राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते नुकतेच डॉ. ख्वाजा इफ्तीयार मोहम्मद यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कदाचित ही ऐतिहासिक घटना असावी, की संघाच्या सरसंघचालकांच्या हस्ते मुस्लिम लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यामुळे या प्रसंगाचे विशेष महत्व आहे असे मानायला हरकत नाही. पू. सरसंघचालकांनीही ही बाब आपल्या भाषणात अधोरेखित केली.
भारताची संस्कृती हा भारताचा आत्मा आहे. परंतु काही राजकीय विचारधारा या भारतीय संस्कृतीवर घाव घालून हा आत्माच काढून घेण्याचा प्रयत्न करत आले आहेत. जेव्हा असे राष्ट्रविरोधी काही घडून समाज भरकटू लागतो तेव्हा संघ समाजाला पुन्हा आपला मूळ मार्ग लक्षात आणून देतो. संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मागील काही वर्षात ‘हिंदुत्वाची व्यापकता आणि सर्वसमावेशकता’ यावर अनुसरून जी विधाने केली आहेत ते हेच दर्शवते. हिंदू आणि मुस्लिम वेगळे नाहीत, सगळ्यांचा डीएनए एकच आहे, सर्वांचे पूर्वज एकच आहेत आणि सर्वजण हिंदूच आहेत. भलेही कोणाची उपासना पद्धती, आचार विचार, राहणीमान भिन्न असेल. परंतु भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू आहे, अशी संघाची आतापर्यंतची भूमिका आहे. सरसंघचालक यांनी आपल्या नुकत्याच झालेल्या भाषणात याचाच पुनरुच्चार केला आहे.
संघाच्या या भूमिकेला कोणी ‘संघाचे मुस्लिम प्रेम’ म्हणून पाहिले, कोणी प्रसिद्धी म्हणून पाहिले तर कोणी आगामी निवडणुकांचा तर्क लावून राजकीय चष्म्यातून पाहिले. संघ बदलतो आहे अशीही काही जण टिप्पणी करतात. परंतु डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच हा गैरसमज दूर करून टाकला. ते म्हणाले, “संघाचा मार्ग अटळ, अविचल आहे. आपल्या मूळ मार्गापासून संघ भरकटण्याचा प्रश्नच येत नाही. मागील नव्वद वर्षांपासून संघ हेच काम करत आला आहे, पुढेही सुरू राहील. आमचे ध्येय ठरले आहे, त्यानुसार संघाचे काम सुरू आहे.” डॉ. मोहन भागवत जी पुढे म्हणाले, “संघ कोणाच्या विरोधात काम करत नाही की समर्थनातही काम करत नाही. राजकीय हस्तक्षेप हे आमचे काम नाही. वोट पॉलिटिक्स, पक्षीय राजकारण यात आम्ही पडत नाही. एखाद्या पक्षाची विचारधारा समान आहे म्हणून त्यांच्यासाठीही आम्ही काम करत नाही. आम्ही केवळ राष्ट्रहिताचे समर्थक आहोत. जो कोणी राष्ट्रहिताचे काम करेल त्याला आमचे समर्थन असते आणि राष्ट्रहिताच्या विरोधात जो कोणी काम करेल त्याला आमचा विरोध असतो. संघाचा जन्म झाला तेव्हापासून आम्ही हेच ठरवले आहे” असे त्यांनी सांगितले. संघ आजच काहीतरी नवीन करतोय असं नसून हीच संघाची कायमची भूमिका आहे असं सरसंघचालकांनी स्पष्ट केलं आहे.
सरसंघचालकांच्या या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे संघाचे सरसंघचालक पहिल्यांदाच एखादया मुस्लिम लेखकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करत होते. The Meeting Of Minds a Bridging Initiative या पुस्तकात लेखकाने एकप्रकारे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. यात कुठेही विद्रोह नाही, नकारात्मकता नाही, रडगाऱ्हाणे नाही. भारताच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने हा सुसंवाद महत्वाचा वाटल्याने सरसंघचालकांनी स्वतः या पुस्तकाच्या प्रकाशनाला येण्याची इच्छा व्यक्त केली. यातून दोन गोष्टी निष्पन्न झाल्या. संघ ‘हिंदुत्वाची सर्वसमावेशकता मुस्लिम समाजाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही’ असं गोड गोड बोलतो, पण कृती मात्र मुस्लिम विरोधी करतो असा जो संघविरोधी मंडळींचा आरोप होत असतो तो मोडकळीस निघाला आणि हिंदूंची जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून संघ जर इतकी व्यापक व शुद्ध भावना ठेऊन पुढाकार घेतोय तर जागतिक पातळीवरच्या समाजकारणात त्याचा मोठाच सकारात्मक प्रभाव पडणार आहे.
