भारत विकास परिषदेच्यावतीने ९८५ शैक्षणिक पुस्तकांचे वितरण
पालघर, दि. १६ जुलै : भारत विकास परिषदेच्या समर्पण शाखा, मीरारोड आणि दहिसर येथील शक्ती शाखेच्या वतीने डहाणू तालुक्यातील दापचरी केंद्रातील ११ शाळांतील पहिली ते सातवीच्या ९८५ विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले. धुंधलवाडी जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात या ११ शाळांच्या शिक्षकांकडे ही पुस्तके सुपूर्द करण्यात आली.
लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत. मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांना विषयांची संकल्पना स्पष्ट होण्यास वाव मिळत नाही. तसेच सगळ्या विषयांची मोठमोठी पुस्तके वाचणेही मुलांना अवघड जात आहे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या या अडचणी लक्षात घेऊन भारत विकास परिषदेच्या वतीने सर्व विषयांचा समावेश असलेली पुस्तिका तयार करण्यात आली आहे. प्रत्येक विषयाच्या सखोल अभ्यासावर आधारित अधोरेखित माहिती या पुस्तिकेत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे.
याचबरोबर भारत विकास परिषदेच्या समर्पण आणि शक्ती शाखेच्यावतीने शाळेच्या आवारात आंबा, जांभूळ आणि कडुनिंबाचे रोपटेही लावण्यात आले. त्याचप्रमाणे आठवीच्या विद्यार्थिनींना परिषदेकडून सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटपही करण्यात आले.