हिंद महासागरात टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे सोने-प्लॅटिनम पृथ्वीच्या आवरणातून समुद्राच्या तळावर जमा

४० एनआयओ शास्त्रज्ञ ३ वर्षांच्या मोहिमेवर लवकरच होणार रवाना
दोना पावला, पणजी-गोवा येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे ज्याचा आपल्या देशाला एकापेक्षा जास्त प्रकारे फायदा होऊ शकतो. एनआयओ चे संचालक डॉ.सुनील कुमार यांनी नुकत्याच केलेल्या खुलाशात म्हटले आहे की ४० एनआयओ शास्त्रज्ञांचा एक गट हिंद महासागरात 3 वर्षांच्या मोहिमेवर जात आहे आणि तिथे केलेले संशोधन आणि त्यातून निघालेले निष्कर्ष आपल्या देशासाठी गेम-चेंजर ठरू शकतात.
टेक्टोनिक प्लेट्सची हालचाल ही एक सतत प्रक्रिया आहे आणि पृथ्वीच्या कवचाच्या हालचालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. टेक्टोनिक प्लेट्सच्या या हालचालींमुळे, नवीन भू भाग तयार होतात आणि विद्यमान भूभागाची रचना आणि महाद्वीपांची रचना बदलत राहते. प्लेट्सच्या याच हालचालींमुळे, हिमालय तयार झाला आणि अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर जे एकदा जोडलेले होते ते वेगळे झाले. आता, या प्लेट्स आग्नेय आशियाकडे सरकत आहेत आणि पृथ्वीच्या आतून नवीन सामग्री वरच्या दिशेने वाहते आहे ज्यामुळे हिंद महासागरात नवीन भूभागाचा जन्म होत आहे.
एनआयओ ने हल्लीच केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की हिंद महासागरात टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे सोने आणि प्लॅटिनम सारखी खनिजे पृथ्वीच्या आवरणातून समुद्राच्या तळावर जमा होत आहेत. अभ्यासात या भागांमध्ये दुर्मिळ खनिज (Rare Earth Elements) असल्याचे पुरावे दर्शवतात. ३ वर्षांच्या या मोहिमेमध्ये कार्ल्सबर्ग रिजमधील हिंद महासागराच्या तळाचे स्कॅनिंग आणि त्यानंतर नमुने गोळा करणे आणि पुढील अभ्यास करणे अशी रूपरेषा असणार. हा अभ्यास एकूण दोन स्थानं आणि ६००० चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये असतील. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या वापरामुळे या मोहिमेची पोहोच आणि अचूकता वाढेल.
ही दोन्ही ठिकाणे आंतरराष्ट्रीय पाण्यात येतात व संशोधनासह इथे केले जाणारे इतर उपक्रम सुद्धा वेगळ्या आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत नियंत्रित केले जातात. डॉ.सुनील कुमार म्हणाले, जर त्यांचा अभ्यास या घटकांचे अस्तित्व निश्चित करू शकला तर दुर्मिळ खनिजांसह भारत त्या तेथील ठेवींवर दावा करू शकतो. त्यांनी असेही नमूद केले की जमिनीवरील विद्यमान खाणींमधून उत्खनन केले जाणारे खनिजांचे प्रमाण महासागराखाली असलेल्या मोठ्या साठ्यांच्या तुलनेत फारच कमी आहे.
त्यांनी या भागात हीलियम-३ च्या अस्तित्वाचाही उल्लेख केला. जर भारताला समुद्राखाली हीलियम-३ च्या शिरा सापडल्या आणि त्यांचे उत्खनन करता आले तर ते न्यूक्लीअर फ्युजन रिऍक्टर बनविण्याच्या आणि विकसित करण्याच्या दिशेने एक पाऊल जवळ येईल ज्यासाठी हीलियम-३ वायू आवश्यक आहे आणि जगभरातील अनेक विकसित राष्ट्रे ते मिळविण्याची योजना आखत आहे ते सुद्धा चक्क चंद्रावर उत्खनन करून. ही मोहीम गेल्या वर्षी सुरू होणार होती परंतु काही अडथळ्यांमुळे अखेर या वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये ती सुरू झाली.
-देवराज गावडे, विश्व संवाद केंद्र, गोवा
फोटो सौजन्य : icnnational.com