मुंबई आयआयटीमध्ये इन्फ्रा रेड स्पेक्टरोस्कोपी तंत्रज्ञान विकसित

कोरोना रुग्णाचे हाय आणि लो रिस्क वर्गीकरण करणे आधीच शक्य होणार
मुंबई, दि. १६ ऑगस्ट : आयआयटी-मुंबई प्राध्यापकांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी कोरोनाची गंभीर लक्षणे आढळणाऱ्या आणि कोरोनाचा अधिक धोका संभावणाऱ्या रुग्णांचे वर्गीकरण करण्यासाठी इन्फ्रा-रेड तंत्रज्ञानाचा वापर करण्याची नवीन पद्धत विकसित केली आहे. इन्फ्रा रेड स्पेक्टरोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे गंभीर स्वरूपाचा कोरोना आधीच कळू शकणार आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर वेळीच योग्य ते उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे. या चाचणीचा निकाल अवघ्या काही तासात मिळणार असून सर्वसामान्यांना परवडेल इतक्या खर्चात ही चाचणी करता येणार आहे.
मुंबई आयआयटीच्या बायोसायन्स आणि बायो इंजिनीअरिंग विभागाने इन्फ्रा रेड स्पेक्टरोस्कोपी तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्लाझ्मामधून केमिकल तपासणी करून कोरोना रुग्णाचे हाय रिस्क, लो रिस्क वर्गीकरण करणे आधीच शक्य होणार आहे. ज्यामुळे हाय रिस्क रुग्णांसाठी विशेष काळजी घेता येणार आहे.
डॉक्टरांना कोरोनाचा मोठ्या प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांमध्ये किंवा कोविड रुग्णांचे प्रमाण जास्त असलेल्या रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांना प्राधान्य देण्यास हे तंत्रज्ञान मदत करू शकते. आयआयटी-बॉम्बे, कस्तुरबा हॉस्पिटल, क्यूआयएमआर बर्गोफर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, ऑस्ट्रेलिया यांच्या एकत्रित सहयोगाने हे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे. कस्तुरबा येथील १६० कोविड रुग्णांच्या गटात गंभीर प्रकरणांचे वर्गीकरण करण्यासाठी संशोधकांनी फूरियर-ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड (एफटी-आयआर) स्पेक्ट्रोस्कोपीचा रक्त चाचणी म्हणून वापर करण्यात आला.