निवृत्त न्यायमूर्ती जोग सिंह विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताच्या अध्यक्षपदी
मुंबई, शुक्रवार, २० ऑगस्ट : विश्व हिंदू परिषदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत, निवृत्त न्यायमूर्ती जोग सिंह यांनी विश्व हिंदू परिषदेच्या प्रांत अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. दादर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी येथे ही बैठक संपन्न झाली. जोग दांडेश्वर जिल्ह्याचे संघचालक म्हणून कार्यरत होते.
विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शन मंडळाच्या फरीदाबाद बैठकीत विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री कोटेश्वर यांची मुंबई क्षेत्राचे पालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोटेश्वर यांनी नव्या प्रांत अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. देवकीनंदन जिंदाल यांच्याकडून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना जोग सिंह यांनी केलेल्या उद्बोधानात अतिशय स्पष्ट आणि सोप्या शब्दात आपले विचार व्यक्त केले.
जोग सिंह म्हणाले, देशाची सद्यस्थिती पाहता, असे वाटते की जे लोक भारतीय संविधानावर आणि घटनेवर अविश्वास दाखवतात त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे. संविधानाला आव्हान देत त्याच्या स्वतंत्र कायद्याची मागणी कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही. तसेच आपण पालघर साधू हत्या प्रकरणाचा विचार करत अशा घटनांची पुनरावृत्ती आपल्या प्रांतात किंवा राज्यात घडू नये यासाठी प्रयत्नशील रहायला हवे.
यावेळी इतर कार्यकर्त्याची नवी जबाबदारी देखील जाहीर करण्यात आली. वि.हिं.प. चे संयुक्त महामंत्री कोटेश्वर यांनी परिषदेचे आगामी कार्यक्रम आणि परिषदेच्या विविध कार्याबाबत यावेळी मार्गदर्शन केले.