बांबूनंतर केळीच्या खोडाच्या तंतूपासून बनवलेल्या ‘केशवसृष्टी’च्या सुबक राख्या

‘केशवसृष्टी’च्या अनेक समाजाभिमुख प्रकल्पांपैकी एक प्रकल्प म्हणजे ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजना’ हा प्रकल्प. दि. १ मे २०१७ पासून सुरु झालेल्या या योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्याच्या वाडा, विक्रमगड व जव्हार तालुक्यांतील महिलांना स्वयंरोजगार मिळावा, या उद्देशाने येथील महिलांना मागच्यावर्षी ‘प्रोजेक्ट ग्रीन गोल्ड’च्या माध्यमातून बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ५० हजार राख्या बनविण्याचे त्यांना करण्यात आलेल्या आवाहनानुसार या महिलांनी ५० हजार राख्या बनविण्याचे आवाहन आव्हान म्हणून स्वीकारले आणि ५० हजार राख्या बनविल्या.
मिळालेल्या संधीचे सोने करून आपल्या हातातल्या उपजत कलेला वाव देत सुबक राख्या बनविल्या. त्याच पद्धतीने यावर्षी ‘केशवसृष्टी’ च्या वतीने केळीच्या खोडापासून मिळत असलेला तंतू मऊसूत असतो तसेच तो चांगल्याप्रकारे फोल्डही करता येतो. म्हणून या तंतूंपासून राख्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. राख्या बनविण्यापूर्वी जून महिन्यात केळ्याच्या खोडापासून तंतू काढण्याचे काम सुरु झाले. या तंतूंना रंग देणेही सोयीस्कर असल्यामुळे या राख्या रंगीबेरंगी आणि आकर्षक पद्धतीने बनविण्यात आल्या. आतापर्यंत २ हजार राख्या तयार झाल्या असून आणखी ३ हजार राख्यांचे काम सुरु असून लवकरच ते पूर्णत्वास येईल. केळ्याच्या फायबरपासून राख्या बनविण्याच्या या उपक्रमात वर्षभरात १०० महिलांना जोडण्याच्या दिशेने केशवसृष्टी कार्यरत आहे.
केळीच्या फायबरपासून बनविण्यात आलेल्या राख्यांप्रमाणेच यावर्षी २५ हजार बांबूच्या राख्या बनविल्या जात आहेत. ८ गावांतील प्रत्येकी २५ ते ३० महिला या राख्या तयार करत आहेत. यावर्षीच्या राख्या या मागच्या वर्षीपेक्षा अधिक सुंदर आहेत. गणेश, ओम, स्वस्तिक, कमळ अशा चित्रांनी परीपूर्ण अशा या राख्या विकण्यासाठी तयार आहेत.
पर्यावरणपूरक असणाऱ्या या राख्या घेण्यासाठी सर्व देशातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राख्यांची उत्तम विक्री सुरु आहे. संपूर्ण देशातील मेघालय, काश्मीर, हरियाणा, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद. केरळ, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब अशा वेगवेगळ्या शहरांतून ऑर्डर्स येत असून त्यांना कुरिअर द्वारे या राख्या पाठविण्यात येत आहेत. २ राख्यांचा संच असलेल्या राख्यांचे पॅकेट १०० रुपयांचे आहे. अधिक माहितीसाठी वैभव बागुल (७७३८२७७५८२) यांच्याशी संपर्क साधावा. www.keshavkutir. com या वेबसाईट द्वारे इच्छुक आपली राखी मागवू शकतात.

प्रेमाचे -आपुलकीचे बंधन आणखी दृढ करणारा खास दिवस म्हणजे रक्षाबंधन. प्रत्येक भावा-बहिणीला आतुरतेने वाट पाहायला लावणाऱ्या या खास दिवसाला आणखी खास करण्यासाठी या वनवासी भगिनींनी बनविलेल्या पर्यावरणपूरक राख्या खरेदी करूया; त्यांनाही आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देऊया!