
पुणे – बुधवार पेठेतील शिक्षणापासून वंचित असलेल्या बालचमूंसाठी गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी आगळीवेगळी शाळा सुरु केली आहे.जय गणेश व्यासपीठाचा चला मुलांनो शिकूया या उपक्रमांतर्गत देहविक्रय करणा-या महिलांच्या मुलांसाठी ही शाळा सुरु झाली आहे.
बुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी रंगबेरंगी फुग्यांनी सजलेले वर्ग…विद्यार्थांच्या स्वागतासाठी घातलेल्या रांगोळीच्या पायघड्या…मिकीमाऊसने गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन केलेले स्वागत…अशा वातावरणात नुकताच पाटी पेन्सिल घेऊन मुलांनी आनंदाने आपल्या वर्गात प्रवेश केला.
पुणे शहरातील सिटी पोस्ट जवळील गुजराती शाळेत २५ मुलांची शाळा भरविण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल. देशमुख, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपक्रमाची संकल्पना पियुष शाह यांची होती तर सेवा मित्र मंडळ, साईनाथ मंडळ ट्रस्ट, महाराष्ट्र तरुण मंडळ, श्री काळभैरव तरुण मंडळ, वीर शिवराज मित्र मंडळ व निंबाळकर तालीम या उपक्रमात सहभागी आहेत.
शाळेच्या उपक्रमाबाबत बोलतांना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, कोरोनामुळे शिक्षणाची हेळसांड झाली आहे. ही आपत्ती केव्हा संपेल माहीत नाही. परंतु यामुळे आपल्या शिक्षणपद्धतीतील उणिवा आपल्या लक्षात आल्या आहेत. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देताना त्यात रंजकता आणली पाहिजे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यामांचा वापर करुन शिक्षण द्यायला पाहिजे.
जय गणेश व्यासपीठाचे पियुष शाह म्हणाले, मुलांना गुणात्मक शिक्षण मिळावे, या हेतूने शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. या शाळेच्या माध्यमातून मुलांना व्यावहारिकदृष्टया उपयोग होईल अशा गोष्टी शिकविण्यावर भर असणार आहे. शालेय शिक्षणासोबतच नृत्य, संगीत, नाटक, सिनेमा, कथाकथन या विषयाचे अध्ययन मुलांना घेता येणार आहे.
लॉक डाउनच्या काळात या विदयार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी पाच हजार पुस्तके वाचनास उपलब्ध करून देण्यात आली होती. एकूणच या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पाटी पेन्सिल होऊन गणेश मंडळे पुढे सरसावली आहेत.
सौजन्य – विश्व संवाद केंद्र पुणे
**