Opinion

भोसलाची रामभूमी ही खरोखर रामभूमी

त्यादिवशी स्वामी विवेकानंदभवनमध्ये नागालँड  वरून आलेल्या एका विद्यार्थ्याच्या आईला भेटण्यासाठी मी आलो होतो. यावर्षी इयत्ता सहावीमध्ये नागालँड वरून एक विद्यार्थी आपल्याकडे शिकायला येणार  आहे याची थोडीफार पूर्वकल्पना होती. विवेकानंदभवनमध्ये शिरलो. विवेकानंदभवन म्हणजे भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एका होस्टेलची इमारत. त्या विद्यार्थ्यांच्या खोली जवळ गेलो आणि मी संजय साळवे  आपल्याला भेटण्यासाठी आलोय असे हिंदीत सांगितलं  समोरच्या त्या विद्यार्थ्यांच्या आईने अगदी  प्रसन्नतेने  कुठलीही ओळख नसताना सहज स्वागत केलं.

पहिलीच भेट. पहिल्या काही क्षणात आपली ओळख नाही अस मुळीच वाटलं नाही. मी त्यांना विचारलं प्रवास कसा झाला.  त्यांनी प्रवासाच्या दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांवर कार्यकर्ते भेटत गेले आणि  भोसला पर्यंत  कसे पोहोचले. असं अवघ्या एक दोन मिनिटात खुप छान समजावून सांगितले.  नागालँड पासून नाशिक पर्यंत प्रवास नाशिकमध्ये उतरल्यानंतर भोसला पर्यंत येणे आणि त्याचा एखादा सुखद अनुभव असतो  हीच मोठी जमेची बाजू पहिल्या भेटी मध्ये जाणवली.

मला पहिला प्रश्न त्यांनी विचारला मला मराठी कशी शिकता येईल? आणि गुडमॉर्निंगला मराठीत काय म्हणतात? मला एकदम छाती भरून आल्यासारखं वाटलं. आपल्याला कोणीतरी मराठी शिकवा असं म्हणतंय. मी त्यांना शुभसकाळ, सुप्रभात असे दोन्ही पर्यायी शब्द सांगितले. आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी आपला  भोसलाविषयी माहिती सांगताना, त्या मोठ्या तन्मयतेने यातली प्रत्येक गोष्ट माझ्या कडून समजून घेत होत्या. मला कॉलेजला परत जायचं होतं त्यामुळे मी गप्पा थोड्या आवरत्या घेतल्या.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी पुन्हा माझी त्यांची भेट झाली. पुन्हा अतिशय उत्साहाने तितक्याच प्रसन्नतेने त्यांनी माझं स्वागत केलं. बरोबर अतुल पाटणकर होते. थोड्या वेळाच्या गप्पानंतर त्या  भावूक झाल्या. डोळ्यातील पाणी थांबता थांबत नव्हते. मोठ्या संयमाने त्यांनी त्यावर नियंत्रण मिळवलं. विमानाने रेल्वेने प्रवास करून दोन दिवसानंतर खरंतर त्या नाशिकच्या भोसलापर्यंत पोहोचू शकल्या होत्या. याची इतकी सहज कल्पना आपल्याला फारशी येत नाही. त्यांचा मोठा मुलगा मंगलोरला शाळेत त्यांनी प्रवेश घेतला होता आणि धाकट्याला नाशिकमध्ये भोसला मिलिटरी स्कूल ला प्रवेश घेतला होता . 

