले असून, सध्या ते उपनिषदांच्या भाषांतरावर लक्ष केंद्रीत करीत आहेत. डॉक्टरांचं पूर्ण लक्ष आणि रुग्णालयाने घेतलेली काळजी यामुळेच मी कोरोनातून ३० दिवसांनंतर बाहेर आलो आणि आता ठणठणीत झालो आहे. संस्कृतमधील प्राचीन वाङमय मराठीत आणण्याचं काम अजूनही खूप शिल्लक आहे आणि ते पूर्ण करणं हे माझं ध्येय आहे. मिरजेतील ९३वर्षीय लीला वाघमोडे यांनी ९३व्या वर्षी कोरोनाशी लढा दिला आहे. वेळेवर औषधं घ्या, डॉक्टरांच्या सूचना पाळा, कोरोना नक्की बरा होतो, असं त्या आवर्जून सांगतात. त्यांच्याच वयाच्या डोंबिवलीच्या सुंदरबाई भोईर. कोरोनाचा संसर्ग झालेला, ऑक्सिजन सॅच्युरेशन ७० पर्यंत घसरलेलं आणि छातीत इन्फेक्शन अशी परिस्थिती असताना सुंदरबाईंनी ९३व्या वर्षी ठणठणीत बऱ्या होण्याची कमाल करून दाखविली आहे. जिथे जिद्द असते तिथे यश मिळतंच याचं उदाहरणच त्यांनी दाखवून दिलं आहे. लातूरचे निवृत्त प्राचार्य शंकर मांडे यांनी वयाच्या ८३व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयात दाखल केलं तेव्हा शंकर गुरुजींचं ऑक्सिजन सॅच्युरेशन होतं अवघं ६९. पण दैनंदिन व्यायाम, घरचं सकस व रुचकर जेवण, प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार हे तुम्हाला नक्कीच कोरोनामुक्त करू शकतात.
रुग्णाचं मनोबल वाढवलं आणि त्याला आप्तांची साथ मिळाली तर कठीणातील कठीण परिस्थितीतला रुग्णही कोरोनामुक्त होऊ शकतो हे प्रियांका कांबडेने दाखवून दिले आहे. काकडपाडा येथे राहणारी प्रियांका कांबडे आणि तिचे कुटुंबीय नजिकच्या कोविड सेंटरमध्ये दाखल झाले. वडील नुकतेच वारलेले, आई आणि भाऊ कोविडग्रस्त, अशा स्थितीत प्रियांकाचीही तब्येत खालावली. ऑक्सिजनची पातळी थेट ४५वर येऊन पोहोचली. पण कोरोनामुक्त झालेल्या आईने प्रियांकाचं मनोबल वाढवलं, तिला यातून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली. आईची साथ आणि भारतमाता रुग्ण सेवा समितीच्या मदतीने कठीण अवस्थेतील कोरोनावरही मात करून प्रियांका आता ठणठणीत बरी झाली आहे.
ही सगळी उदाहरणं कोरोनाच्या नैराश्यमय कालखंडात मनाला उभारी देतात. हे ही दिवस जातील असा आत्मविश्वास देतात आणि कोरोना नक्की बरा होतो अशी सकारात्मक जाणीव मनाला करून देतात. ८०च्या वर वय असताना किंवा प्रियांकासारखी आव्हानात्मक स्थिती असतानाही कोरोनाला आत्मविश्वासाने हरवणाऱ्या या मंडळींच्या जिद्दीला शतशः प्रणाम
**