News

‘नीरी’ ने विकसित केली केवळ गुळण्यातून कोविड चाचणी करणारी पद्धत

नागपूर, दि. २७ मे : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या मार्गदर्शनाखाली, कोविड- १९ च्या नमुना चाचणीसाठी सलाइन पाण्याच्या गुळण्यातून होणारी आरटी-पीसीआर पद्धत शोधून काढली आहे. गुळण्या करण्याची ही पद्धत अत्यंत सोपी, रुग्ण-स्नेही आणि आरामदायक असून जलदरित्या निष्कर्ष देणारीही आहे.

सध्या वापरात असलेल्या स्वॅब गोळा करण्याच्या पद्धतीस वेळ लागतो. तसेच नाक, घशाच्या आत साधन घालून, स्वॅब काढला जात असल्याने ही पद्धत अनेकदा त्रासदायकही ठरते. हा स्वॅब संकलित करण्यासाठी तंत्रज्ञान तज्ञांची गरज असते. मात्र ‘नीरी’ ने नुकतीच विकसित केलेली सलाईन पाण्याच्या माध्यमातून गुळण्या करण्याची आरटी-पीसीआर पद्धत ही सोपी असून त्याचे नमुने लगेच संकलित केले जातात आणि निष्कर्ष तीन तासांत मिळू शकतात, अशी माहिती नीरीच्या पर्यावरणीय विषाणू संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ कृष्णा खैरनार यांनी दिली.

गुळण्या करण्यासाठी केवळ सलाईनयुक्त नलिका वापरली जाते. या नलिकेतील सलाईन पाण्याने संबंधित व्यक्तीला गुळण्या करायच्या असून गुळण्या केलेले पाणी त्या नलिकेत जमा करायचे असते. संबंधित व्यक्ती स्वतःच आपले नमुने गोळा करू शकते. हा नमुना मग प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. तिथे सामान्य तापमानात, नीरी ने तयार केलेल्या एका विशिष्ट द्रावणात ते मिसळून ठेवले जाते. त्यानंतर जेव्हा हे द्रावण गरम केले जाते, त्यावेळी, आरएनए टेम्प्लेट तयार होते. या आरएनए मधून पुढे आरटी-पीसीआर म्हणजेच, रिव्हर्स ट्रान्सक्रीप्शन पॉलिमरेस चेन रिएक्शन (RT-PCR) प्रक्रिया केली जाते. नमुना संकलनाच्या आणि प्रक्रियेच्या या विशिष्ट पद्धतीमुळे आरएनए वेगळे काढण्याच्या महागड्या प्रक्रियेसाठी येणारा खर्चही कमी आहे.

ग्रामीण आणि वनवासी भागांमध्ये, जिथे पायाभूत सुविधांची कमतरता आहे, तिथे चाचण्यांसाठी ही अभिनव चाचणी प्रक्रिया विशेष उपयुक्त ठरेल, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञान-विरहित (non-technique) चाचणी पद्धतीला आयसीएमआर म्हणजेच, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची मान्यता मिळाली आहे. हे तंत्रज्ञान देशभरात सगळीकडे वापरता यावे, यासाठी नीरीने या चाचण्यांचे प्रशिक्षण इतर प्रयोगशाळांमधील तंत्रज्ञानांना द्यावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेनेही,या पद्धतीनुसार चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे, त्यानुसार, मान्यताप्राप्त प्रोटोकॉलनुसार, नीरीने चाचण्या घेणे सुरु केले आहे.

Back to top button