News

बंगालमधील हिंसाचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी ‘दि व्हॉईसेस फॉर बंगाल व्हिक्टिम्स’ च्या प्रतिनिधींनी राज्यपालांना दिले निवेदन

मुंबई, दि. ३ जुलै :   बंगालमध्ये निडणुकीनंतर झालेल्या नृशंस  हिंसाचाराची राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद  यांनी दखल घ्यावी तसेच केंद्र सरकारने तात्काळ या भीषण हल्ल्याची दखल घेऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी तसेच आवश्यकता भासल्यास  बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करावे, अशा  मागणीचे निवेदन ‘दि व्हॉईसेस फॉर  बंगाल व्हिक्टिम्स’ च्या प्रतिनिधींनी  मा. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केले.  

‘दि व्हॉईसेस फॉर बंगाल व्हिक्टिम्स’  चे पाच प्रतिनिधींनी मा. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांची  शनिवारी सकाळी राजभवन येथे भेट घेतली. महाराष्ट्रातील बंगाली डॉक्टर्स, इंजिनियर्स, समाजसेवक, कलाकार आणि साहित्यिक यांच्या बंगाली सिव्हिल सोसायटी अँड पिपल  यांचे प्रतिनिधित्व त्यांनी यावेळी केले.  यामध्ये दि व्हॉईसेस फॉर बंगाल व्हिक्टिम्सच्या संयोजक तसेच कलाकार, लेखक  गार्गी नंदी रॉय, प्रोबाशी बंगाली सोसायटी चे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रंजन चौधरी,  प्रसिद्ध  बासरी वादक रोणू मजूमदार, नाट्यकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते लकी मुखर्जी तसेच  रेरा कार्यकतें निरंजन बसू या मान्यवरांचा समावेश होता.

राजकीय हिंसाचार हा पश्चिम बंगालच्या इतिहासाचा एक भाग आहे, पण यावेळच्या निवडणुकांनंतर जी नृशंस हिंसा करण्यात आली ती अत्यंत हादरवणारी आहे.  पश्चिम बंगालमधील गुंडानी ज्या पद्धतीने निष्पाप लोकांना जीवे मारले, महिलांवर अत्याचार केले, हल्ले केले  ते अत्यंत निंदनीय असे आहे.  या हल्ल्यातील  बळींना योग्य तो न्याय मिळाला नाही तर संपूर्ण देशात याचे वाईट परिणाम पाहायला मिळू शकतात. निवडणुकीनंतर सूडाच्या भावनेने त्यांच्यावर जे हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या अधिकारावर एक प्रकारे घाला घालण्याचाच  प्रकार दिसून येत  आहे.  पश्चिम बंगालमधील कायदे आणि नियम धाब्यावर बसवून येथील कारभार सुरु असल्यामुळे हिंसेने भयानक रूप घेतले आहे. येथील महिलांवर खूप घाणेरड्या पद्धतीने अत्याचार होत आहेत. अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळत नसल्यामुळे तसेच भयग्रस्त झालेले आणि सततच्या होत असलेल्या हिंसेने अनेक जण गावाकडील आपली घरे सोडून जात आहेत.  

नुकत्याच हाती आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, बंगालमधील निवडणुकांनंतर १५ हजार घटना घडल्या ज्यामध्ये २५ जण मारले गेले तर ७ हजार महिलांवर अत्याचार झाले आहेत.  ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत त्यामुळे मनात भीती उत्पन्न झाली आहे. याचे परिणाम त्यांच्या लोकशाही स्वातंत्र्यावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बंगालमधील बळींना न्याय मिळाला नाही तर त्याचे वाईट पडसाद संपूर्ण देशावर पडू शकतात. तसेच दोषींवर  त्यांच्यावर वेळीच योग्य ती कठोर कारवाई झाली नाही तर त्यांना कसलीही भीती राहणार नाही. आणि ते असेच हल्ले आणि अत्याचार करत निष्पापापांचे बळी घेतील, असे दि व्हॉईसेस फॉर बंगाल व्हिक्टिम्स च्या प्रतिनिधींनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Back to top button