मास्कची कोरोना विषाणूविरोधी क्षमता वाढणारे जैविक द्रावण विकसित
पुणे, ता. १६ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दैनंदिन जीवनात मास्क वापरणे अनिवार्य ठरले आहे. परंतु वापरात येणारा प्रत्येक मास्क हा कोरोना विषाणूशी टक्कर देण्यास सक्षम असेलच से नाही. त्यामुळे मास्कची कोरोना विषाणूविरोधी क्षमता वाढविण्यासाठी पुण्यातील डॉ.अभय शेंडये यांनी जैविक द्रावण विकसित केले आहे.
कोरोना पासून स्वतःचे आणि इतरांचेही संरक्षण करण्यासाठी वापरात येणारे मास्क हे चांगल्या दर्जाचे असतातच असे नाही. प्रत्येक मास्क एन95 मास्क इतका विषाणूरोधी असेलच असे नाही. तसेच या मास्कचा अनेकदा पुनर्वापर होत असल्यामुळे मास्कवरील जिवाणू आणि विषाणू पूर्णपणे नष्ट होतीलच, असे नाही. यावर उपाय म्हणून डॉ.शेंडये यांनी रिडॉल व्हायरस नावाचे जैविक द्रावण विकसित केले आहे. इंग्लंडच्या प्रयोगशाळेने या द्रावणाला IS 18184-2019 हे आंतरराष्ट्रीय विषाणूरोधक मानक दिले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. अभय शेंडये सांगतात की, दीर्घकाळ मास्क वापरला की त्यावर जंतू साठतात त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. या द्रावणात बुडविलेला मास्क ९७ टक्क्यांपेक्षा अधिक कोरोना विषाणूंना रोखत असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. तसेच म्युकरमायकोसिस, न्यूमोनिया आदींचा संसर्ग रोखण्यासाठीही या द्रावणाचा फायदा होतो.
या जैविक द्रावणाची वैशिष्ट्ये म्हणजे कायटोसान या नैसर्गिक घटकाबरोबर पेटंटेड प्रक्रियेचा वापर करण्यात आला आहे. मास्क या द्रावणात बुडविल्यास त्याची विषाणूरोधक क्षमता वाढते. रोज आठ तास याप्रमाणे पाच दिवस द्रावणाचा परिणाम दिसून येतो. या जैविक घटकाचे आवरण असलेला कपडा दोन तासात ९७ टक्के विषाणू मारत असल्याचाही दावा यावेळी करण्यात आला आहे. सेंद्रिय पदार्थांचे जैविक द्रावण असल्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाहीत.
या द्रावणामुळे कापडी मास्क अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होतो. प्रत्येकवेळी वैद्यकीय मास्कची गरज पडत नाही. मास्कचा पुनर्वापर वाढेल. मास्क बरोबरच रुमाल, रुग्णालयातील कपडे आणि चादरीसाठीही हे द्रावण वापरता येऊ शकते.