OpinionSeva

देशभरातील दुर्गम भागांत सेवाकार्य करून गावांचे सक्षमीकरण करणारे ‘एकल’

कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसरी लाटही जीवघेणी ठरत आहे. या लाटेने  देशातील कोनाकोपऱ्यावर  हल्ला केला आहे.   या जीवघेण्या लाटेचे दुष्परिणाम ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.  देशभरातील ग्रामीण तसेच दुर्गम भागांत कोरोनाने आणखी भयानक रुप धारण करू नये  याकरिता शासनामार्फत  प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र दुर्गम भागात शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या सोयीसुविधा पोहोचायला वेळ लागतो, किंबहुना कधीकधी त्या पोहोचतही नाहीत. याकरिता एकल अभियानानाने अशा भागांतील आपल्या समाजबंधूंना सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देशभरातील दुर्गम भागात शिक्षण देणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एकल या संस्थेच्या आरोग्य फाऊंडेशन ऑफ इंडियाने कोरोना प्रभावितांसाठी  एक हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे. या हेल्पलाईन वर २० मे २०२१ पर्यंत मदतीसाठी आलेल्या  १ हजार ७३६  कॉल्सवरील शंकांचे निरसन करण्यात आले.  दुर्गम भागात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे  ८९७ रुग्णांना तपासण्यात आले.  जिथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही तिथे  कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन गावकऱ्यांची  तपासणी करण्यात आली. एकूण  १ लाख  ६३ हजार १४१ गावांतील भिंतींवर  हेल्पलाइन नंबर व कोरोनापासून सुरक्षा,  त्यासाठी घेण्यात येणारी खबरदारी आणि प्राथमिक उपचाराकरिता गावकऱ्यांना  जागरूक केले जात आहे.

इतकेच नाही तर  एकलचे  सेवाव्रती व जीवनव्रती कार्यकर्ता आपापल्या स्तरावर गावांना कोरोना महामारीपासून सुरक्षित ठेवण्याच्या कार्यासाठी अतोनात मेहनत घेत आहेत. गावातील एकल शिक्षकांच्या माध्यमातून गावकऱ्यांना  मास्क, सॅनिटायझरचे वितरण तसेच गावकऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखले जावे याकरिता योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.  अनेक ठिकाणी एकलच्या  पुढाकाराने गावकऱ्यांनी स्वतःच संपूर्ण गावात लॉकडाऊनचे नियम पाळले आहेत. बाहेरील व्यक्तीला गावात  प्रवेश हवा असेल तर त्याची तपासणी केली जाते तसेच अत्यावश्यक असेल तरच गावात प्रवेश दिला जात आहे.  गावात प्रवेश दिल्यानंतरही त्या व्यक्तीला १५ दिवस आयसोलेट केले जात आहे.  जर गावातील एखाद्या व्यक्तीमध्येच कोरोनाची लक्षणे दिसून आली  किंवा आजार उदभवल्यास तात्काळ त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.   एकल गावप्रमुख  आसपासच्या मोठ्या शहरातील   सामुदायिक आरोग्य केंद्रांशी संपर्क करून  कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तत्पर रहात आहेत. आरोग्य विभागाच्या सेविकांच्या माध्यमातून गावागावांत  आयुष काढ्याच्या  प्रचार-प्रसारासोबतच त्याच्या वितरणाची व्यवस्था देखील केली जात आहे.   सेविकांच्या माध्यमातून  रोग प्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी  योग,  प्राणायाम  तसेच  पंचामृताच्या सेवनावर भर दिला जात आहे.   एकल ग्रामविकास विभागाकडून गावकऱ्यांत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून कोरोनापासून बचाव करण्यासाठीचे संदेश  बॅनरच्या स्वरूपात लावले जात आहेत.