पूजनीय सरसंघचालकांच्या भाषणातले काही अंश-
- भारतात इस्लाम पहिल्यांदा आक्रमकांकडून आला हे वास्तव आहे. भारतातील सर्व हिंदू मुस्लिमांचा डीएनए एकच. सर्वांचे पूर्वज एकच आहे.
- संघर्षामुळे कायम नुकसानच होते. मने जोडण्यासाठी संवाद प्रभावी माध्यम. देशाला मोठे करण्यासाठी कधी न कधी समजदार लोकांना पुढे यावच लागेल.
- संवाद करताना त्यामागे स्वार्थ नसला पाहिजे. हा देश व समाज आपला आहे. कोणी मानो अथवा ना मानो आपल्याला करायचे आहे. आपलं काय होईल हे माहीत नाही पण समाजाचं भलं होईल अशा अर्थाने उभं राहावं लागेल.
-काही अनुचित प्रकार हिंदूंकडून मुसलमानांवर झाले तर त्यावर टीका हिंदू समाजातूनच होते, तसं मुसलमानांच्या बाबतीत निदान ऐकू तरी आलं नाही. म्हणून समजदार मुस्लिम समाजाची भूमिका महत्त्वाची.
-लोक आम्हाला म्हणतील की तुम्ही मुसलमानांशी चर्चा करताय? तुम्ही भोळे आहात. कारण भूतकाळात अशा ठोकरा खाल्ल्या आहेत. परंतु देशासाठी हे करावं लागेल. - आपल्याच भारतमातेचे पुत्र, संस्कृतीचे वारसदार आणि एकाच पूर्वजांचे वंशज सोबत का चालू शकत नाही? काही कारणामुळे एक अलगाव व अविश्वास निर्माण झाला आहे. हे आपल्याला हटवावे लागणार आहे.
- हिंदुस्थान हिंदुराष्ट्र आहे, गोमाता पूज्य आहे. परंतु लिंचिंग चुकीचं आहे, हिंदुत्वाच्या विरोधी आहे, पण त्याची कायदेशीर चौकशी निःपक्षपातीपणे व्हावी, कारण अशा खोट्या केसेस टाकल्याचीही उदाहरणे आहेत.
- हिंदू समाजाची जी भावना आहे तीच संघ बोलतो. संघ हिंदू संघटन करतो याचा अर्थ बाकी वर्गाला झोडपून काढण्यासाठी संघ नाही.
- आम्ही या देशाला हिंदुस्थान म्हणतो, तेव्हा आमची हिंदूंची व्याख्या आहे जो या देशाच्या समाजाला, संस्कृतीला, भूमीला, पूर्वजांना आपलं मानतो तो हिंदू.
- तुम्ही हिंदू म्हणा किंवा भारतीय. नावात काही नाही, भावना समजून घ्या. ज्या कार्याची सुरुवात तुम्ही केली आहे ती आवश्यक आहे. विश्व कल्याणसाठी आपण भारतीयांचीच भूमिका महत्त्वाची असणार आहे. समस्या अनेक येतील, पण कार्यरत राहावं लागेल. या भाषणात सरसंघचालकांनी मुस्लिम समाजातील सज्जन शक्तीला देशविरोधी कृत्य करणाऱ्या घटकांना विरोध करण्यासाठी एकप्रकारे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “देशाच्या एकतेला बाधा आणणारी जेव्हा गोष्ट घडते तेव्हा ‘हिंदूविरुद्ध हिंदू’ अशी परिस्थिती निर्माण होते, परंतु मुस्लिम समाजात असे कधी घडले असे निदान माझ्या पाहण्यात नाही. मुस्लिम समाजात असे घडत असेलही पण ते समोर येत नसावे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या समजदार लोकांनी आपली ही भूमिका ओळखून देशाला मोठं केलं पाहिजे.” सरसंघचालकांच्या या वक्तव्याला कोणीही टाळू शकणार नाही. मुस्लिम समाजातील सज्जन शक्तीला आपला आवाज एकसुरात मोठा करावाच लागणार आहे, तरच त्यांच्याकडे पूर्ण समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. राष्ट्रीय मुस्लिम मंचाने व संघाने मुस्लिम समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी जो उदारपणा व समजूतदारपणा दाखवला आहे, त्याचे म्हणूनच स्वागत केले पाहिजे.
— कल्पेश जोशी, सोयगांव