नैराश्यग्रस्तांना सकारात्मक विचार देण्यासाठी विवेकानंद केंद्राच्या वतीने व्याख्यान-परिसंवादांचे आयोजन
मुंबई, दि. २ जुलै : कोविड-१९ मुळे अनेक तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आल्यामुळे तरुणवर्ग नैराश्याने ग्रासला आहे. हे नैराश्य दूर सारण्यासाठी तसेच त्यांना संवेदनशीलतेने सकारात्मक विचार देण्यासाठी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी महाराष्ट्र प्रांताच्या विवेक चेतना -२०२१ या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन व्याख्यान-परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२१ या प्रत्येकी चार महिन्यात चार परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.
नैराश्याने ग्रासलेल्या आणि अनेक स्तरावर कठीण स्थितीतून जाणाऱ्या तरुण पिढीला स्वतःची ओळख करून देण्यास आणि निवडलेल्या क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी तसेच त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी युवकांच्या आवश्यकतांचा विचार करीत प्रमुख चार बिंदूंवर उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये उद्यमशीलते करीता सृजनशीलता, जीवन कौशल्ये, सेवा, ध्यास पुनर्निर्माणाचा या विषयांवर आधारित व्याख्यान -परिसंवाद आणि त्यानंतर प्रत्यक्षानुभवाची संधी उपलब्ध करून देणे व त्या स्वरूपातील निवडक उपक्रमात युवकांना सहभागी करून घेणे अशी रचना करण्यात आली आहे. या माध्यमातून विजिगिषु वृत्ती, वेधक विचार आणि कर्तव्य तत्परता युवकांच्या अंगी निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
आयोजित करण्यात येत असलेल्या चार परिसंवादात महाराष्ट्रातील विख्यात आणि तरुणाईला समजून नेमके मार्गदर्शन करणारे संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमात १८ ते ४० वर्षे वयोगटातील महाविद्यालयीन युवक-युवतींना, नोकरदार, व्यावसायिक व गृहिणींना देखील सहभागी होता येणार आहे. हा उपक्रम पूर्णतः निःशुल्क राबविण्यात येणार आहे.
संपूर्ण चार महिने या सातत्यपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग घेणाऱ्या युवकांना स्वयंरोजगारातून सकारात्मक विचार, आत्मविश्वास वाढविण्याची संधी, विविध कौशल्ये विकसित होतील, चारित्र्य संवर्धन आणि व्यक्तिमत्त्व विकास होईल. विविध आकर्षक बक्षिसे, एक दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत व डिसेंबर २०२१ ला महाराष्ट्र प्रांताद्वारे आयोजित निवासी युवा प्रेरणा शिबिरात सहभागी होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
विवेक चेतना उपक्रमात सहभागी होण्यासाठी bit.ly/vevek-chetana या ऑनलाईन लिंकद्वारे आवश्यक माहिती भरून नोंदणी करायची आहे. अधिक माहितीसाठी विवेक चेतनाचे प्रमुख अमोल गाढवकर (9890007385) , डॉ. मृणाल सराफ (98817 69868), डॉ. वंदना महाजनी (96196 13691), वल्लभ केळकर (94208 18483) यांच्याशी संपर्क साधावा.