एकल ग्रामविकासाच्या एकूण पाच महिला सशक्तिकरण केंद्रांवर  मास्क तयार करण्याच्या कार्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत  एकूण ४२ हजार ३००  मास्क तयार करण्यात आले. ज्यामध्ये २५ हजार ५०० मास्कचे गावात वितरण करण्यात आले.   याव्यतिरिक्त  दिल्ली समितिच्या माध्यमातून  २१ मे  २०२१ पासून  एक लाख मास्क चे वितरण करण्यात आले.  गावाच्या सॅनिटायझेशनकरिता सुरुवातीला   पाच हजार गावांत औषधांच्या कीटचे वितरण करण्यात आले. या संख्येत आणखी वाढ करण्यात येत आहे.  गावांत लसीकरणाकरिता जागरूकता निर्माण व्हावी तसेच जास्तीजास्त लोकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, याकरिता  २ लाख ९१ हजार ४४४ पॅम्पलेट व  पोस्टर गावागावांत वितरित करण्यात येत आहेत. यामध्ये  कडक बंदमुळे दक्षिण भारत आणि पंजाबचा मात्र समावेश नाही. ग्रामविकास आणि शासनाच्या मदतीने  तिनसुकिया ग्रामोत्थान अनुसंधान केंद्रावर आतापर्यंत ७२४ गावकऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.   एकल सेवा केंद्राने आयसोलेशन केंद्र तयार करून उपचाराकरिता आवश्यकत सोयीसुविधाही उपलब्ध केल्या आहेत. एकल ग्रामोत्थान अनुसंधान केंद्राच्या वतीने  जरंग्लोई, झर्शुगुडा, करंजो (चक्रधरपुर), सोनगढ़, तिनसुकिया, गजरौला, नैमिषारण्य, खंडोली (गिरिडीह), खरगोन, उच्चैन येथे १०० आयसोलेशन बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.  हे सर्व ग्रामोत्थान अनुसंधान केंद्र आसपासच्या गावांतील लोकांसाठी आशेचा किरण ठरत  आहेत.  याव्यतिरिक्त  दुम्मा (देवघर), दाहोद, डंग, देदियापारा (नर्मदा) व मथुरा येथील आईवीडी केंद्रावर ३० बेड्सचे आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहे.  याचप्रमाणे  छोटा उदयपुर, अयोध्या, गुमला (विशुनपुर) व तीतरो  (सहारनपुर) येथील केंद्रांवरसुद्धा २५ बेड्सच्या आयसोलेशन सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व  आयसोलेशन केंद्रांवर  26 कोरोनाप्रभावितांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. यातील एका गंभीर रुग्णाला शहरातील मोठ्या रुग्णालयात उपचारार्थ  पाठविण्यात आले आहे. या केंद्रांव्यतिरिक्त  वनबंधु परिषद, कोलकाता येथील आईएलएस रुग्णालय  तसेच  हवेली हॉटेल यांच्या सहयोगाने  एकल आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आले असून या  सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व  सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

एकलच्या माध्यमातून  गावांमध्ये  डायग्नोस्टिक व्यवस्थाही उपलब्ध करण्यात येत आहे.  याअंतर्गत एकल विद्यालय फाउंडेशन ऑफ अमेरिका च्या सहयोगाने भारतातील  एकूण ५ हजार गावांत एक-एक यूनिट ऑक्सीमीटर व थर्मामीटर वितरणास सुरुवात झाली आहे.  एकल आरोग्य योजनेच्या माध्यमातून  आरोग्य संसाधन केंद्राच्यावतीने  एकूण १ हजार २३० गावांमध्ये ऑक्सीमीटर व थर्मामीटर वितरित करण्यात आले आहेत.  एकलने गावांना या महामारीच्या तावडीतून सोडविण्यासाठी अन्य सामाजिक संस्थांचे सहकार्यही मिळविले आहे . आयुष विभागाच्या सहयोगाने  एकल आरोग्य योजनेतून २१ मे पासून ते २१ जून २०२१ पर्यंत (आंतरराष्ट्रीय योग दिन ) म्हणजेच एक महिना रोज एक तास आभासी योग शिबिराचे आयोजन केले जात आहे.  ज्या गावांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी रेकॉर्डिंगच्या मदतीने  गावकऱ्यांना योगाप्रती  जागरूक केले जात आहे. सेवा भारतीद्वारा  दिल्ली मध्ये १८  कोविड हेल्थ केयर सेंटरचे शुभारंभ करण्यात आले.  ज्यामध्ये  एकलच्या सहयोगाने  प्रत्येक केंद्रात दोन-दोन कार्यकर्त्यांसहित एकूण  ३६  कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्व हिन्दू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय अशोक सिंघल जी यांनी  एकल संदर्भात  म्हटले होते, ‘समाजाच्या हाती ब्रह्मास्त्र लागले आहे, ज्याचे नाव  एकल विद्यालय आहे. याच्या माध्यमातून आपण देशातील सर्व समस्यांवर विजय मिळवू.’  अशोक जी यांनी दिलेल्या या पाठबळाला  एकल ने शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसाराकरिता आपले मूलमंत्र बनविले आहे.   कोरोना महामारीच्या या काळात अशोकजी यांचे सदरहू शब्दच  एकल कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तसेच त्यांचे  मनोबल वाढवीत आहेत.  गावांना गावांना  कोरोनापासून वाचविणे, हे एकमेव लक्ष्य समोर ठेवून त्यादिशेने कार्यरत आहेत. 

Back to top button