हतबल पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर वारकरी संप्रदायामुळे उमलले हसू !
कोकणात झालेल्या अतिपर्जन्यवृष्टीमुळे महाड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. या संकटात सापडलेल्या अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महाड आणि परिसरातील पूरग्रस्तांना त्वरित मदत मिळावी यासाठी तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मंडळशः संपर्क करण्यास सुरुवात झाली. लगेचच काही गावांमधून प्रत्यक्ष बैठकीचे नियोजन सुद्धा झाले आणि आजच सायंकाळी आपण बैठकीसाठी हजर राहावे असे कळविण्यात आले.त्यामध्ये पहिली बैठक 24 तारखेला शनिवारी सायंकाळी पनवेल तालुक्यातील मोहो गावातील सांप्रदायिक मंडळींबरोबर झाली.
सांप्रदायिक मंडळींमध्ये ह. भ. प गणेश महाराज पाटील सर (अध्यक्ष आळंदी पंढरपूर कोकण दिंडी आणि पनवेल फिरता सप्ताह भारत देश आणि ह भ प पुंडलिक महाराज फडके (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ रायगड जिल्हा) यांनी पुढाकार घेऊन, वस्तुरूप देणगी सोबतच संकटात सापडलेल्या आपल्या समाजबांधवांसाठी भाजी-भाकरी सुद्धा घेऊन येऊ, असे सांगितले. इतकेच नाही तर आमच्यापैकी काही जण स्वतः सेवा करण्यासाठी महाडला येऊ असेही आश्वासन त्यांनी दिले. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांच्याकडून 30 ते 35 गोणी कपडे, यामध्ये जवळपास एक हजारांहून अधिक नवीन साड्यांचा अंतर्भाव असून बिस्कीटचे पुढे, पिण्याच्या पाण्याचे बॉक्सही त्यांच्याकडून देऊ करण्यात आले होते.
महाडला जाण्यास निघण्यापूर्वी त्यांनी दिलेल्या सामानात कपड्यांसह जवळपास 1 हजारांहून अधिक भाकरी, 200 पुऱ्या, 200 चपाती आणि 4 डबे म्हणजे 50 किलो भाजी तयार ठेवण्यात आली होती. तसेच 17 जण महाड मध्ये सेवा करण्याकरिता तयार झाले होते. दोन व्हॅन आणि टेम्पो घेऊन संपूर्ण टीम महाडच्या दिशेने जाण्यास निघाली. नियोजित ठरल्याप्रमाणे महाड येण्यापूर्वीच संघ कार्यालयातील अधिकार्यांशी संपर्क केला आणि त्यांच्या सूचनेनुसार भावे, खरवली, धालकाटी आणि अन्य दोन गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष त्या लोकांना घरोघरी अन्न आणि या कपड्यांचे वाटप करण्यात आले.
या गावांतील प्रत्येक व्यक्तीला दोन भाकरी आणि भाजी तसेच बिस्किटांचे वितरण करण्यात आले. काही गरजुंना कपडे देण्यात आले. मायेच्या ममत्वाने खाऊ घातलेली तसेच बऱ्याच दिवसांनी घरी बनवलेली भाकरी आणि भाजी खायला मिळाल्यामुळे येथील अनेक बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान आणि मुखातून शब्दरूपी आशीर्वाद मिळत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून तसेच प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण आपल्या घरचे अन्न पोहोचवू शकलो, या जाणिवेने आम्हालाही धन्य वाटत होते.
महाड मध्ये सेवाकार्य करताना प्रत्येक स्वयंसेवकाची धावपळ चालू होती. काही स्वयंसेवक बाहेरून आलेला माल खाली उतरवून घेत होते. काही जण शहरांमध्ये, गावांमध्ये पाठवायचा मला गाडीमध्ये भरत होते. काही धान्याच्या आलेल्या गोण्यांमधून धान्य काढून त्यांचे कीट बनवण्याचे काम करत होते. काही स्वयंसेवक प्रत्यक्ष गावागावांमध्ये जाऊन पाहणी-सर्वेक्षण करून आवश्यक गरजांची माहिती कार्यालयात पुरवीत होते. आणि मग त्याच प्रमाणे बैठक घेऊन योग्य ते नियोजन करून पूरग्रस्त ठिकाणी मदत पोहोचविण्याचे कार्य चालू होते.
समाजातील सज्जनशक्ती आणि संघशक्ती यांनी अशाप्रकारे संघटित होऊन केलेले ईश्वरीय कार्य समाज निर्माणासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, याचेच हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
- प्रसंन्न गोडसे
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पनवेल तालुक्याचे कार्यवाह आहेत)