माझा मनात सहज प्रश्न निर्माण झाला. त्या इतक्या लांब दूरवर आपल्या मुलांना शिकण्यासाठी का ठेवत असतील? मग हळूहळू नागालँडची परिस्थिती आणि तिथली अस्थिरता याविषयीची कल्पना यायला लागली. आता त्या भावूक  का झाल्या याची थोडीफार कल्पना मला यायला लागली. कारण थोड्या वेळापूर्वीच सहा तासाच्या अंतरावर असलेल्या एका विद्यार्थ्याच्या  आईशी माझा संवाद झाला  होता. आपलं मूल होस्टेलला राहिल्यानंतर आणि तेही पहिल्यांदा.  कुटुंबात जी चलबिचल होते त्याची कल्पना आणि प्रत्यक्ष अनुभव म्हणून आपल्या वाट्याला येणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ईशान्य भारतातील दहशतवाद आणि त्याचे समाजमनावर होणारे परिणाम याचे एक छोटे उदाहरण मी माझ्या समोर आज अनुभवत होतो.  पूर्वांचल कसा जोडला जाईल त्यासाठी काय काय प्रयत्न करता येईल. याचे काही दशकांतील कामांची माहिती माझ्यासमोर होती. पूर्वांचलातील काही विद्यार्थ्यांना शिकविण्याचा मला योगही आला होता. पण आपल्या पोटच्या  मुलाची भविष्याची आणि सुरक्षिततेची चिंता आणि त्याचं सैन्यात जाण्याचं स्वप्न यामुळे ही आई  खरंतर भोसलापर्यंत पोहोचली होती.

क्षणभरात मला असे जाणवले.  रोजच्या  आयुष्यात  आणि दैनंदिन कामात आपण अनुभवत असलेले भोसला आणि त्याचं समाजमनामध्ये पडणारे प्रतिबिंब यात एक मोठी उदात्त भावना आहे. माझं काम भोसलातले अनेक चांगले पैलू समाजासमोर आणण्याचे. रामभूमी पर्यंत येणारा प्रेरणेने भारावलेले एखादा विद्यार्थी. देशातील एखाद्या विपरीत परिस्थितीला आपल्या  मुलाच्या  संस्कारातून, करिअरमधून  उत्तर शोधू पाहणारी आई हे कधी कधी न समजण्यापलीकडचं प्रेरणास्रोत वाटायला लागतो. मी अनेकवेळा भोसलातील  बातम्या, घटना लिहिताना हे अनुभवतो.  महिनाभराच्या  सैनिकी प्रशिक्षण त्यासाठी आलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधताना रामभूमी काहीतरी ग्रेट आहे याची वारंवार जाणीव होते. भोसलाची रामभूमी ही खरोखर रामभूमी याचं प्रत्यंतर यायला काही काळ लागतो हेही तितकंच खरं. 

देशाच्या सरंक्षण विषयातील मोठी परंपरा असलेलं भोसला. मानवी विकासाचा प्रारंभबिंदू अनुशासन ह्याची प्रचिती देणारे ज्याला देशभक्ती आणि राष्ट्राची प्रगती ह्याची अजोड जोड आहे. अनेकांना येथील विद्यार्थ्यांची दिनचर्या पाहिल्यानंतर आपण एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलो आहोत की काय असे वाटते. समाजात सज्जनशक्तीचे प्रतिबिंब अधिकाधिक ठळकपणे जाणवावे ह्यासाठी येथील संस्कार आयुष्यभर पुरून उरतो. रोजच्या आयुष्यात कठीण वाटणारी गोष्ट भोसलाचा विद्यार्थी सहजपणे करतो. देशसेवा करण्याची ही पूर्वतयारी पाहून येथील विद्यार्थ्यांच्या पावलातील शिस्त पाहून अनेकांचा प्रेरणास्रोत जागृत होतो.

विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य, संस्कार आणि बहुगुणता ह्याची पेरणी करणारे भोसला हे देशातील सैनिकी प्रशिक्षण देणारे. येथून प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी हा वैयक्तिक आयुष्याला आकार देताना अनेक गोष्टीना वीरभावनेने सामोरा जातो हीसुद्धा यातील जमेची बाजू आहे. भोसला मध्ये  नागालँडच्या एका मातेने आपल्या मुलांसाठी प्रवेश घेताना जो विचार केला असेल त्यातील  क्षणभर संवादातून ही भावना टिपण्याचा प्रयत्न. भोसलाचा म्हणून एक संस्कार समाजजीवनात आहे त्याचे एक प्रतिबिंब ह्या प्रतिक्रियामध्ये आहे.

  • संजय साळवे
Back to top button