News

नाशिकचे ‘रेडिओ विश्वास’ ठरले दोन राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

नाशिकः केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्काराच्या आठव्या आवृतीत नाशिकच्या ‘रेडिओ विश्वास’ या कम्युनिटी रेडिओ स्टेशनने (सीआरएस) दोन पुरस्कार मिळवत देदिप्यमान कामगिरी केली आहे. ‘शिक्षण सर्वांसाठी ‘ संकल्पना श्रेणी अंतर्गत पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील हे पहिले रेडिओ स्टेशन आहे. कोविड काळात ऑनलाईन शिक्षणाच्या प्रसारात महत्वाचा वाटा या रेडिओने उचलला आहे.

कोविड -19 च्या काळात रेडिओ विश्वास 90.8 ने “शाश्वत मॉडेल पुरस्कार” श्रेणीत पहिला आणि “संकल्पना आधारित पुरस्कार” श्रेणीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील नाशिकच्या विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि संशोधन संस्थेद्वारे रेडिओ विश्वास केंद्र चालवले जात असून 2011पासून त्याचे प्रसारण होत आहे. या केंद्राचे दररोज 14 तास प्रसारण सुरु असते. हे प्रसारण केवळ नाशिक पुरतेच मर्यादित न ठेवता राज्यातील सर्वदूर प्रसारणाचे नियोजन रेडिओ विश्वासने केले होते, कोविड काळात ऑनलाईन संवादाचे दुसरे साधन नसल्याने तज्ञांच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्याख्यानाद्वारे संवादसत्र आयोजित करण्यात आले होते.

जून 2020 मध्ये ‘शिक्षण सर्वांसाठी ‘ या सीआरएस (कम्युनिटी रेडीओ सर्विस ) उपक्रमाची सुरुवात झाली. कोविड -19 च्या कठीण काळात इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा परिषद आणि नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या अंतर्गत ध्वनिमुद्रित व्याख्याने प्रसारित करण्याबरोबरच अद्ययावत तंत्रसामुग्री त्यांना सहज उपलब्ध करून देण्यात आली. हा कार्यक्रम हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत अशा विविध भाषांमध्ये प्रसारित करण्यात आला होता.

“ही मुले गरीबीच्या विळख्यात अडकली आहेत आणि डिजिटल शिक्षणासाठी स्मार्ट फोन घेणे त्यांना परवडत नाही. आमच्या स्टुडिओमध्ये 150 शिक्षकांच्या मदतीने व्याख्याने ध्वनिमुद्रित करून ‘शिक्षण सर्वांसाठी ’ प्रकल्प राबवण्यात आला. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी देण्यात आलेल्या वेळेनुसार ही व्याख्याने प्रसारित केली, त्यास मोठा प्रतिसाद मिळाला; महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे 50 ते 60 हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला, अशी माहिती रेडिओ विश्वासचे केंद्र संचालक हरीभाऊ कुलकर्णी यांनी दिली.

Back to top button