News

रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची विद्यार्थ्यांना सुसंधी, ‘इस्रो’चे निःशुल्क ऑनलाईन वर्ग

मुंबई – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन (आयआयआरएस) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ ते ३० जुलै या काळात उन्हाळी ऑनलाईन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. रिमोट सेन्सिंगची उपयोगिता आणि पर्यावरणीय अभ्यासासाठी भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात जीआयएसचे महत्त्व याची माहिती या वर्गांमध्ये देण्यात येणार आहे. निःशुल्क स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या या वर्गांना उपस्थित राहण्यासाठी २० जुलैपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

उन्हाळी वर्गाचे वैशिष्ट्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांमधील विद्यार्थ्यांना या वर्गात सहभागी होता येणार आहे. रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानबाबत जागृती करणे व वसुंधरेच्या व पर्यावरणाच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग करणे याची सविस्तर माहिती प्रात्यक्षिकांसह या वर्गांमध्ये दिली जाणार आहे. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस तंत्रज्ञान ही पर्यावरण समजून घेण्याची महत्त्वपूर्ण आयुधे आहेत.


दहावी ते बारावी या इयत्तांमधील विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून या वर्गांना उपस्थित राहू शकतात. खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करून ही नोंदणी करता येईल. दररोज सकाळी दहा आणि बारा वाजता ४५ मिनिटांची दोन ऑनलाईन लेक्चर असे या वर्गांचे स्वरुप आहे. त्याचप्रमाणे रोज एक प्रश्नमंजुषा देखील आयोजित करण्यात येणार आहे. त्यात ५५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यूट्युब स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हे वर्ग घेतले जाणार आहेत. नोंदणासाठी लिंक – https://eclass-intl-reg.iirs.gov.in/schoolregistration

रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आणि जीआयएस प्रणाली याला करिअर म्हणून सध्या अत्यंत महत्त्व आले आहे. प्रदुषण नियमन, हवामानक्षेत्र, अंतराळ क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, वीजनियमन, ग्रामविकास, ऊर्जाक्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, जीओलॉजिकल सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाते. करिअरला सुरूवात करण्यापूर्वी अशा विषयांची माहिती घेण्याची सुसंधी विद्यार्थ्यांना या उन्हाळी वर्गामुळे प्राप्त होणार आहे.
**

Back to top button