‘मुंबई सागा’ मधील रा. स्व. संघाच्या मानहानीबद्दलचे ‘ते ‘ दृश्य सेन्सॉरकडून ब्लर

चित्रपट निर्मात्यांनी माफी मागेपर्यंत खटला मागे घेणार नाही – ऍड. प्रकाश साळसिंगीकर
मुंबई, दि. २९ जून (वि.सं.कें.) – ऍमेझोन प्राईमवरील ‘मुंबई सागा’ या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खोडसाळ तसेच मानहानीकारक चित्रण व संवाद ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (सेन्सॉर) कडून चित्रपट निर्मात्यांच्या सांगण्यावरून अस्पष्ट (ब्लर) करण्यात आले आहे. या सिनेमाची निर्मिती केलेल्या सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, व्हाईट फिदर लिमिटेडने आपली चूक मान्य करून चित्रपटातील ‘ते’ दृश्य सेन्सॉरकडून आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जरी अस्पष्ट करून घेतले असले तरीही त्यांनी अजून जाहीर माफी मागितलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरील खटला आपण मागे घेणार नसल्याचे, ऍड. प्रकाश साळसिंगीकर यांनी स्पष्ट केले आहे.
‘मुंबई सागा’ या चित्रपटातील अभिनेत्यांच्या तोंडी असलेल्या संवादात भाऊच्या संघटनेचा उल्लेख आला होता. या भाऊच्या संघटनेतील सदस्य रा स्व. संघाच्या गणवेशात स्पष्टपणे दाखवले होते. भाऊची सेना या नावाने असलेल्या संघटनेत संघाच्या गणवेशात, हातात दंड घेऊन शाखेत ज्याप्रमाणे ध्वजाला प्रणाम करतो तशा प्रकारे प्रणाम करणारे स्वयंसेवक दाखवले होते. अनेक स्वयंसेवक पोलिस खात्यात जातात आणि नंतर भ्रष्टाचार करतात, असेही या चित्रपटातील संवादाद्वारे म्हटले होते. तसेच हा चित्रपट सत्यघटनेतून प्रेरित असल्याचे सुरुवातीलाच सांगितले होते.
या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या प्रसंगामुळे संघ स्वयंसेवक यांची मानहानी होत असून यामुळे संघ व स्वयंसेवकांबाबत चुकीचा संदेश समाजात जात असल्याने रा. स्व. संघाचे मुंबईतील स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांनी संघाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. चित्रपटातील संबंधित प्रसंग, संवाद त्या चित्रपटातून काढून टाकावेत व बिनशर्त माफीही मागितली जावी, अशी मागणीही त्यांनी या नोटिशीत केली होती. महेश भिंगार्डे यांच्या वतीने ऍड. प्रकाश साळसिंगीकर यांनी ही नोटीस बजावली होती.
**