अनाथ बालकांच्या आयुष्याचे ‘नंदनवन’ करणारे शंकरबाबा पापळकर
अगदी बालवयापासून धोब्याचे काम करणाऱ्या शंकरबाबा पापळकर यांच्या मनावर लहानपासूनच गाडगेबाबांची भुरळ होती. यातूनच पुढे गाडगेबाबांच्या कार्यांचा ध्यास घेऊन १९९० साली शंकरबाबांनी ‘देवकी नंदन गोपाला’ मासिक सुरु केले. मासिकासाठी जाहिरातदार, वर्गणीदार मिळविण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथे घातले. महाराष्ट्रात फिरत असताना दिव्यांग, निराधार मुलांच्या व्यथा त्यांच्या दृष्टीस पडत होत्या. याच जाणीवेतून त्यांनी अचलपूर तालुक्यात स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृह सुरु केले. बालगृह सुरु झाले त्यावेळी तेथे २०० मुले होती. सध्या वसतिगृहात ९८ मुली आणि २५ मुले असे एकूण १२३ मुलांचे वास्तव्य आहे. या सर्व मुलांना शंकरबाबा पापळकर यांनी आपले स्वतःचे नाव दिले. त्या सर्वांचे आधारकार्ड, रहिवासी दाखले काढण्यात आले २४ मुलामुलींचा संसार थाटून दिला, १२ मुलांना सरकारी नोकरी मिळवून दिली. शंकरबाबा आज २५-३० शारीरिक आणि बौद्धिक सक्षमता असलेल्या सुदृढ नातवंडांचे आजोबा आहेत.
जन्मदात्रीने परके केलेल्या, वडिलांचे छत्र हरपलेल्या अशा जन्मापासूनच पोरक्या झालेल्या मुलांचे जीवन हे अंधारयात्रेत भरकटल्याप्रमाणे असते. अशा या निराधार मुलांना तसेच अंध, अपंग, मतिमंद बालकांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या शंकरबाबांनी या मुलांच्या आयुष्याचे नंदनवन केले आहे. आणि अनाथ बालकांचे हे नंदनवन आणखी एका अनोख्या गोष्टीने हिरवळू लागले. ते म्हणजे शंकरबाबांनी याच मुलांच्या मदतीने वझ्झर येथे २५ एकरात साकारलेले १५ हजार वृक्षलतिकांचे जंगल. गेल्या दहा-बारा वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात बाबांनी स्वत: रोपटी विकत आणून याच अनाथ बालकांच्या हाताने लावली. त्याचे याच मुलांच्या मदतीने पूर्ण वाढ होईपर्यंत संगोपन आणि संरक्षण केले. आज यातूनच जवळपास शंभर टक्के रोपट्यांची झाडे फुलाफळांवर आली आहेत. असंख्य प्रकारचे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे, कीडे किटकं यावर आपलं जीवनचक्र चालवतांना दिसतात. तर याच वृक्षांच्या छायेत ही अनाथ मुले आनंदाने जीवन जगतांना दिसतात. या मोठ्या कुटुंबाच्या अथक परिश्रमातून साकारलेले हे वझ्झरचे अरण्य पर्यावरण समतोलातही अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे.
कडुनिंब, साग, आवळा, सिताफळ, चिक्कू, करवंद, लिंबू, लवंग या निरनिराळ्या प्रकारच्या १५ हजार झाडांपैकी ५ हजार झाडे ही केवळ कडुनिंबाची आहेत. या दाट वृक्षलतांमुळे येथे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होतो. रोज सकाळी मुलांना कडुनिंबाची पाने चघळायला दिली जातात, तर दररोज संध्याकाळी कडुनिंबाची सुकलेली पाने जाळून त्याचा धूर केला जातो. मागील दीड वर्षांपासून संपूर्ण जगभरात धुडघूस घातलेल्या कोरोनाने डेरेदार वृक्षलतिकांच्या या सुरक्षाकवचामुळे बालगृहात प्रवेश करण्याची हिम्मत केली नसावी. कोरोनाच्या बचावापासून घालून दिलेल्या नियमांचे येथे तंतोतंत पालन केले जात असल्यामुळे हे दिव्यांगांचे बालगृह कोरोनापासून आजही कोसो दूर आहे.
देशातील सर्वच सुधारगृहांमधील १८ वर्षांवरील मुला-मुलींना शासनाच्या आदेशान्वये बाहेर काढावे लागते. लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या मुलांना बाहेर काढणे, त्यांचे पुढे काय होते, ते सुरक्षित असतात का, असे नानाविध प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात. त्यामुळे अशा निराधार, बेवारस गतिमंद मुलांकरिता आजीवन पुनर्वसनाचा कायदा व्हावा, अशी त्यांची मनापासून इच्छा आहे.
शंकरबाबांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आजतागायत पदमश्री, पदमभूषण तसेच अन्य सरकारी पुरस्कार देऊ करण्यात आले होते. मात्र या सर्व पुरस्कारांना शंकरबाबांनी प्रांजळपणे नकार दिला आहे. भारतातील १८ वर्षांवरील निराश्रित मुलांच्या पुनर्वसनासाठी कायदा व्हावा;ही एकच मागणी त्यांची आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे साकडे घालावे, या अपेक्षतेतून विद्यापीठाचा मानद डी.लिट. सन्मान नुकताच शंकरबाबांनी स्वीकारला आहे. दिव्यांग, निराश्रित मुलांच्या पुनर्वसनासाठी लढणाऱ्या अनाथांच्या या नाथाला प्राप्त झालेली ही पदवी त्यांचा यथोचित सन्मान करणारी आहे, जी सगळ्यांसाठीच गौरवास्पद बाब आहे.