एक कृतज्ञतेचे बोल
२२ जुलैची सकाळ उजाडली आणि चिपळूणकरांच्या डोळ्यासमोर २००५ सालातील भयानक पुराची दृश्य डोळ्यासमोर उभी राहिली, पुढे अजून काय वाढून ठेवलय याची पुसटशी कल्पनासुद्धा कोणाला आली नव्हती.
बघता बघता डोळ्यासमोर पाण्याची पातळी वाढत गेली. सकाळी ७:३० वाजता रस्त्यावर असलेल्या पुराच्या पाण्याने २ तासात म्हणजे साधारणतः ९:३० वाजता तळमजला गिळंकृत केला. हाताशी लागलं, जे काही दिसलं ते घेऊन पहिल्या मजल्यावर आलो. ऑफिस आवरताना महत्वाची कागदपत्रे गोळा करताना पुरती धावपळ उडाली. त्यानंतर पुराचं पाणी झपाट्याने वाढत होतं, कमी होत होतं, पुन्हा वाढत होतं, हताशपणे बघत राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. वीज गेली, परगावी राहणाऱ्या लोकांशी संपर्क होत नव्हता. शक्य त्या मार्गाने दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या मुलाला रात्री उशिरा “आम्ही सुखरूप आहोत, काळजी नसावी” असा तुटक संदेश पोचला. पूर्वी तार पाठवताना कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती कळवावी तसंच काहीसं वाटलं.
रात्र सरली, साप, उंदीर, बेडुक असे जलचर घरात नांदून गेले. पाणी उतरू लागलं आणि पुराची खरी भयानकता डोळ्यासमोर आली. चिखल, चिखल आणि फक्त चिखल. अस्ताव्यस्त झालेली तांत्रिक उपकरणे, फर्निचर आणि चिखलाने माखलेल्या कपड्यांचा ढीग. काय राहीलं आणि काय वाचलं याचा हिशोब जमून येणारा नाही हे त्वरित लक्षात आलं तरी आवरायला सुरुवात कुठून करावी हा प्रश्न होताच.
विचारात असतानाच ७ ते ८ सद्गृहस्थ हातात साफसफाईचे सामान घेऊन हजर झाले.
“साफसफाई करायची आहे ना?”
“हो”
“काळजी करू नका”
“आपला परिचय?……”
संभाषण संपण्यापूर्वीच ७ ते ८ गृहस्थांचा “संघ” दक्ष झाला होता आणि सफाईचे काम चालूही झाले होते. बघता बघता चिखल जाऊन खालील स्वच्छ लादी दिसू लागली.
“चहा करू का? की कॉफी” घरातील गृहिणीने साहजिक प्रश्न केला.
“आम्ही स्वइच्छेने कामाला आलोय, आम्हाला काहीही नको” इतक बोलून सदर गृहस्थ पुन्हा कामाला लागले. घर स्वच्छ झाले. बोलता बोलता समजलं, राजापूर गुजराळी येथील राजन रानडे, अनंत रानडे, राजू रानडे ,बाळा जोशी, पराग मोदी व दीपक गोरे. हे वकील, व्यावसायिक व वरिष्ठ हुद्द्यावरील अधिकारी आहेत. सर्वांचं ध्येय एकच, स्वयंसेवी, निस्वार्थ राष्ट्रभक्ती आणि सेवा. याचाच आज प्रत्यय आला.
निघताना फारच आग्रह केला, म्हणून सदर गृहस्थांनी एक एक झुणका भाकरी खाल्ली, तीही उभ्या उभ्यानेच. कारण त्यांची दिशा पक्की होती, पुढील घरात जायचं आणि जमेल तशी मदत करायची. नंतरही चार पाच दिवस त्यांची राजापूर हुन रोज येऊन जाऊन चिपळूण मध्ये विविध भागात मदत चालूच होती
आजच्या घडीला चिपळूण सावरतय, अनेकांनी काडी काडी जमवून उभे केलेले संसार पुन्हा धैर्याने उभे राहतायात. मदतीचा ओघ शब्दात वर्णन न करता येण्याजोगा आहे.
परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता आणि केलेली मदत यासाठी धन्यवाद हा शब्द फारच तोकडा आहे. देव माणसाच्या रूपात सर्वत्र असतो हेच खरं!
श्री अभय डिंगणकर, मार्कंडी चिपळूण